Dairy Farming
Dairy Farming Agrowon

Cattle Farming : कष्टाच्या जोरावर गोसंगोपनातून उभारी

Dairy Farming : सातारा जिल्ह्यातील आसले (ता. वाई) येथील सूरज नीलकंठ निगडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने कौटुंबिक स्थिती हलाखीची असतानाही कष्टाच्या जोरावर व कुटुंबाच्या साथीने दुग्ध व्यवसायात प्रगती साधली आहे.
Published on

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गापासून जवळच असलेले आसले (ता. वाई) हे गाव. याच गावातील अल्पभूधारक सूरज नीलकंठ निगडे हे तरुण शेतकरी. वडील नीलकंठ हे वीज ठेकेदाराच्या हाताखाली काम करत होते. अवघी ५५ गुंठे शेतजमीन तीही कोरडवाहू.

कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. कौटुंबिक परिस्थितीची जाण असल्याने सूरज यांनी शालेय जीवनापासून सुट्टीच्या दिवशी मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. मिळेल ते काम करण्याची तयारी सूरज यांनी ठेवली होती. वडीलांकडून घरातील लाइट फिटिंगची कामे शिकले. त्यातून दोघांच्या कमाईतून घराचा आर्थिक डोलारा काटावर भागत होता.

Dairy Farming
Dairy Farming : सचोटी, प्रामाणिकता अन् एकीतून यशस्वी दुग्ध व्यवसाय

मावशीने केली सुरुवात

निगडे कुटुंबाची आर्थिक अडचण बघून सूरज यांच्या मावशीने स्वतःकडील एक एचएफ गाई अर्धलीन तत्त्वावर दिली. घराजवळ पाचट, कुडाचा गोठा करून त्यात गाईचे संगोपन सुरू केले. या गाईच्या दूध उत्पादनातून थोडा आर्थिक हातभार लागू लागला.

इतर कामांबरोबर सूरज गाईचे संगोपन करू लागले. यातून या व्यवसायाची गोडी निर्माण झाली. २०१३ मध्ये प्रिया यांच्यासोबत सूरज यांचे लग्न झाले. प्रिया याही कष्टाळू आहेत. प्रिया यांनी माहेरहून अर्धलीने एक म्हैस आणली. जोडीला दोन शेळ्या घेतल्या. हा असाच प्रवास चार वर्षे सुरू होता.

कुडाचा गोठा

दुग्ध व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ असे सूरज यांना वाटू लागले. पुढे गोठ्याचा विस्तार करण्याचे ठरले. घराजवळ असलेला गोठा मोकळ्या जागेत नेला. २०१६ मध्ये कडब्याचे कूड, पाचट यांचा वापर करत १५ बाय १२ फूट आकाराचे शेड उभारले. आता यामध्ये चार जनावरांचे संगोपन होऊ लागले. दरम्यानच्या काळात नवीन गाई खरेदी करण्याचा विचार मनात आला. पण पैशाची चणचण असल्याने ते शक्य नव्हते. मात्र इच्छा असल्याने मित्राच्या मामाकडून एक गाय अर्धलीन तत्त्वावर आणली.

तसेच बचत गटाचे कर्ज काढून पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने एक गाय आणली. यामुळे गोठ्यात तीन गाई, दोन कालवडी, दोन म्हशी व चार शेळ्या झाल्या. दूध उत्पादन व शेणखत विक्रीतून मिळणाऱ्या पैशांची बचत सुरू केली. पुढे २०१७ मध्ये गोठा चांगला करण्यासाठी भंगारातून साहित्य आणत २८ बाय १५ लांबी रुंदीचा दोन पाखी गोठा उभा केला. या गोठ्याची उभारणी देखील मजूर न लावता स्वतः कष्ट करून कल्पकतेने केली. दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमधून कर्ज फेडून, पुन्हा नवीन कर्ज घेत गाईंची खरेदी करण्यास सुरुवात केली.

समस्येतून काढला मार्ग

गोठ्यातील गाईंपासून दूध उत्पादन सुरू होते. प्रतिदिन ३० ते ३५ लिटर दूध उत्पादन मिळत असे. मध्यंतरी निगडे दांम्पत्याला एका प्रतिकूल घटनेला सामोरे जावे लागले. यामध्ये एक दुभती गाई व एक वासरू गमवावे लागले. यामुळे गाईची वाढलेली संख्या पुन्हा ‘जैसे थे’ झाली. सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच सूरज यांच्यासमोर नवी समस्या उभी राहिली. गोठ्यातील सर्वांत जास्त किमतीची व उत्पादनाने मोठ्या असलेल्या गाईस संसर्ग झाला. त्यात ती गाय देखील हातून जाण्याची दुर्देवी वेळ दाम्पत्यावर आली.

