Nashik News : ‘‘गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनांमध्ये रेसिड्यू फ्री उत्पादन घेताना कीड व रोगांच्या उपाययोजनांसाठी रासायनिक फवारण्या हा आधार आहे. प्रत्यक्षात अचूक नियंत्रण करण्यासाठी प्रादुर्भावाची कारणे शोधून उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
नुसतीच खर्चवाढ करण्यापेक्षा द्राक्ष उत्पादनात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे महत्त्वाचे आहे,’’ असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आणि द्राक्ष शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सावंत यांनी व्यक्त केले.
‘ॲग्रोवन द्राक्ष प्रदर्शन २०२३’चे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील ठक्कर्स डोम, एबीबी सिग्नलजवळ येथे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.१) ‘गोड्या छाटणीनंतरचे नियोजन व रासायनिक अवशेष व्यवस्थापन’या विषयावर तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. सावंत बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले,‘‘केवडा व भुरी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी इनॅक्युलम नियंत्रण हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. छाटणीनंतर ५० दिवसांच्या पुढे कुठल्याही प्रकारची बुरशीनाशके व कीटकनाशके फवारणी शिफारशीनुसार व योग्य काळजी घेऊनच करणे महत्त्वाचे ठरते.
प्रत्यक्षात इनॅक्युलम दिसून येताच तो कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. डाऊनी मिल्ड्यू जमिनीत जायला नको. पानावर डाऊनी असल्यास पाने मातीमध्ये गेल्यास जमिनीतून प्रादुर्भाव वाढायला वेळ लागत नाही. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पाने व घड यांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी.’’
‘‘सध्या जैविक नियंत्रणात ट्रायकोडर्मा हा चांगला पर्याय आहे. द्राक्ष हंगामामध्ये बागेतील झाडे सक्षम व सशक्त असणे गरजेचे ठरते. झाडे प्रतिकारक असतील तर रोग नियंत्रणातील आव्हाने कमी होतात. काडी पक्व झाल्यास त्याचा परिणाम कमी असतो. बागेत आर्द्रता वाढल्यास रोगाची लक्षणे वाढून पानांवर दिसून येतात. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पूर्वा केमटेक हे आहेत.
कॅनॉपी व्यवस्थापन व नव्या वाणांवर आज मार्गदर्शन
द्राक्ष प्रदर्शनात आज (ता. २) दुपारी १२ ते १ या वेळेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर हे ‘कॅनॉपी व्यवस्थापन’ या विषयावर, दुपारी १ ते २ वेळेत प्रगतिशील द्राक्ष बागायतदार गणेश मोरे ‘द्राक्षातील नवे वाण, गुणवत्ता व आव्हानांवर मात’ या विषयावर मार्गदर्शन करतील. द्राक्ष प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.