Gaushala Transformation: गोशाळा हवी तंत्रज्ञानाने समृद्ध

Cow Shelter Innovation: गोशाळेच्या तांत्रिक पालकत्वात गोविज्ञान, सुधारित गोवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन, वैचारिक धारणेला अनुसरून तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरतो. गोशाळेत मनुष्यबळाचा वापर आणि अवलंबित्व कमी करत यांत्रिकीकरणावर भर द्यावा.
Gaushala
Gaushala Agrowon
Published on
Updated on

डॉ. नितीन मार्कंडेय

Cowshed Self-sufficient: राज्यातील गोशाळांना पडलेला यक्षप्रश्‍न म्हणजे कुणी पालकत्व स्वीकारून आत्मनिर्भर करणाऱ्या गोशाळांची निर्मिती करू शकेल काय? गोशाळा संचालक, गोप्रेमी, गो हितचिंतक, गोरक्षक अशा अनेक नावात असणारे सामाजिक वजन ‘गोपालक किंवा गोशाळा पालकत्व’ या शब्दांना आणि पदांना नाही. माझी नाही ती गोशाळा मी का सांभाळू, असा पवित्रा नेहमी घातक ठरतो. गोशाळा संचालक झालो तर गोशाळेची जबाबदारी स्वीकारेन म्हणजे पालकत्व स्वीकारेन, असेही उत्साही गोप्रेमी दिसून येतात.

राज्यात, गोसेवा आयोग स्थापन झाल्यामुळे आयोगानेच राज्यातील सगळ्या गोशाळांचे पालकत्व स्वीकारले आहे, आता दुसऱ्या पालकाची गरज नाही, असाही विचार करणारी मंडळी आहेत. मात्र निरिच्छ भावनेतून गोशाळेचे पालकत्व स्वीकारण्यासाठी काही ज्येष्ठ, अनुभवी, तज्ज्ञ, ज्ञानवंत मंडळींची राज्याला मोठी गरज आहे. याचे महत्त्वाचे कारण असे, की शासनाचा गोसेवा आयोग गोशाळांना मार्ग दाखविण्याचे काम करेल, मात्र मार्गक्रमणासाठी बोट धरणारा विश्‍वासू सहकारी गोशाळा पालकत्वासाठी निश्चित गरजेचा आहे.

गोशाळेचे संचालक हे मुळातच गोशाळेचे पालक असतात. अशा दातृत्ववान संचालकांनी आर्थिक पालकत्व स्वीकारल्यामुळेच गेल्या शंभर वर्षांपासून गोशाळा कार्यरत आहेत. मात्र आत्मनिर्भर गोशाळेसाठी तांत्रिक पालकत्व स्वीकारण्याची गरज समजून घेतली पाहिजे. तांत्रिक पालकत्वात गोविज्ञान, सुधारित गोवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन, वैचारिक धारणेला अनुसरून तंत्रज्ञानाचा वापर, मनुष्यबळाचा वापर आणि अवलंबित्व कमी करत यांत्रिकीकरणावर भर अशा अनेक बाबी समाविष्ट असतात. तांत्रिक पालकत्वामुळे गोशाळा आत्मनिर्भर होण्यास गतिमानता प्राप्त होते.

Gaushala
Cow Conservation: गोशाळांना भेटी देऊन महत्त्व समजून घेणार

सेंद्रिय शेतीला चालना

राज्यात शासनाच्या पुढाकारातून सेंद्रिय शेतीची चळवळ सुरू असून कृषी विद्यापीठांच्या संशोधकांनी त्यात अधिक लक्ष दिले आहे. गोआधारित सेंद्रिय शेती याबाबत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन गोसेवा आयोगाने केले असले, तरी या पद्धतीचा सर्वदूर उपयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गोशाळांचा पुढाकार म्हणजेच आत्मनिर्भर गोशाळेचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा सुकर मार्ग ठरतो. गोमय आणि गोमूत्र यांचा पुरेपूर वापर शेतीसाठी होण्यास आणि त्या निमित्याने शेतीतील रसायन अवशेषमुक्त उत्पन्नासह गोशाळेचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होऊ शकते. तेव्हा गो आधारित सेंद्रिय शेतीच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांना गोशाळेचे पालकत्व प्रदान करणे महत्त्वाचे ठरेल.

