Animal Husbandry : पशुपालनातून झाले आर्थिकदृष्ट्या सक्षम

Success Story of Farmer : पंधरा ते वीस वर्षांपासून निकम कुटुंब पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करत आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी त्यात टप्प्याटप्प्याने जनावरांच्या संख्येत वाढ करत व्यवसायाचा विस्तार केला आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

शेतकरी : लक्ष्मण बाबासाहेब निकम

Management of Animal Husbandry : नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील काही भागांत पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. तसेच चारा उत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने येथील शेतकरी दुग्ध व्यवसायाला अधिक प्राधान्य देत आहेत. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील लक्ष्मण बाबासाहेब निकम हे सर्वसाधारण शेतकरी.वडिलोपार्जित चार एकर शेती.

पंधरा ते वीस वर्षांपासून निकम कुटुंब पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करत आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी त्यात टप्प्याटप्प्याने जनावरांच्या संख्येत वाढ करत व्यवसायाचा विस्तार केला आहे. आधी त्यांच्याकडे सहा ते सात गाई होत्या. सध्या गोठ्यामध्ये एकूण सतरा गाई व पाच कालवडी आहेत.

जनावरांसाठी चार एकर क्षेत्रापैकी दोन एकरांवर गिन्नी गवत, घास, कडवळ आदी चारा पिकांची लागवड आहे. तर उर्वरित दोन एकरांत हंगामी पिके घेतली जातात. गायींसाठी मागील एक वर्षापूर्वी त्यांनी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. मागील पंधरा-वीस वर्षांपासून त्यांनी एचएफ गायींच्या संगोपनावर भर दिला आहे.

अलीकडच्या काळात गाईंच्या संख्येत वाढ केली. प्रतिदिन साधारण ११५ ते १२० लिटर दुधाचे संकलन होते. गोपालन व्यवसायामध्ये शास्त्रशुद्ध व्यवस्थापन या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे व्यवसाय अधिक वृद्धींगत होत गेला. त्यातून कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होत गेल्याचे लक्ष्मण निकम सांगतात. दुग्ध व्यवसायात कुटुंबाची मोलाची साथ लक्ष्मण यांना मिळते.

Animal Husbandry
Animal Husbandry Development : ‘पोकरा’, ‘स्मार्ट’मधून पशुवंर्धन विकासासाठी मदत करू

व्यवस्थापनातील बाबी

पशुपालन व्यवसाय करताना व्यवस्थापनाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो, असा त्यांचा अनुभव आहे. त्यात मुक्तसंचार गोठा महत्त्वाचा ठरल्याचे श्री. निकम सांगतात.

गोठ्यातील दैनंदिन कामांना दररोज सकाळी पाच वाजता सुरुवात होते. प्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला बांधल्या जातात. दूध काढणीसाठी यंत्राचा वापर केला जातो. दूध काढणी पूर्ण झाल्यावर चारा व खुराक दिला जातो.

एका गाईला दररोज सकाळी साधारण सात ते आठ किलो चारा दिला जातो. त्यात गिन्नी गवत, कडवळ, ऊस, मुरघास याची कुट्टी करूनदिली जाते. सकाळी देण्यासाठीची कुट्टी रात्रीच तयार करून ठेवली जाते.

मुक्तसंचार गोठ्यामध्येच पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

खुराकामध्ये गोळीपेंड, सरकी पेंड यांचा समावेश असतो. दुभत्या गाईंना त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार दोन ते तीन किलो गोळीपेंड व अडीच किलोच्या आसपास सरकी पेंड दिला जातो. त्यासोबत साधारण पन्नास ग्रॅम पूरक खाद्य प्रति गाय याप्रमाणे दिले जाते. हे सर्व चाऱ्यात मिसळून एकत्रित दिले जाते. त्यामुळे चारा खाण्यासह गायी पाणी अधिक पीत असल्याचा निकम यांचा अनुभव आहे.

संध्याकाळी चार वाजता पुन्हा दूध काढणी केली जाते. त्यानंतर चारा व अन्य कामांना सुरुवात होते. सकाळप्रमाणेच सायंकाळी देखील चारा, खुराक दिला जातो.

Animal Husbandry
Animal Husbandry : पशुपालनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार

वासरांचे व्यवस्थापन

लहान वासरांची विशेष काळजी घेतली जाते. वासरू जन्मल्यानंतर साधारण एक महिना त्यांना गाईला थेट दूध पाजले जाते. त्यानंतर एक महिन्याने त्यांना वेगळे बांधून दूध पाजले जाते.

वासरांच्या वाढीसाठी आवश्यक तो खुराक दिला जातो.

लसीकरणावर भर

लम्पी, लाळ्या खुरकुत यांचे प्राधान्याने सहा महिन्याला लसीकरण केले जाते. मागील दोन दोन महिन्यापूर्वीच लम्पीचे तर लाळ्या खुरकुताचे अडीच महिन्यापूर्वी प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे.

पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार जंताच्या गोळ्या दिल्या जातात.

मुक्त संचार गोठ्यामध्ये कोंबड्या देखील सोडल्या आहेत. त्यामुळे डास, गोचिड यांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. गोठ्यात डासांचे प्रमाण अधिक झाले तर कडूनिंबाचा वाळलेला पाला जाळून धूर केला जातो. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

रासायनिक खतांवरील खर्चात बचत

लक्ष्मण निकम यांच्याकडील पशुपालनातून दरवर्षी सुमारे पस्तीस ते चाळीस टन शेणखताची उपलब्धता होते. त्यातील बहुतांश खताचा शेतातील पिकामध्ये तसेच चारा लागवडीमध्ये वापर केला जातो. शेतामध्ये मागील ७ ते ८ वर्षांपासून शेणखत वापरावर भर दिला आहे. त्यामुळे रासायनिक

खतांवर साधारण १० टक्के खर्च कमी झाला आहे. शेणखताच्या वापरामुळे शेती सेंद्रीय होत असून मातीतील सेंद्रीय कर्ब वाढीस लागला आहे. त्यामुळे दर्जेदार चारा उत्पादनासह हंगामी पिकांचे उत्पादन मिळते आहे. त्याशिवाय स्वतःच्या शेतामध्ये वापरून शिल्लक राहिलेले शेणखत विक्रीचे नियोजन केले जाते. साधारणपणे ४ हजार रुपये प्रति ट्रॉली दराने शेणखत विक्री होते.

- लक्ष्मण निकम, ९७६६१९९४९०

(शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com