Animal Care
Animal CareAgrowon

Animal Disease : जनावरांमधील जिवाणूजन्य आजार : लिस्टेरिओसिस

Animal Care : लिस्टेरिओसिस आजार प्रामुख्याने लिस्टएरिया मोनोसाईटोजन जिवाणूमुळे होतो. लिस्टेरिओसिस हा एक झूनोटिक आजार आहे. जनावरांपासून माणसाला किंवा माणसापासून जनावरांना होऊ शकतो. त्यामुळे आजाराची लक्षणे तपासून उपचार करणे आवश्यक आहे.
Published on

डॉ. स्वाती साखरे

जनावरांपासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीवजन्य आणि बुरशीजन्य या प्रकारात विभागले जातात. असे आजार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या पशुपालकाला होण्याची शक्यता असते, याला झूनोटिक आजार म्हणतात. लिस्टेरिओसिस हा एक झूनोटिक आजार जो जनावरांपासून माणसाला किंवा माणसापासून जनावरांना होऊ शकतो.

लिस्टेरिओसिस प्रामुख्याने लिस्टएरिया मोनोसाइटोजन नावाच्या जिवाणूमुळे होतो. मनुष्यामध्ये लिस्टएरिया हा गर्भवती महिलांना, नवजात बालकांना, ६५ किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांना आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांमध्ये इन्सिफलाइटिस, सेफ्टीसेमिया आणि गर्भपात होऊ शकतो. कळपाचे रोगग्रस्त होण्याचे प्रमाण साधारणपणे १० टक्के एवढे असते, तर मृत्युदर जवळ जवळ १०० टक्के आहे.

Animal Care
Animal Care : शिफारशीत वेळेत जंतनिर्मूलन आवश्यक

प्रसार ः

  • आजारी जनावरांची लाळ, विष्ठा, मूत्र, दूध, गर्भाशयातील स्राव.

  • तोंडातून ट्रायजेमिनल या मज्जातंतूद्वारे जंतूचे संक्रमण होते.

  • दूषित स्त्रावामुळे दूषित झालेला चारा जनावरांनी खाल्ल्यावर जिवाणू आतड्याच्या श्‍लेषमल त्वचेद्वारे प्रवेश करतो आणि तेथून रक्तामध्ये प्रवेश करतो त्यामुळे बॅक्टेरियाची स्थिती तयार होते.

  • खराब झालेल्या सायलेज (कमी आम्लीय सामू) सेवन केल्यामुळे जनावरांमध्ये होऊ शकतो.

Animal Care
Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

जनावरांमधील लक्षणे ः

  • लक्षणे ही जिवाणूंच्या स्वरूप व प्रकारावरून ठरतात.

  • चिंताग्रस्त स्वरूपाचा प्रकार मेंदू व चेतासंस्थेचा आजार, हा प्रकार सर्व प्राण्यांमध्ये आढळतो, परंतु मेंढीमध्ये तो अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. या प्रकारामध्ये जनावराचा मृत्यू तीन ते चार दिवसांत होतो.

  • तापमानात वाढ झाल्यामुळे जनावरे सुस्त दिसतात, मान एकीकडे खेचून जनावरे वर्तुळाकार पद्धतीने फिरतात त्यामुळे यास गोलाकार फिरण्याचा आजार किंवा सरकलिंग डीसिज असे म्हणतात.

  • एकतर्फी कान, पापण्या, ओठ व डोळ्यांसह चेहऱ्याचा पक्षघात होऊ शकतो.

  • शेवटी जनावर एका बाजूला पडून श्‍वसनाची क्रिया निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडू शकतो.

  • गाभण जनावरांच्या गर्भाशय संसर्गास हे जिवाणू अति संवेदनशील असतात, त्यामुळे गाभण जनावरे तिसऱ्या तिमाहीमध्ये गाभडतात.

  • डोळ्यात लालसरपणा, डोळ्यांतून पाणी येणे, धूसर दिसते.

माणसांमधील लक्षणे ः

गर्भवती महिलांमध्ये सामान्यतः ताप येणे, स्नायू वेदना, फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशा महिलांमध्ये गर्भपात २० टक्के) अकाली प्रसूती, नवजात बालकाचा मृत्यू (३ टक्के).

निदान ः

सिरोलॉजी चाचणी,     एलिझा, अँटिबायोटिक संवेदनशील चाचणी

प्रतिबंध आणि नियंत्रण ः

आजारी जनावर वेगळे करून त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करून काळजी घ्यावी.

आजार बरा झाल्याची खात्री झाल्यानंतरच गोठ्यातील जनावरांमध्ये मिसळावे.

कच्चे दूध प्यायल्यामुळे लिस्टएरिया होतो, त्यामुळे दूध उकळून प्यावे किंवा लिस्टएरिया झालेल्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचे सेवन करू नये.

कत्तलखान्यात काम करणारे कामगार व पशुवैद्यक तसेच जनावरांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

जनावरांना कुजलेल्या भाज्या खाऊ घालू नये.

रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.

रोगप्रतिकार शक्ती कमी झालेले जनावरे याच्या प्रादुर्भावासाठी अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे या आजारामध्ये योग्य खबरदारी वेळेवर घेणे आवश्यक आहे.

डॉ. स्वाती साखरे, ९५६१९९१२९४

(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com