गोपालना बाबत राज्यात अनेक शासकीय आणि इतर संस्था प्रशिक्षण आयोजित करतात, मात्र बंदिस्त अभ्यास वर्गातील प्रशिक्षण प्रात्यक्षिकाविना नेहमी दिसून येतात. अशा प्रकारची जिल्ह्यातील सगळी प्रशिक्षणे गोशाळेत गायीसमोर प्रत्यक्ष मार्गदर्शनात घडून आल्यास अधिक प्रभावी ठरतील. स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या संस्था आणि बँका सुद्धा गोशाळेतील प्रशिक्षणातून अधिक समर्पक माहिती लाभार्थींना प्रदान करू शकतील. या पद्धतीचा उपयोग गोशाळांना नियमित आर्थिक उत्पन्नाच्या स्रोत निर्माण करण्यात असल्यामुळे यासाठी गोशाळांचा पुढाकार उपयुक्त ठरेल.

सेवानिवृत्त पशुवैद्यकांची साथ

गोशाळाचे पालकत्व गोवंश सांभाळ करणाऱ्या प्रत्येकाला शक्य आहे, मात्र गोविज्ञान चांगल्या प्रकारे माहिती असणाऱ्या आणि सेवानिवृत्तीच्या काळात थोडासा वेळ समाजकार्यासाठी देण्यास शक्य असणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून निश्चित मिळणे शक्य आहे. राज्यात जवळपास ५००० ज्येष्ठ आणि सेवानिवृत्त पशुवैद्यक उपलब्ध असून, जिल्हानिहाय अशा किमान ५० पशुवैद्यकांचा चमू गोशाळांसाठी सहज उपलब्ध आहे.

गोशाळांच्या पालकत्वासाठी सुरुवातीला दर महिन्यास एकदा गोविज्ञान शिफारशी मिळवण्याचा आग्रही प्रयत्न गोशाळांनी केला तर पुढे भविष्यात त्याच दिशादर्शक माहितीच्या आधारे गोशाळांना प्रगती साधता येईल. अर्थात, राज्यात कार्यरत असणाऱ्या पशुसंवर्धन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, पैदासकार संघटना, गोवंश प्रेमी यांच्याकडूनही गोशाळांचे सहज पालकत्व स्वीकारणारी मंडळींना विनंती केल्यास तेही पुढे येतीलच.

गोशाळांच्या पालकत्वासाठी शुभारंभ झाल्यास मिळालेल्या शिफारशींची गती कमी असली तरी अवलंबात येण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे. वय अथवा वंशनिहाय विविध कप्प्यांतून गोव्यवस्थापन अशी शिफारस झाल्यास दर महिन्यास किमान एक तरी कप्पा गो शाळेत निर्माण केला तर असा बीन खर्चिक कार्यात्मक सहभाग गोशाळांना सिद्ध करता येईल. ज्येष्ठ अनुभवी पशुवैद्यकांच्या शब्दावर गोशाळेसाठी औषध कंपन्या, सामाजिक प्रतिष्ठान, सेवाभावी संस्था विविध प्रकारे मदत करू शकतील. महत्त्वाची बाब अशी, की गोविज्ञानातील मथितार्थ कार्यात्मक स्वरूपात गोशाळेत राबवण्यासाठी आधी मानसिक बदल घडविण्याची वैचारिक तयारी होईल, आणि यातूनच पुढे गोशाळेचे कार्य गोविज्ञानातून निरंतर सुरू राहील.

Gaushala
Cow Rearing: गोपालनात खाद्य, आरोग्याचे काटेकोर नियोजन

आत्मनिर्भर गोशाळेसाठी पर्याय

राज्यातील अनेक गोशाळा दैनंदिन गोमय आणि गोमूत्र संकलन यातून निर्भरता मिळविण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र गोमयाचा पावटा असल्याशिवाय संकलन होत नाही आणि गोमूत्रासाठी पहाटेचे केवळ पहिले संकलन केले पाहिजे. आजारी गोवंशाचे गोमय गोमूत्र उत्पादनांसाठी वापरता येत नाही. गाईंच्या बाबतीत माजाचे दोन-तीन दिवस, प्रसूतीपूर्वी आणि नंतर एक महिना यासोबतच वासरे आणि कालवडी यांचे गोमूत्र संकलन अपेक्षित नाही.

