
डॉ. प्रेरणा घोरपडे, डॉ. प्राची मुंज
Livestock Management : खुरांच्या आरोग्यावरच जनावरांची हालचाल, श्रमक्षमता आणि उत्पादनक्षमता अवलंबून असते. खुरांमध्ये संसर्ग, जखमा किंवा इतर समस्या उद्भवल्यास जनावरांना वेदना होतात. दुधाचे उत्पादन किंवा श्रम करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. हे लक्षात घेऊन खुरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
संसर्गजन्य आजाराशी सामना करताना पशुपालकांच्याकडून खुरांच्या आजाराकडे प्रामुख्याने दुर्लक्ष केले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे याबाबत अपुरी माहिती, खुरांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी लागणारी साधने, तंत्रे आणि आवश्यक कौशल्याची यांची अनुपलब्धता. मात्र हे आजार गंभीर असल्याने त्यावर वेळेवर उपचार आवश्यक आहेत.
खूर हे जनावरांच्या शरीराचा पाया असून ते संपूर्ण वजन सांभाळतात. खुरांची योग्य स्थिती नसेल तर जनावरांना चालणे , उठणे-बसणे, तसेच चारा खाण्यास त्रास होतो. योग्य काळजी घेतल्यास खुरांचे आयुष्य टिकून राहते आणि जनावर अधिक उत्पादनक्षम होते.
समस्यांमुळे होणारे परिणाम
जनावरांमध्ये लंगडण्याची समस्या अतिशय वेदनादायक स्थिती आहे, कारण खुरांच्या आतील संरचना जसे की मज्जातंतू, रक्तवाहिन्या, कंडरा, संवेदनशील कोरिअम, तळ, डिजिटल कुशन, पेडल हाडे, पेडल सांधे आणि खुराचा शृंग प्रभावित होतो. त्यामुळे खुरामध्ये दाह होतो आणि परिणामी लंगडणे, चालण्यात अडचण, उठण्यात त्रास, सतत पडून राहणे इत्यादी समस्या निर्माण होतात.
खुरांच्या समस्यांमुळे जनावरांमध्ये लंगडणे, लॅमिनायटीस, फूट रॉट, किंवा अॅब्सेस यासारखे आजार होतात.
खुरांमध्ये समस्या असल्यास दुधाचे उत्पादन २०-२५ टक्यांपर्यंत कमी होऊ शकते.
बैलांमध्ये वीर्य उत्पादनात घट होते.प्रजनन क्षमतेचा नाश होतो.
समस्यांची कारणे
खुरांच्या समस्या विविध प्राथमिक आणि दुय्यम कारणांमुळे होतात. उत्पादनक्षम जातिवंत गायी उत्पादनात नसलेल्या गायींच्या तुलनेत अधिक त्रस्त होतात. विदेशी आणि संकरित जातींच्या गायींच्या खुरांचा मऊपणा त्यांना कठीण/तीक्ष्ण वस्तू किंवा कडक जमिनीमुळे होणाऱ्या हानीसाठी अधिक संवेदनशील बनवतात. यामुळे खुराच्या तळाला इजा होते आणि नंतर जखम होण्याची शक्यता असते.
उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात गायी जास्त त्रस्त होतात, कारण खुरातील शृंगीय ऊतक सुजतात आणि नुकसान होण्याची शक्यता वाढते. जून ते सप्टेंबर महिन्यांच्या ताणतणावाच्या काळात खुराच्या लंगडण्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो, जो संकरित गायींच्या आरोग्य आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम करतो. खुरामध्ये दडलेली जखम असलेल्या गायींना उष्ण-आर्द्र वातावरणातील उष्णतामानाच्या ताणामुळे परिस्थिती अधिक बिघडते.
संकरित गाईंमध्ये आजारपणाची पातळी १०० टक्यांपर्यंत जाऊ शकते, तर मृत्यूदर २० टक्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे संकरित गाईंचा सांभाळ करणाऱ्या पशुपालकांनी खूर व्यवस्थापनाला पुरेसे प्राधान्य देणे गरजेचे आहे.
खुराच्या समस्येचे प्राथमिक कारण म्हणजे आनुवंशिक घटक. ज्यामुळे गायी खूर लंगडण्यास प्रवृत्त होतात. एचएफ आणि जर्सी गाई या भारतीय परिस्थितीत जन्मलेल्या गायींच्या तुलनेत खुराच्या समस्यांसाठी अधिक संवेदनशील असतात. भारतीय परिस्थितीत जन्मलेल्या गायींमध्ये थोडी प्रतिकारशक्ती विकसित होते.
खुरांच्या आजाराबाबत अपर्याप्त ज्ञान आणि खुरांच्या समस्यांवर हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्याचा अभाव.
खूर लंगडण्याचा आहार व पोषणाशी देखील संबंध असतो; असंतुलित आहार जसे की जास्त/कमी ऊर्जा किंवा प्रथिनांचे सेवन, गायींमध्ये खूर लंगडण्याचे कारण ठरू शकते.
