Animal Disease : जनावरांमध्ये दिसतोय घटसर्प प्रादुर्भाव

Animal Care : पावसाळ्यात अचानक होणाऱ्या बदलांचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. कमी झालेले तापमान, हवेतील वाढलेली आर्द्रता अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू, विषाणू, परजीवी, बुरशी इत्यादींची वाढ झपाट्याने होते.
Animal Care
Animal Care Agrowon
Published on
Updated on

Animal Health : पावसाळ्यात अचानक होणाऱ्या बदलांचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. कमी झालेले तापमान, हवेतील वाढलेली आर्द्रता अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू, विषाणू, परजीवी, बुरशी इत्यादींची वाढ झपाट्याने होते. गोठ्यातही कायम ओलसरपणा असतो.

पावसाळ्यात अस्वच्छता, ओलाव्यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात. त्यामुळे या काळात गोठ्याची स्वच्छता, रोगप्रतिबंधात्मक लसीकरण, जंतनाशकांचा वापर, सकस आहाराचे योग्य प्रकारे नियोजन करून जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • आजार ‘पास्चुरेल्ला मल्टोसिडा’ जिवाणूमुळे होतो.

  • आजार प्रामुख्याने गाई, म्हशींमध्ये दिसत असला, तरी शेळ्या, मेंढ्या आणि वराहांच्यामध्ये देखील दिसून येतो. साधारणतः म्हशी आणि संकरित जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. लहान वासरे या आजाराला लवकर बळी पडतात.

Animal Care
Animal Disease : जनावरांमधील जिवाणूजन्य आजार : लिस्टेरिओसिस

प्रादुर्भाव आणि प्रसार

  • आजाराचे जिवाणू गाई, म्हशींच्या टॉन्सिल्स व नेझोफॅरीनक्समध्ये नैसर्गिकरीत्या आढळून येतात. मात्र निरोगी जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती या जिवाणूंची संख्या नियंत्रणात ठेवतात.

  • जनावरांच्या नाक आणि तोंडातील स्रावाद्वारे हे जिवाणू शरीराबाहेर टाकले जातात. आजारी जनावरांच्या नाक-तोंडातील स्रावातून हे जिवाणू वैरण, खाद्य, पाणी किंवा पशुपालनात वापरण्यात येणाऱ्या उपकरणावर प्रसारित होतात. निरोगी जनावरे आजारास बळी पडतात.

  • पावसाळ्याच्या उत्तरार्धात आणि त्यानंतर हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र इतर ऋतूमध्ये सुद्धा आजाराचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.

  • जनावरांवर ताण आल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. जनावर आजारास लगेच बळी पडते.

...असा होतो आजार

  • जिवाणू संवेदनशील जनावराच्या शरीरात गेले की ते टॉन्सिल्स आणि गळ्यातील उतींमध्ये वाढतात. त्यानंतर ते बाधित जनावराच्या रक्ताभिसरण संस्थेत प्रवेश करतात. परिणामी, जनावरांना ताप येतो. रक्तावाटे जिवाणू शरीराच्या इतर भागातील उतींमध्ये प्रवेश करतात. त्या ठिकाणी त्यांची झपाट्याने वाढ होते.

  • जिवाणूने स्रवलेल्या विषारी द्रव्यांमुळे विविध अवयवामधील उतींना इजा निर्माण होते. ही द्रव्ये शरीरभर पसरून जनावरास अत्याधिक ताप येतो.

  • आजारात प्रामुख्याने जनावरांच्या श्‍वसनमार्गावर वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे श्‍वसनसंस्था पूर्णपणे प्रभावित होऊन जनावरांच्या श्‍वासोच्छ्वास करण्यास अडचण येते. हा घात सहन न झाल्याने बाधित जनावर अचानक कोलमडते व मृत्यू पावते.

निदान

  • लक्षणांवरून रोगाचे निदान करता येते.

  • आजारी जनावराच्या रक्त नमुन्यांची प्रयोगशाळेतून तपासणी करावी.

  • मृत जनावराचे शवविच्छेदन करून रोगनिदान करता येते.

लक्षणे

आजाराची लक्षणे दिसण्यास बाधा झाल्यापासून साधारणतः एक ते तीन दिवस लागतात. यामध्ये अतितीव्र आणि सौम्य अशी दोन प्रकारची लक्षणे दिसून येतात.

अतितीव्र लक्षणे

या प्रकारात लक्षणे दिसण्याच्या चोवीस तासांच्या काळात मृत्यू येऊ शकतो. जनावरांना ताप येणे, हगवण लागणे, गळ्याला सूज इत्यादी लक्षणे दिसतात.

सौम्य लक्षणे

  • अचानक ताप येतो. ताप १०६ ते १०७ अंश फॅरानहाइटपर्यंत जातो.बाधित जनावरांचे डोळे लाल होतात. जनावर अस्वस्थ होते, भूक मंदावते. हालचाल कमी होते, पोटात दुखते, हगवण लागते. गळ्याला सूज येऊन खाण्यास व गिळण्यास त्रास होतो.

  • मान, डोके किंवा पुढील पायांना सूज येणे. मानेच्या भागातील लसिका ग्रंथींना सूज येते. जनावरांना श्‍वास घेण्यास खूप त्रास होतो. घशातून घरघर आवाज येतो.

  • बाधित जनावराचे नाक वाहू लागते. जनावराला छातीत खूप वेदना होतात. जीभ कोरडी पडून बाहेर येते. परिणामी, जनावर तोंडाने श्‍वास घ्यायला सुरवात करते.वेळेत उपचार न केल्यास बाधित जनावर २४ ते ४८ तासांत दगावते.

Animal Care
Animal Disease : राधानगरी, कागलमध्ये ‘घटसर्प’मुळे अकरा जनावरे दगावली

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • आजारावर औषधोपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब हाच जनावरांना वाचविण्याचा उपाय आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (एप्रिल- मे महिन्यांत) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

  • लहान वासरांना सहा महिने वयाची असताना लसीची पहिली मात्रा, दुसरी मात्रा तीन महिन्यांच्या फरकाने द्यावी. त्यानंतर दरवर्षी एक मात्रा द्यावी.

  • लसीकरणापूर्वी कृमिनाशक औषधे व परजीवी कीटकांचे निर्मूलन करावे. जेणेकरून लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येतात. जनावरांना संतुलित आहार द्यावा. जेणेकरून जनावरांमध्ये योग्य प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल.

  • गोठा नियमित स्वच्छ ठेवावा.

  • पावसाळ्यात जनावरांना उघड्यावर चरायला सोडू नये. आजारी जनावरांना नदी, तलाव इत्यादी ठिकाणी पाणी पिऊ देवू नका.बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. त्यांचे खाद्य-पाणी व्यवस्थापन स्वतंत्र करावे.

  • पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बाधित जनावरांवर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, जनावर दगावण्याची शक्यता असते.

  • मरतुक झालेल्या जनावराची जमिनीत खोलवर पुरून किंवा जाळून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी.

- डॉ.सागर जाधव, ९००४३६१७८४

(लेखक बाचणी,जि. कोल्हापूर येथे पशुसंवर्धन अधिकारी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com