Dairy Farming : नियोजनबद्ध दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती

Dairy Business : एका म्हशीपासून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाचा जिद्द, चिकाटी व अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून आज त्यांनी चांगल्या प्रकारे विस्तार केला आहे.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील निवजे हे माणगावपासून बारा किलोमीटरवर असलेले डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे. पंधरा- वीस वर्षांपूर्वी भातरपिकातील उत्कृष्ट गाव म्हणून ते ओळखले जायचे. मागील दहा- बारा वर्षांत दुग्धक्रांतीमुळे हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर आले आहे.

खरिपात भात तर उन्हाळ्यात चवळी, मूग, कुळीथ, उडीद अशी पिके येथील शेतकरी घेतात. याशिवाय आंबा, काजू यांचाही लागवड आहे. गावाने आता बांबू लागवडीत आघाडी घेतली आहे. थोडक्यात चौफेर विकासासाठी गाव सर्वत्र परिचित झाले आहे.

दुग्ध व्यवसायात उतरलेले परब

निवजे गावात अभय परब आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. लहानपणापासून शेतीची कामे करीतच त्यांची शालेय शिक्षण पूर्ण केले. अर्थशास्त्रातून पदवी घेतली. तीन वर्षे गोवा येथे खासगी कंपनीत नोकरी केली. स्वतःचा व्यवसाय करावा असे त्यांना मनोमन वाटत असे. परंतु घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे झटपट निर्णय घेता येत नव्हता.

अखेर नोकरीला रामराम करीत त्यांनी गाव गाठले. एक वर्ष शेती केली. जोडधंदा असावा म्हणून दुग्ध व्यवसायाचा निर्णय घेतला. स्थानिक म्हैस खरेदी केली. व्यवसायातील कोणता अनुभव नव्हता. परंतु शिकण्याची व सर्व गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती जपली होती. वर्ष- दीड वर्षात म्हशीचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले. काही रक्कम हाती येऊ लागली.

Dairy Farming
Dairy Business : पशुपालनात उत्पादन खर्च नियंत्रित राखण्यावर भर

घर आणि गोठा- एकाच ठिकाणी

हळूहळू अभय यांना व्यवसायात आत्मविश्‍वास येऊ लागला. टप्प्याटप्प्याने म्हशीची संख्या चारपर्यंत नेली. शेण काढणे, धार काढणे, चारा कापणे अशा कामांमध्ये अभय पारंगत झाले. शेणच काढायचे होते तर मग शिक्षण कशाला घेतले अशी टीका काही जण करायचे. परंतु अभय यांनी त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही.

शेती आणि दुग्ध व्यवसाय एकाच ठिकाणी आणि तेही घरालगत असल्यास खूप फायदा होऊ शकेल असे अभय यांना वाटले. त्यामुळे गावात फारशी लोकवस्ती नाही अशा जंगलमय आणि डोंगरपायथ्याशी घर बांधायचा निर्णय घेतला. आई-वडिलांशी चर्चा केल्यानंतर सर्वांचे एकमत झाले. मग घर आणि घरालगत गोठाही बांधला.

व्यवसायाची वृद्धी

स्थानिक जातीच्या म्हशीच्या देखभाल, व्यवस्थापनावर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात तफावत येत होती. अपेक्षित प्रमाणात नफा मिळत नव्हता. मग दुधाचे आगर असलेल्या हरियाना राज्यातून जातिवंत म्हशी आणल्या. अनुभव आणि अभ्यासातून व्यवसायातील बारकावे आत्मसात केले. आता सहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

जोडीला सहा एकर शेती आहे. सन २०१८ मध्ये एका म्हशीपासून व्यवसायाला प्रारंभ झाला होता. सन २०२२ पर्यत स्थानिक चार म्हशी झाल्या. सन २०२२ मध्ये हरियानातून सात म्हशी आणल्या. सध्या सात म्हशी आणि सात रेडकू आहेत. प्रति दिन सरासरी ५० ते ६० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते.

Dairy Farming
Dairy Business : आईच्या शिकवणीमुळेच दुग्धव्यवसायात प्रगती

उत्कृष्ट व्यवस्थापन

अभय यांचे नेटके नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन व्यवसाय वृद्धीत महत्त्वाचे ठरले आहे. वडील महादेव व आई मिनाक्षी यांची मोठी साथ मिळते. पहाटे साडेचार वाजताच साफसफाईपासून गोठ्यातील कामे सुरू होतात. म्हशींना खाद्य, सकाळी साडेसहा वाजता दूध काढणीस सुरुवात होते. सकाळी आठ वाजता दूध डेअरीला नेले जाते.

त्याचवेळी म्हशींना मुक्तसंचार गोठ्यात सोडले जाते. नऊ वाजता हिरवा चारा कापणीचे काम केले जाते. नंतर म्हशींना गोठ्यात आणून स्वच्छ धुतले जाते. त्यानंतर वैरण दिली जाते. सायंकाळी चार वाजता पुन्हा कामे करून संध्याकाळी सात वाजता दूध डेअरीला नेले जाते.

आर्थिक प्रगती झाली

सन २०१८ मध्ये नोंदणीकृत श्री. निवजेश्‍वर डेअरी फार्ममार्फत दूध खरेदी होते. सरासरी प्रति लिटर ६० रुपये दर मिळतो. संस्थेकडून मागील वर्षी दिवाळीला अभय यांना २५ हजार रुपये बोनसही देण्यात आला. या व्यवसायातून घरची आर्थिक व सामाजिक प्रगती करणे अभय यांना शक्य झाले आहे. वार्षिक १० ते १३ लाखांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी मजल गाठली आहे.

सन २०१७ मध्ये स्वगुंतवणुकीतून स्थानिक म्हैस घेणे शक्य झाले. तर हरियानातील म्हैस खरेदीसाठी नऊ लाख रुपये कर्ज घेता आले. सुमारे ४० बाय ३० फूट आकाराचा गोठा बांधला. कडबा कुट्टीचे तसेच दूध काढण्याचे यंत्र खरेदी केले. मुक्त संचार गोठा, जनावरांना डुंबण्यासाठी पाण्याचा तलाव आदी सुविधा तयार केल्या. त्यासाठी भगीरथ प्रतिष्ठान या संस्थेने सुमारे २० हजार रुपयांची मदत पैसे परत देण्याच्या बोलीवर देऊ केली.

अभय झाले प्रशिक्षक

अभय यांनी शेतीकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले आहे. त्यांची एक एकर बांबू लागवड असून, त्यातून ५० हजार रुपये उत्पन्न मिळू लागले आहे. नारळाची ६० तर काजूची १०० झाडे आहेत. घराभोवताली गावठी केळीची लागवड असून त्यांना चांगला दर मिळतो. अभय आता दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देतात.

जिल्ह्यातील दूध संकलन वाढीसाठी सतत धडपडणाऱ्या भगीरथ प्रतिष्ठान संस्थेकडून प्रशिक्षणार्थी अभय यांच्या फार्मवर पाठविले जातात. तीन- चार दिवस मुक्कामही करतात. या काळात दुग्ध व्यवसायातील परिपूर्ण ज्ञान अभय या सर्वांना देतात.

अभय परब, ९४२२५२९६४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com