
नगर ः ‘‘सध्या देशातील शुद्ध देशी गोवंशाची (Indigenous Cow) घटती संख्या पाहता जलदगतीने उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या गाईची संख्या वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण (Embryo Transplantation Technology) तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत गरजेचा आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांच्या दारात होणे आवश्यक आहे. याची सुरुवात झाल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत.
भविष्यात उच्च दर्जाच्या देशी गायी तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही,’’ असे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने यांनी सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे अंतर्गत खंडाबे (ता. राहुरी) येथील पशुपालक सुरसिंग पवार यांच्या गोठ्यातील संकरित कालवडीमध्ये सहिवाल जातीच्या देशी गाईचे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान उपक्रमाचा प्रारंभ डॉ. माने यांच्या हस्ते झाला.
‘‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या गोठयात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या वापरास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रावर चार गीर व दोन सहिवाल कालवडीचा जन्म संकरित गाईंच्या माध्यमातून झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० सहिवाल, गीर, थारपारकर, राठी, व लाल सिंधी या उच्च वंशावळीच्या देशी जातीच्या कालवडी निर्माण करण्याचा मानस आहे,’’ अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.