Animal Disease : गाई, म्हशींमधील डायफ्रॅमॅटिक हर्निया

Article by Dr. Sachin Raut : डायफ्रॅमॅटिक हर्निया हा पचनसंस्थेचा गंभीर विकार आहे. हा आजार गाई, म्हशींमध्ये दिसतो. आजारामध्ये छाती आणि पोट यांच्यामध्ये असणारा पडदा (डायफ्रॅम) कमजोर होऊन त्यामध्ये छिद्र तयार होते. या आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपचार करणे आवश्‍यक आहे.
Buffalo
BuffaloAgrowon

डॉ. सचिन राऊत

Diaphragmatic Hernia : गाई, म्हशींच्या शरीरातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सतत असलेल्या दबावामुळे किंवा इतर कारणामुळे हर्निया होतो. हर्निया म्हणजे शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रातून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. छाती आणि पोट यांच्यामध्ये असणारा पडदा म्हणजे डायफ्रॅम.

या डायफ्रॅममुळे छातीची पोकळी आणि उदर पोकळी हे वेगवेगळे केले जातात. डायफ्रॅमॅटिक हर्निया हा पचनसंस्थेचा गंभीर विकार आहे जो गाई, म्हशींमध्ये दिसतो. या आजारामध्ये छाती आणि पोट यांच्यामध्ये असणारा पडदा (डायफ्रॅम) कमजोर होऊन त्यामध्ये छिद्र तयार होते. या छिद्रामधून पोटाचे काही अवयव छातीमध्ये येतात आणि त्या ठिकाणी गोलाकार भाग तयार होतो.

जे रवंथ करणारे प्राणी असतात त्यांच्या पोटाचे चार कप्पे असतात रुमेन, रेटीकुलम, ओमॅझम आणि अबोमॅझम. यातील रेटीकुलम हा भाग छातीच्या पडद्याजवळ असतो. डायफ्रॅमॅटिक हर्नियामध्ये हाच भाग छातीच्या पोकळीत येतो.

मात्र रेटीकुलम सोबतच कधीतरी ओमॅझम, अबोमॅझम, आतडे आणि यकृतसुद्धा छातीच्या पोकळीत प्रवेश करतात. परंतु हे फार क्वचित प्रसंगी दिसून येते. डायफ्रॅमॅटिक हर्निया हा प्रामुख्याने उजव्या बाजूला आढळून येतो. हा आजार जास्त प्रमाणात वयस्क म्हशींमध्ये दिसतो.

कारणे

आजार जन्मजात असू शकतो किंवा गाई,म्हशी मोठ्या झाल्यावर होऊ शकतो. क्वचित प्रसंगी हा आजार बैल आणि रेडे यांच्यामध्ये दिसतो. हा आजार मुख्यत्वे करून मादी जनावरांच्यामध्ये दिसतो.

आजार नेमका कसा होतो तर याचे अनेक कारणे असू शकतात, जसे की छातीच्या पडद्याचा जन्मजात कमजोरपणा, अपघात, अखाद्य लोखंडी वस्तू उदा. तार, खिळा, सुई किंवा इतर टोकदार वस्तू खाण्यात आल्याने पोट आणि छातीमधील पडदा फाटतो. गाभणपणामुळे (शेवटचे तीन महिने) छातीच्या पडद्यावर दाब पडणे, इतर काही कारणांमुळे छातीच्या पडद्यावर (उदा. पोटफुगी) अतिरिक्त ताण येतो.

काहीवेळा अखाद्य टोकदार किंवा अणकुचीदार लोखंडी वस्तू खाण्यात येतात. सोबत गाभणपणातील शेवटचे तीन महिने. ही दोन्ही एकदम आल्यामुळे मुख्यत्वे करून हा आजार आढळून येतो. काही गाई, म्हशींना अखाद्य वस्तु खाण्याची सवय असते. काही वेळेस खाण्यामध्ये खनिज, क्षार यांची कमतरता असल्याने अखाद्य वस्तू सेवन करतात.

Buffalo
Animal Husbandry : पशुपालनातील जैवसुरक्षितता महत्त्वाची...

उन्हाळ्यात चाऱ्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशी अखाद्य वस्तू खातात. यामुळे त्यांच्या शरीरात टोकदार वस्तू प्रवेश करतात. या टोकदार वस्तू जर सरळ पोटाच्या रेटीकुलम भागात जाऊन पडल्या तर इजा होत नाही परंतु त्या जर आडव्या गेल्या तर रेटीकुलमला छेदून छातीच्या पोकळीत येतात.

त्यामुळे छाती आणि पोट यांच्यामध्ये असणारा पडद्याला (डायफ्रॅम) छिद्र पडते.अपचन झाल्यास पोट फुगणे, गाभणपणामुळे उदर पोकळीचा आकार वाढणे इत्यादी कारणांमुळे डायफ्रॅम ला असलेले छिद्र वाढते. यामुळे डायफ्रॅमॅटिक हर्निया होतो.

काही अखाद्य वस्तूंमुळे जिवाणू किंवा विषाणू संक्रमण होते. या संक्रमणामुळे डायफ्रॅमला गळू होतो. हा गळू काही दिवसानंतर पिकतो. काही दिवसांनंतर हा गळू फुटून डायफ्रॅमला छिद्र पडते.