बाजारभावाप्रमाणे या गाईची किंमत सुमारे एक ते दीड लाख रुपये इतकी होती. सूरज यांचा आधार तुटल्यागत झाला. गोठ्यातील दोन गाई गेल्याने लोकांचे टोमणे सुरू झाले. निंदानालस्ती झाली, तरीही सूरज खचले नाहीत. नुकसान झाले असले तरीही आपण लढायचे असा मानस ठेवला. कोरोनामुळे दुधाचे दर कमी झाले, तरी व्यवस्थापन सुरू ठेवले. या काळात नऊ जनावरांचे संगोपन सुरू ठेवले. कोरोनाच्या काळातही बचत करत काटकसरीने व्यवसायात सातत्य राखले.

गोठ्याचा विस्तार

कोरोनानंतर सूरज यांनी गोठ्याच्या विस्तार वाढीसाठी प्रयत्न केले. जुन्या गाई कमी करत नव्या दमाच्या गायी खरेदी केल्या. दुग्ध व्यवसाय शाश्‍वत वाटू लागल्याने सर्व निगडे कुटुंब या व्यवसायात झटत होते. एका गाईपासून सुरू केलेला व्यवसाय टप्प्याटप्प्याने वाढत गेला. त्यानंतर स्वः कष्टातून सूरज यांनी ६० बाय २८ फूट लांबी रुंदीचे शेड केले आहे. यामध्ये गाई, म्हशी, शेळ्यांसाठी विभाग केले आहेत.यामध्ये ११ एचएफ गाई व पाच वासरे, दोन म्हशी, दोन देशी गाई, सहा शेळ्या असा एकूण २७ जनावरांचा विस्तार केला आहे. दुधाच्या उत्पादनातून सूरज यांनी घर, गोठ्याची डागडुजी, चारचाकी वाहन खरेदी, छोटा ट्रॅक्टर खरेदी केला.

Dairy Farming
Dairy Farming : नियोजनबद्ध दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती

दूध उत्पादन

सध्या गाईंपासून प्रतिदिन १३० लिटर दूध, तर म्हशींपासून १० लिटर दूध उत्पादन मिळते आहे. दूध उत्पादनातून महिन्याला एक ते सव्वा लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत असून, खर्चवजा जाता ३० टक्के रक्कम शिल्लक राहत आहे. तसेच वर्षाकाठी शेणखतापासून एक लाख रुपये, तर शेळ्यांपासून ४० ते ५० हजार रुपये मिळत असल्याचे सूरज सांगतात.

चाऱ्यासाठी मुरघास

जनावरांची संख्या वाढत होती, तसा चारा प्रश्‍न जाणवू लागला. घरच्या ५५ गुंठ्यांपैकी ४० गुंठ्यांत चारा पिकांची लागवड केली. चाऱ्यासाठी मुरघास फायदेशीर असल्याने दोन वर्षांपूर्वी सूरज यांनी मुरघास निर्मितीचा निर्णय घेतला. त्यासाठी कोणताही मोठा खर्च न करता त्यांनी स्वतःकडील कुट्टी मशिनचा वापर केला.

पहिल्या वर्षी उसाच्या वाढ्यांची कुट्टी करून एक टन क्षमतेच्या बँगा भरून त्याद्वारे मुरघास केला. त्या वेळी लोकांनी या प्रयोगाची खिल्ली उडविली होती. मात्र सूरज यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपले काम सुरू ठेवले. दुसऱ्या वर्षी मका खरेदी करत एक टन बँगमध्ये सुमारे १५ टन मुरघास निर्मिती केली. कमी खर्चातील मुरघास निर्मिती आता लोकांना आवडू लागली. पाच शेतकऱ्यांनी सूरज यांच्याकडून मुरघास करून घेतला आहे.

पत्नीचे दागिने ठेवले गहाण

सूरज यांना यशाबरोबर अपयश येत होते. दुभती गाई मरण पावल्याने आर्थिक ताण जाणवू लागला. यातही न खचता पुढे लढण्याची मोहीम सूरज यांनी सुरू ठेवली. गोठ्यातील अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी गाईची संख्या वाढविणे क्रमप्राप्त झाले होते. शेतजमीन कमी असल्याने कर्ज काढणे शक्य नव्हते. यामुळे पत्नी प्रिया यांचे दागिने बँकेत गहाण ठेवून कर्ज काढले.

यातून मिळालेल्या कर्जात जास्त किमतीच्या गाईऐवजी कमी किमतीच्या साधारण गाईची खरेदी केली. या गाईवर काम करत त्यांना धडधाकट केले. गाईंची संख्या वाढल्याने दुधातून मिळणाऱ्या पैशांतून कुट्टी मशिन खरेदी केली. जुने कर्ज फेडत पुन्हा नवीन कर्ज घेऊन गाय खरेदी करणे सुरू ठेवले. कष्ट व ज्ञानातून गोठ्यात दर्जेदार गाईंची संख्या हळूहळू वाढत गेली.

माझ्या मावशीने आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून दिलेली गाय ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने लक्ष्मीच ठरली. एका गाईपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आज २७ जनावरांपर्यंत पोहोचला आहे. गोसंगोपनाने आमच्या कुटुंबाला आर्थिक उभारी देण्याचे काम केले आहे.
- सूरज निगडे, ८६००७६६७०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com