Animal Care : जनावरांतील उष्माघाताची कारणे, काळजी, उपाय

Animal Disease : उन्हाळ्यात जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होणे, एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसून येतात. अशावेळी वेळीच उपचार न केल्यास जनावरे उष्माघाताचा बळी पडतात.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. परीक्षित कातखेडे, डॉ. सुधीर जिरापुरे

Animal Care Management : उन्हाळ्यामध्ये जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. एप्रिल व मे हा सर्वाधिक तापणारा महिना म्हणून ओळखला जातो. वातावरणातील वाढणारे तापमान हे २५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्याचा विपरीत परिणाम हा गाई, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन व उत्पादकतेवर होऊ शकतो. वाढलेल्या तापमानामुळे जनावरांमध्ये उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

उष्माघात म्हणजे काय?

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमानात जास्त वाढ होते. जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील ही जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास किंवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण झाल्यास शरीरावर ताण येतो. जनावरांच्या शरीराचे तापमान सुमारे १०३ ते ११० अंश फॅरानहाइटपर्यंत वाढते. जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होणे, जनावर एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसून येतात, यालाच ‘उष्माघात’ असे म्हणतात. वेळीच उपचार न केल्यास जनावरे उष्माघाताचा बळी पडतात.

उष्माघाताची कारणे

मुख्यतः वातावरणातील वाढलेले तापमान, आर्द्रता, अतिरिक्त स्नायूकाम.

उन्हामध्ये मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारे जड कामे.

पालखी, शोभायात्रा यामध्ये बैलांचा अतिप्रमाणात वापर.

उन्हामधील अतिरिक्त काम व पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे किंवा मर्यादित उपलब्ध असणे.

जनावरांना वेळेवर खुराक न देता त्यांच्याकडून उपाशीपोटी कामे करून घेणे.

काम करतेवेळी जास्त वेळ बैलगाडीला जुंपून बैलांना उन्हात उभे करणे.

जनावरे उन्हामध्ये बांधणे

Animal Care
Animal Care : जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष द्या

उन्हाळ्याच्या दिवसांत गोठा व्यवस्थापनातील अभाव.

गोठ्यामध्ये खेळत्या हवेचा अभाव, कोंदटपणा, पत्र्याचे छत.

दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे.

सूर्यप्रकाश थेट गोठ्यात प्रवेश करणे.

जनावरे भर उन्हात रानात चरायला नेणे. चरून आल्यावर पिण्यासाठी मुबलक पाणी न मिळणे.

गाई- म्हशी माजावर असताना त्यांना मोकाट जनवारांमध्ये दिवसभर सोडून देणे.

भर उन्हातून आलेल्या जनावरांच्या अंगावर लगेच थंड पाणी ओतणे.

लक्षणे

वाढलेले शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानहाइट) हे उष्माघाताचे मुख्य लक्षण आहे.

जनावराच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्‍वसनाचा वेग वाढतो. जनावर धापा टाकते, तोंडावाटे श्‍वास घेते.

त्वचा कोरडी व गरम पडते.

खुराक, चारा खाणे कमी अथवा बंद करते.

सुरुवातीला अतिरिक्त घाम व तोंडातून सतत लाळ गळते.

जनावरास तहान लागते, जनावर पाण्याच्या स्त्रोताकडे जाते. पाण्यामध्ये बसण्याचा किंवा पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करते.

शारीरिक तापमानात वाढ होईल (१०७ अंश फॅरानहाइट) तसे जनावर धाप टाकण्यास सुरुवात करते. अशा अवस्थेत कोसळून खाली पळणे, ग्लानी येणे, संज्ञानाश होणे किंवा उष्माघातामुळे जनावराचा बळी जाण्याची दाट शक्यता असते.

अतिरिक्त घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. परिणामी, शरीरातील पाणी व क्षार यांचे असंतुलन होऊन जनावरास अशक्तपणा येतो.

सोडिअम या घटकाची कमतरता झाल्यास, जनावरांमधील पाणी पिण्याची इच्छा मरते आणि पाण्याची आणखी कमतरता निर्माण होते.