प्रसूतीच्या वेळेस गाई, म्हशी कळा देतात. त्यामुळे डायफ्रॅम फाटू शकते. बद्धकोष्ठतेमुळे गाई, म्हशी शेण टाकण्यासाठी जोर लावतात यामुळे डायफ्रॅम फाटू शकते. काही वेळेस गाई, म्हशी जोरदारपणे पडल्यास किंवा वाहन अपघातामुळे पडल्यास इजा होऊन डायफ्रॅम फाटू शकते.

लक्षणे

वारंवार पोटफुगी होते. ही पोटफुगी औषधोपचार केल्यानंतर कमी होते. मात्र औषधाची परिणामकारकता संपल्यानंतर परत पोट फुगते.

आजारात छातीच्या पोकळीतील अवयव (हृदयाचे बाह्य आवरण, फुफ्फुस ), उदर पोकळीतील अवयव(रेटीकुलम) आणि हर्नियाची रिंग एकमेकांना चिटकतात.

हृदयाचे ठोके अनियमित होतात, क्षीण होतात.

श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेताना घर घर आवाज येतो.

चालताना आखडतात. गाई, म्हशींना खोकला लागतो. हा खोकला औषधोपचार केल्यानंतरही कमी होत नाही.

चारा कमी खाणे किंवा अजिबात चारा न खाणे. वजन कमी होते.

Buffalo
Animal Care : जनावरांतील उष्माघाताची कारणे, काळजी, उपाय

छातीच्या पोळीवर (पुढच्या दोन पायासमोरील भाग) सूज येते.

उतारावरून येत असताना धाप लागणे, दम लागतो.

मानेत असणारी रक्तवाहिनी ठळकपणे दिसून येते किंवा कधी कधी दिसत नाही.

दूध अचानकपणे कमी होते. जनावर कमजोर होते.

जनावर पातळ शेण टाकते, कधी काळ्या रंगाचे पातळ शेण टाकते, शेणाला घाण वास येतो.

साधारणपणे रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये उलटी म्हणजेच खाल्लेले अन्न तोंडावाटे येत नाही परंतु डायफ्रॅमॅटिक हर्नियामध्ये आजार वाढल्यावर खाल्लेले अन्न तोंडावाटे बाहेर पडते.

आजाराने ग्रस्त गाई, म्हशींना फुप्फुसदाह(न्यूमोनिया) होतो.

वेळेवर उपचार झाले नाही तर आजारानेग्रस्त गाई, म्हशी मलूल होतात. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. सर्वात शेवटी त्यांचा मृत्यू होतो.

निदान

लक्षणांवरून निदान करता येते.

गाई, म्हशी गाभण असणे किंवा हल्लीच त्यांची प्रसूती पार पडलेली असणे आणि आजाराची सुरवात झालेली असणे इत्यादी.

आजाराची लक्षणे ,स्टेथोस्कोपने हृदयाच्या ठोक्याची तपासणी, क्ष किरण तपासणी, सोनोग्राफी इत्यादी.

उपचार

आजारावर शस्त्रक्रिया हाच उपचार आहे. यासाठी दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. आधी पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील न पचलेले खाद्य काढून पोट मोकळे करतात. सोबतच काही लोखंडी वस्तू उदा. तार, सुई, खिळा पोटात असेल तर काढून घेतात. त्यानंतर छातीची शस्त्रक्रिया करतात. ही एक अवघड शस्त्रक्रिया असते.

छातीच्या भागातून शस्त्रक्रिया करून पोटातील अवयवांना त्यांच्या योग्य जागेवर परत आणले जाते आणि छिद्र म्हणजेच हर्नियाची रिंग बंद करतात. हर्नियाची रिंग छोटी असेल तर नुसते टाके मारून बंद करतात, परंतु ही रिंग फार मोठी असेल तर त्या ठिकाणी नायलॉनची किंवा टॅफलॉनची जाळी, स्टीलची जाळी लावून बंद करतात.

शस्त्रक्रियेनंतर काळजी

जंतू संसर्ग टाळण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी औषधे इंजेक्शन स्वरूपात दिली जातात. हे इंजेक्शन शस्त्रक्रिया केल्यानंतर सतत पाच ते सात दिवस द्यावे लागतात. काही दिवस सलाईन दिले जाते.

शस्त्रक्रिया केलेल्या जागेवर माशी बसून आसडी म्हणजेच आळी पडू नये यांची काळजी घ्यावी. सोबतच टाके व्यवस्थित राहतील यांची खबरदारी घ्यावी.

शस्त्रक्रिया केल्यानंतर साधारणपणे अकरा ते बारा दिवसानंतर टाके काढून घ्यावेत. या काळात गाई, म्हशींना बद्धकोष्ठता, भूक कमी लागणे, थोडी पोटफुगी, खोकला या समस्या दिसू शकतात, परंतु योग्य औषधोपचाराने त्या दूर होतात.

प्रतिबंध

डायफ्रॅमॅटिक हर्नियाची शंका असल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो.

गाई, म्हशींना अतिरिक्त ताणापासून वाचवा.तंतुमय पदार्थ आणि भरपूर पाणी द्यावे, यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. वेळोवेळी जंतनाशक द्यावे.

योग्य संतुलित आहार द्यावा. पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनानुसार वजन नियंत्रित ठेवावे. चाऱ्याची कमतरता होऊ देवू नका. नियमित पशुवैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११

(पशू शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com