उपलब्ध माहितीनुसार गोमय आणि गोमूत्र याचे ग्रामीण स्तरावर उत्पादित होणारे किमान एक हजार प्रकार माहिती करून घेणे फायद्याचे ठरते. मूल्यवर्धित गोमय, गोमूत्र उत्पादनांना विक्रीसाठी राज्य गोसेवा आयोगातर्फे पथदर्शक, दिशादर्शक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, त्यात नावीन्य आणि भर घालण्याचे काम मात्र केवळ गोशाळांकडूनच अपेक्षित आहे. गोमय- गोमूत्र आधारित सगळी उत्पादने महिला बचत गटाच्या श्रमशक्तीतून, कमी खर्चात, करार पद्धतीत तयार करणे प्रत्येक गोशाळेत सहज शक्य आहे.

शेती कामासाठी नर गोवंश करार पद्धतीने अल्पकाळासाठी शेतकऱ्यांना सहज देता येतो. नर गोवंशांकडून ऊर्जा निर्माण करणाऱ्या पद्धती कृषी विद्यापीठाने निर्माण केल्या असल्या तरी त्याचा वापर अत्यल्प आहे. गोशाळेपुरते विद्युत निर्मिती, श्रमशक्ती यासाठी नवीन तंत्र अनेक गो शाळेत उपलब्ध नाहीत. पैदाशीसाठी तयार वयाचा प्रत्येक नरगोवंश दर दिवशी गोशाळेसाठी आपली शारीरिक ऊर्जा ओढकाम, वाहतूक, ऊर्जा निर्मिती, शेती कामातून चारा निर्मिती अशा अनेक प्रकारे वापरला जाणे अपेक्षित असून, काहीही काम न घेता नर गोवंश नुसताच सांभाळणे अत्यंत चुकीचे असते.

गोशाळा जनसमाजासाठी उघडी असावी. नागरिक नियमित गोशाळेत येऊन गोसेवा करू शकतात. गोसहवास, गोखरारा, गोवत्स सहवास यातून आनंद मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी गोप्रवचन, गोकीर्तन, गोवाचनालय, गोभजन यासाठी साधी बसण्याची जागा उपलब्ध केल्यास नियमित निधी प्राप्त होऊ शकतो. सप्तधेनू मंदिर, वार्षिक सण- उत्सव साजरे करून गोशाळा समाजाशी जोडता येते. गोवंशाचा वाढदिवस आणि गोप्रेमींचा वाढदिवस गोशाळेत दररोज साजरा करता येतो,

गोवंश शुद्धतेवर उत्पादकता निश्चित अवलंबून असते आणि गोशाळेतील एकूण संख्येपैकी २५ प्रतिशत प्रजननशील राहिल्यास गोशाळेत आत्मनिर्भर निधी संकलन शक्य होते. गोशाळेतील दुधाचा वापर वत्स संगोपन, आजारी गोवंश पोषण, सगळ्या गोवंशास नियमित ताक उपलब्धता अशा अनेक प्रकारे थेंबभर विक्री न करता होऊ शकतो, मात्र नकारात्मक मानसिकतेमुळे दुधाशिवाय गोशाळा शक्य असल्याचा आत्मघातकी प्रयोग अनेक ठिकाणी सुरू आहे. गोशाळेत निर्माण होणाऱ्या अधिकच्या कालवडी तरुण नवशिक्षित उद्योजकांना दूध व्यवसायासाठी द्याव्यात. राज्यातील दूध उद्योगास चालना मिळू शकते.

दूध व्यवसायासाठी लाखो रुपये किमतीच्या गाई कालवडी आणून पायावर दगड पाडून घेतात. त्याऐवजी गोशाळेकडून घेतलेल्या गोवंशावरही व्यवसाय करणे शक्य आहे.

- डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१

(लेखक महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com