उष्णतेचा ताण, अधिक उत्पादनाचा ताण, गर्भधारणेचा ताण आणि आरामदायक निवासाची कमतरता यामुळे खुराच्या समस्या अधिक प्रमाणात होतात.
खूर कापण्यासाठी योग्य साधनांचा अभाव आणि चुकीची पद्धत यामुळे समस्यांमध्ये अधिक वाढ होते.
खूर व्यवस्थापनाचे मुद्दे
नियमित स्वच्छता
खुरांमध्ये चिखल, गोमय किंवा इतर घाण साचल्याने संसर्ग होतो.
खुरांची आठवड्यातून किमान दोन वेळा स्वच्छता करावी.
स्वच्छतेसाठी कोमट पाणी आणि ॲंटिसेप्टिक द्रावण वापरावे.
खुरांची साळणी
खुरांची वाढ योग्य प्रकारे न झाल्यास चालताना त्रास होतो.खुरांमध्ये जखमा होतात.
६-८ आठवड्यांनी खुरांची छाटणी करावी.
छाटणीसाठी योग्य उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा.
स्वच्छ जागेची व्यवस्था
जनावरांना जिथे ठेवले जाते ती जागा स्वच्छ, कोरडी आणि आरामदायी असावी.
चिखल किंवा ओलसर वातावरण खुरांसाठी हानिकारक ठरते.
योग्य पोषण
खुरांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम, फॉस्फरस, जीवनसत्त्व-ड, झिंक यांचा समावेश असलेला आहार द्यावा.
जनावरांना हिरवा चारा आणि खनिजयुक्त आहार दिल्यास खुरांचे आरोग्य चांगले राहते.
निर्जंतुकीकरण
नियमित फूटबाथचा वापर करावा.
फूटबाथसाठी कॉपर सल्फेट, झिंक सल्फेट यासारखे जंतुनाशक द्रावण प्रभावी ठरते.
योग्य उपचार
खुरांमध्ये कोणतीही लक्षणे दिसल्यास (सुज, पू, वास येणे) त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
नियमित स्वच्छता, योग्य आहार, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खुरांचे आरोग्य सुधारता येते.
खुरांचे मुख्य आजार
भेगा पडलेले खूर
प्रामुख्याने बायोटिन, झिंक क्षारांच्या कमतरतेमुळे खुरांवर भेगा पडतात. भेगा उभ्या आणि आडव्या असतात.
सडलेले खूर
दोन खुरांच्या मध्यभागी जखम होते. त्या जखमेतून घाण वास येणारा स्त्राव येतो. जनावरांना चालताना वेदना होतात आणि ते लंगडतात. अस्वच्छ गोठा, जनावरे नेहमी चिखलात बांधणे, पाणथळ जमिनीवर जनावरे चारायला नेणे यामुळे हा आजार होतो. हा आजार संसर्गजन्य असून एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांना होऊ शकतो.
पू भरणे
मऊ झालेल्या खुरांमध्ये टोकदार वस्तू शिरल्यास खुराला जखम होऊन जंतुसंसर्ग होतो. सडलेले खूर या आजारावर लगेच उपचार केला नाही तर खुरांमध्ये पू भरतो.
अल्सर
जनावरांवर कामाचा अति ताण, अति व्यायाम, जास्त अंतर पायी चालवणे, गरम जमिनीवर जास्त काळासाठी चालवणे, बसण्याची जागा कडक असणे, अशा विविध कारणांमुळे खुराच्या तळव्यावर अल्सर होतात.
छिद्र पडणे
टोकदार दगड, खिळा, काटा किंवा वायर यामुळे खुराला छिद्र पडते. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन जनावरे लंगडतात.
खाज
विविध सूक्ष्मजीवांमुळे जनावरांच्या दोन खुरांमध्ये खाज येते.
गाठ
काही जनावरांमध्ये दोन खुरांमध्ये गाठ आढळते.
अनियमित वाढ
वेळोवेळी खुरांची साळणी न केल्यास खुरे अनियमित वाढतात. वाढलेली खुरे ही चपटी आणि वाकडी होतात. अनियमित वाढलेल्या खुरांमुळे जनावरांच्या समोरील आणि मागील पायांतील कोन बिघडतो. जनावरांना चालताना त्रास होतो.
लँमिनायटिस
पशुखाद्यातील जास्त प्रमाणात वापरलेली कडधान्ये खुराला होणाऱ्या जंतुसंसर्गास कारणीभूत ठरतात. संसर्गजन्य आजारामध्ये जंतू शरीरामध्ये विष तयार करतात. कमी काम किंवा जास्त काम, प्रसूतीनंतर शरीरात होणारे संप्रेरकांचे बदल लँमिनायटीस या आजारास कारणीभूत ठरतात. या आजारात जनावरे लक्षणे न दाखवता फक्त लंगडतात. जास्त तीव्रतेच्या आजारात जनावरांच्या खुरांचा आकार बदलतो.
डॉ. प्राची मुंज, ८८५७८२०८७०
(पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.