Poultry Disease Management : कोंबड्यांमधील ‘ब्रूडर न्यूमोनिया’चे नियंत्रण

Brooder Pneumonia Disease : ‘ब्रूडर न्यूमोनिया’ हा संसर्गजन्य परंतु सांसर्गिक नसलेला बुरशीजन्य आजार आहे. हा आजार पहिल्या २ ते ३ आठवड्यांच्या पिलांमध्ये दिसून येतो. आजारामुळे प्रामुख्याने श्‍वसनसंस्था बाधित होते.
Poultry Management
Poultry ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. अशोक भोसले, डॉ. सुप्रिया टाकळे

Poultry Disease Management : ‘ब्रूडर न्यूमोनिया’ हा संसर्गजन्य परंतु सांसर्गिक नसलेला बुरशीजन्य आजार आहे. हा आजार पहिल्या २ ते ३ आठवड्यांच्या पिलांमध्ये दिसून येतो. आजारामुळे प्रामुख्याने श्‍वसनसंस्था बाधित होते. हे लक्षात घेऊन उच्च पातळीच्या जैवसुरक्षेसह चांगल्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. शेडचे निर्जंतुकीकरण करावे. शेड परिसराची स्वच्छता ठेवावी.

पावसाळ्यात सतत साचणारे पाणी आणि वातावरणातील दमटपणामुळे बुरशीसाठी पोषक वातावरण तयार होते. पावसाळ्यात कोंबड्यांमध्ये होणारे बरेचसे बुरशीचे आजार हे व्यवस्थापनातील दोषामुळे होतात. ‘ब्रूडर न्यूमोनिया’ हा संसर्गजन्य परंतु सांसर्गिक नसलेला बुरशीजन्य आजार आहे.

हा आजार एस्परजीलस फ्युमिगेटस बुरशीच्या प्रजातींमुळे होतो. हा आजार पहिल्या २ ते ३ आठवड्याच्या पिलांमध्ये दिसून येतो. शेडमधील लिटर आणि खाद्य भिजल्यावर त्यावर बुरशी वाढते. बुरशीचे बीजाणू श्‍वासाद्वारे श्‍वसनसंस्थेत प्रवेश करून फुफ्फुसाचा दाह (न्यूमोनिया) निर्माण करतात. ब्रूडर न्यूमोनियामुळे लहान पिलांमध्ये वाढ खुंटते, पिले मृत्युमुखी पडतात. विशेषत: ७ ते ४० दिवसांच्या कोंबडीमध्ये या आजाराची तीव्र प्रभाव दिसून येतो. प्रभाव कमी करण्यासाठी योग्य वेळी निदान होणे गरजेचे आहे.

आजाराला कारणीभूत घटक

ब्रूडर हाउसमधील कोंदट वातावरणात अमोनिया आणि धूळ निर्मिती होऊ शकते. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे पिलांच्या श्‍वसनसंस्थेवर ताण येतो. त्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.

ब्रूडर हाउसमध्ये जास्त आर्द्रता जिवाणू आणि बुरशी वाढ आणि प्रसारासाठी अनुकूल वातावरण तयार करते. जास्त आर्द्रता पिलांमध्ये श्‍वासोच्छ्वासाचे कार्य बिघडवू शकते, त्यामुळे श्‍वसनाचे आजार होतात.

ब्रूडर हाउसमध्ये तापमानात जलद बदल किंवा विसंगत तापमान व्यवस्थापनामुळे पिलांवर ताण येतो. प्रतिकारशक्ती कमी होते.

ब्रूडर हाउसमध्ये गर्दीची परिस्थिती पिलांमध्ये तणावाची पातळी वाढवू शकते. संसर्गजन्य घटकांचा प्रसार सुलभ करू शकते. गर्दीमध्ये पिलांसाठी मर्यादित जागा असते, त्यामुळे त्यांचा दूषित आच्छादन आणि हवेतील रोगजनकांशी संपर्क वाढतो.

दूषित आच्छादनामुळे बुरशीची वाढ होते. यामुळे पिलांचा श्‍वसनमार्ग आणि पचनमार्ग संक्रमित होतो.

Poultry Management
Poultry Disease : कोंबड्यांतील संक्रमक कोराइजा आजार

अपुरे पोषण किंवा असंतुलित आहार पिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते, ज्यामुळे त्यांना संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते.

खराब पाण्याची गुणवत्ता किंवा दूषित पाण्यामुळे पिलांच्या पचन आणि श्‍वसन प्रणालीमध्ये रोगजनकांचा प्रवेश होतो.

कोंबड्यांची अव्यवस्थित हाताळणी, वाहतूक आणि आहार किंवा पर्यावरणीय परिस्थितीत अचानक बदल यामुळे पिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यांना श्‍वसन आजार होण्याची शक्यता असते.

जैवसुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे ब्रूडर हाऊसमध्ये रोगजनकांची वाढ आणि प्रसार होतो. ज्यामुळे पिलांमध्ये विविध आजार होतात.

होणारे नुकसान

ब्रूडर न्यूमोनियामुळे विकृती दर वाढतो. पिलांमध्ये श्‍वसनाचा त्रास आणि कमी आहारामुळे अनेकदा वाढ खुंटलेली जाणवते. सुरवातीच्या संसर्गातून वाचलेल्या कोंबड्यांचे वजन सामान्यतः निरोगी कोंबड्यांच्या तुलनेत कमी असते. यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि एकूण नफा कमी होतो.