तीव्र उन्हाच्या चटक्यामुळे ऊठबस करणे, पाय झाडणे, थेंब थेंब लघवी करणे, घट्ट शेण टाकणे ही अशी लक्षणे दिसून येतात.

गर्भावस्तेत असणाऱ्या गाई-म्हशींमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.

Animal Care
Animal Care : आजारी जनावर कसे ओळखाल?

उपचार

उष्माघातावर वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जनावर उष्माघाताची लक्षणे दाखविताच त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा.

जनावरांना थंड हवेच्या ठिकाणी, गडद छायेत बांधावे.

जनावरांना पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

बर्फाचे खडे चघळायला द्यावेत. तसेच बर्फाचे खडे जनावराच्या अंगावरून व डोक्यावरून फिरवावेत.

पाठीच्या कण्यावरील बाजूस व अंगावर थंड पाणी ओतावे.

जनावर खुराक खात नसल्यास काही प्रमाणात गूळ चाटायला द्यावा.

प्रतिबंधात्मक उपाय

दुपारच्या वेळी भर उन्हामध्ये जनावरे चरायला नेणे टाळावे. उन्हाच्या झळा सरळ जनावरांच्या शरीरावर पडण्यापासून बचाव करावा.

दुपारी तापमानात चांगलीच वाढ झालेली असते. अशावेळी जनावरांना अति कष्टाची कामे लावल्यास त्यांच्या शारिरीक तापमान नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यासाठी दुपारच्या वेळी अति कष्टाची कामे करून घेणे टाळावे. या काळात जनावरांना विश्रांती द्यावी.

उपाशीपोटी जनावरांकडून विशेषतः बैलांकडून जड कष्टाची कामे करून घेणे टाळावे.

शेतीकामे करताना किंवा वाहतुकीवेळी जनावरांसाठी पुरेसे पिण्याचे पाणी आणि चारा सोबत ठेवावा.

अयोग्य गोठा व्यवस्थापन हे देखील उष्माघात व ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापन करून गोठ्याचे तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करावा.

गोठ्याच्या छताच्या पत्र्यांच्या वरील बाजूस पांढरा, तर खालच्या बाजूस काळा रंग द्यावा. यामुळे गोठ्यातील तापमान कमी होण्यास मदत होते.

छताच्या पत्र्यावर शेतातील तुराट्या, पराट्या, कडबा किंवा इतर वनस्पतींचा पालापाचोळा पसरून घ्यावा. त्यामुळे काही प्रमाणात गोठ्याचे तापमान कमी होते.

जनावरांच्या शरीरावर दिवसातून २ ते ३ वेळ थंड पाणी फवारावे. शक्य असल्यास फॉगर्स यंत्रणा गोठ्यात कार्यान्वित करावी.

गोठ्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पंखे, कूलर यांचा वापर करावा.

दुपारच्या वेळी वातावरणातील उष्णतेच्या झळा गोठ्यात येतात. त्यासाठी गोठ्याच्या बाजूने भितींवर पाण्याने ओले केलेले गोणपाटाचे पडदे लावावेत. यामुळे गोठ्यामध्ये उष्ण वारे येण्यापासून प्रतिबंध होईल. आणि गोठ्यातील वातावरण थंड राहील.

दुभत्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास शारीरिक ताण कमी होतो. यामुळे दूध उत्पादनात देखील वाढ मिळते.

म्हशी, लहान रेडकू, वासरे यांच्या अंगावरील दाट केस कापून घ्यावेत.

आहारात नियमितपणे मिठाचे खडे ३० ते ५० ग्रॅम किंवा खनिजक्षार मिश्रण द्यावे. जेणेकरून उन्हाळ्यात शरीराला आवश्यक क्षार उपलब्ध होतील.

जड, कष्टाची कामे करून आल्यानंतर जनावरांना काही वेळ मोकळे सोडावे. त्यानंतर थंड पाणी शरीरावर ओतावे. जेणेकरून दिवसभराचा ताणतणाव, शारीरिक थकवा कमी होण्यास मदत होईल.

मुक्त संचार पद्धतीचा गोठा असल्यास, त्याभोवती गडद छाया देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी.

- डॉ. परीक्षित कातखेडे, ९३७३२१९३०१, ९८३४४८४७३९

(पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, तिवसा, जि. अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com