आजारी कोंबडीचे फीड रूपांतरण प्रमाण जास्त असते, म्हणजे त्यांना निरोगी कोंबड्यांच्या तुलनेत वजन वाढविण्यासाठी अधिक खाद्य आवश्यक असते. या अकार्यक्षमतेमुळे उत्पादन खर्चात आणखी भर पडते.

कुक्कुटपालनाची निम्न दर्जा आणि उत्पादकता यामुळे बाजार मूल्य आणि नफा कमी होतो.

लक्षणे

आजारामुळे प्रामुख्याने श्‍वसनसंस्था बाधित होते.

बाधित कोंबड्यांमध्ये भूक न लागणे, खोकला, श्‍वास घेते वेळी घरघर आवाज, नाकातून स्राव बाहेर पडतो.

श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो, श्‍वास गुदमरतो, श्‍वास घेण्यास त्रास होतो. डोळ्यावर सूज येते आणि डोळ्यातून स्राव बाहेर येतो.

मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यास गतिभंग, थरकाप, मान वाकडी होते, झटके, बेशुद्धी येऊन स्नायू आकुंचन, लंगडेपणा आणि मागच्या पायांना लुळेपणा येतो.

Poultry Management
Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

निदान

निदान बहुतेक वेळा लक्षणे व शवविच्छेदन करून केले जाते.

प्रयोगशाळेत लिटर तसेच मृत कोंबडी नमुने तपासणीसाठी पाठवावेत.

आजारावर उपचार

आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे उच्च पातळीच्या जैवसुरक्षेसह चांगल्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. शेडचे निर्जंतुकीकरण करावे. स्वच्छता ठेवावी.

प्रतिजैविक आणि बुरशी संवेदनशीलता चाचणी करून योग्य ते प्रतिजैविक आणि बुरशीविरोधी औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.

बाधित कोंबड्यांना जीवनसत्त्वे आणि सहायक उपचार द्यावा. पिलांची योग्य काळजी घ्यावी.

बुरशी आलेले लिटर आणि कोंबडी खाद्य नष्ट करावे.

शेडमध्ये योग्य वायूवीजन करावे. सापेक्ष आर्द्रतेचे नियंत्रण करावे.

शेडचे व्यवस्थापन

नवीन पिले आणण्यापूर्वी ब्रूडर्स शेड, फीडर्स आणि वॉटरर्स पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करावेत.

चांगल्या, स्वच्छ हॅचरीमधून पिलांची खरेदी करावी.

शेडमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.

उंदीर आणि कीटकांचे नियंत्रण करावे. खाद्य साठवण क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी उपायांची अंमलबजावणी.

लिटर ओले होणार नाही याची नियमित काळजी घ्यावी. दिवसातून दोन वेळा लिटर वर खाली करून घ्यावे यामुळे लिटरमधील ओलावा कमी होतो. शेडमधील पाण्याची गळती किंवा ओलसरपणा टाळावा.

आर्द्रता आणि धूळ यामुळे बुरशीचे बीजाणू तयार होऊ नयेत यासाठी शेडमध्ये चांगले वायूवीजन राहील याची खात्री करावी. धूळ नियंत्रणासाठी योग्य लिटरचा वापर करावा. शेडमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

शेडमध्ये योग्य आर्द्रता .(५० ते ७० टक्के) पातळी ठेवावी.

पिलांच्या वाढीसाठी योग्य असे सातत्यपूर्ण तापमान राखणे. तापमान स्थिर ठेवण्यासाठी थर्मोस्टॅट आणि हीटर्सचा वापर करावा.

स्वच्छ, कोरडे आणि दूषित नसलेले, बुरशीजन्यरहित खाद्य द्यावे. बुरशीची वाढ रोखण्यासाठी कोरड्या जागेत, उंचावर खाद्य साठवून ठेवावे. आर्द्रता आणि कीटकांपासून खाद्याचे संरक्षण करण्यासाठी वायुरोधक कंटेनर किंवा सायलोचा वापर करावा. नवीन खाद्य आणण्यापूर्वी डबे, शेड स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करावी. खाद्य बुरशी आणि विषारी पदार्थांपासून मुक्त असल्याची खात्री करावी.

स्वच्छ, ताजे आणि निर्जंतुकीकरण केलेले पाणी असावे.

शेडमध्ये प्रवेश केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित ठेवा. रोगजनकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छ कपडे, पादत्राणे वापरणे, हात स्वच्छ करणे आणि पाय निर्जंतुक द्रावणात बुडवणे आवश्यक आहे.

आजाराचा प्रसार रोखण्यासाठी नवीन किंवा आजारी पिलांना मुख्य कळपापासून दूर ठेवावे.

श्‍वसनाचा त्रास किंवा इतर आजारांच्या लक्षणांसाठी पिलांचे नियमित निरीक्षण करावे. लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत.

तापमान, आर्द्रता आणि हवेच्या गुणवत्तेसाठी शेडच्या वातावरणाची नियमित तपासणी करावी.

बुरशी किंवा ओलसरपणाच्या कोणत्याही लक्षणांसाठी नियमितपणे खाद्याची तपासणी करावी.

चोच छाटणी आणि शेडमधील जास्त गर्दी यासारख्या तणावाचे परिणाम कमी करावेत.

डॉ. अशोक भोसले, ७७२१०२५०७३, (पशू सूक्ष्मजीव शास्त्रविभाग, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com