डॉ. शीतल चोपडे, डॉ. महेश जावळे, डॉ. सुधीर कविटकर
Pola Festival : पोळा सण साजरा करीत असताना पारंपरिक पद्धतींसोबत पशू संगोपन, आहार आणि आरोग्य व्यवस्थापन, जंत निवारण, कृत्रिम रेतन, लसीकरण, पशुवैद्यकीय उपचार, व्याख्याने, प्रात्यक्षिके इ. विषयी शिबिरे आणि आनुषंगिक कार्यक्रम आयोजित करावेत. त्यामुळे देशी गोवंश निरोगी आणि सुदृढ होण्यास चालना मिळेल.
‘‘आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा,
आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार’’
या कवितेमधून बहिणाबाई शेतकऱ्यांमध्ये असलेले पोळा सणाचे महत्त्व विषद केले.
आपल्या संस्कृतीत बैल, पाणी आणि जमीन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बैल शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतात राबतात. विविध शेतीकामांमध्ये बैल महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर, पोळा, पोंगल हे सण आनंदाने साजरा केला जातो. पोळा सण हा विदर्भात दोन दिवस साजरा केला जातो. मोठा पोळा पहिल्या दिवशी तर तान्हा पोळा दुसऱ्या दिवशी.
तान्हा पोळ्यामध्ये मुले खेळण्यातील बैल सजवतात आणि सणाच्या परंपरेचा भाग म्हणून घरोघरी घेऊन जातात. महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बैलपोळा किंवा पोळा अमावास्या हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी आकाशामध्ये सर्वत्र गव्हाचे पीठ पसरल्यासारखे दिसते, अशी एक धारणा आहे. त्यामुळेच या सणाला ‘पिठोरी अमावास्या’ असेही म्हणतात.
सणाचे महत्त्व ः
विधी ः
पोळा सणाचा केंद्रबिंदू बैल आणि बैलांची पूजा आहे. बैलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यात नवचैतन्य आणि जोम निर्माण व्हावा, यासाठी शेतकरी विविध विधी करतात. बैलांच्या कपाळावर सिंदूर लावणे, प्रार्थना करणे आणि आरती केली जाते.
बैलांच्या शर्यती ः
काही ठिकाणी (छत्तीसगड) पोळा सणाचा भाग म्हणून बैलांच्या शर्यती आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धा बैलांची ताकद आणि चपळता दर्शवतात. पशुपालकांमध्ये देशी उन्नत गोवंश जोपासना करण्यास यामुळे चालना मिळते.
उत्सवाचे स्वरूप ः
हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळा सणासाठी नंदी सजावट केली जाते. बैलांच्या त्वचेला हळद आणि तेलाची पेस्ट लावली जाते. शिंगापासून शेपटीपर्यंत व्यवस्थित अंघोळ घातली जाते. बैलांची शिंगे चमकदार रंगांनी रंगवतात. त्यांना रंगीबेरंगी दोरी, फुले आणि दागिन्यांनी सुशोभित केले जाते. पाठीवर नक्षीकाम केलेली झुल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवीन घंटा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालून त्यांची सजावट केली जाते.
प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलाचा साजशृंगार करतात. गावातील घरे रांगोळ्यांनी सजवली जातात. बैलाची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ घरगड्यास देखील नवीन कपडे देऊन सन्मान केला जातो. बैलांच्या मिरवणुका काढल्या जातात. काही भागांमध्ये पारंपरिक गाणी गाऊन नृत्य करून उत्सव साजरा केला जातो.
शेतीचा हंगाम ः
पावसाळा संपत असताना आणि रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. पोळा हा सण एका कृषी हंगामातून दुसऱ्या कृषी हंगामातील संक्रमण दर्शवतो. अनेक शेतकरी या दिवशी पुढील शेतीचा हंगाम सुरू करतात.
महिलांची भूमिका ः
पोळा सणात महिलांचाही मोठा वाटा असतो. स्त्रिया घर रांगोळीने सजवतात, प्रवेशद्वारावर सजावटीचे तोरण बांधतात आणि बैलांची पूजा करतात. कुटुंबासाठी आणि बैलांसाठी नवीन कापणी केलेल्या पिकांपासून स्त्रिया पारंपरिक पदार्थ बनवतात.
बैलबाजार ः
काही ठिकाणी पोळा सणासाठी मोठ्या बाजारपेठा भरतात. त्यामुळे सणाच्या अनुषंगाने पशुपालकांना बैल खरेदी-विक्री करणे शक्य होते. बाजारपेठांमध्ये बैलांच्या विविध सजावटीच्या साहित्याची रेलचेल दिसून येते. या सणाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होते.
समृद्धीसाठी प्रार्थना ः
पोळा सण साजरा करताना बैलांच्या पूजनाबरोबर त्यांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी आणि कृषी प्रयत्नांच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणि व्यवसाय विस्तारासाठी प्रार्थना केली जाते.
बैलपोळा साजरा करताना घ्यावयाची काळजी ः
- बैलांना पिण्यासाठी तसेच अंघोळीसाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. अस्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे जिवाणू, विषाणू आणि परोपजीवी यांची बाधा होऊन पशूचे स्वास्थ्य बिघडू शकते.
- बैलांच्या शरीरावरील जखमांवर पशुवैद्यकांकडून वेळीच उपचार करून घ्यावेत. शिफारशीनुसार बाह्य परोपजीवीनाशक औषध जंतनाशक यांचा वापर करावा.
- शिंगांचा आकार कापून किंवा इतर घातक पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे जखम होऊन शिंगाचा कर्करोग आणि धनुर्वात हे आजार होऊ शकतात.
- शिंगे रंगविण्यासाठी ऑइल पेंट्सऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. ऑइलपेंटमध्ये कॅडमिअम, झिंक ऑक्साइड, टिटॅनिअम डायऑक्साइड सारखी त्वचेसाठी घातक असणारी रसायने असतात.
- काही पशुपालक बैल अधिक आकर्षक, तजेलदार, मांसल व धष्टपुष्ट दिसावे म्हणून तेल आणि अंडी यांचे मिश्रण पाजतात. हे मिश्रण अन्ननलिकेऐवजी चुकून श्वसनलिकेतून फुप्फुसात गेल्यास न्यूमोनिया होऊन जनावर दगावू शकते. या ऐवजी उपलब्ध धान्य आणि तेलबियांच्या पेंडी यांचे मिश्रण दिल्यास पशूंना आवश्यक ऊर्जा आणि प्रथिने मिळतील आणि संभाव्य धोकाही टळेल.
- पोळ्याच्या दिवशी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. बऱ्याच ठिकाणी या मिरवणुकीत बैलांना पळवले जाते, अशावेळी अनेकदा दुर्घटना होऊन बैल गंभीर जखमी होतात. बैलांना वेगाने पळण्याची सवय नसल्यास ती उधळतात. त्यामुळे त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची शक्यता असते. मिरवणुकीदरम्यान कर्कश फटाके वाजविले जातात, यामुळे देखील बैल उधळतात. त्यामुळे पोळा उत्साहात साजरा करावा पण सोबतच पशुधनास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या, कडधान्याचा भरडा अतिरिक्त प्रमाणात खाऊ घातला जातो. यामुळे अपचन होऊन बैलाला पोटाच्या व्याधी निर्माण होतात. रक्तातील लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण वाढून जिवाला धोका निर्माण होतो. पोटाच्या व्याधीमुळे पोट फुगलेले दिसते, पोटदुखीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते, पाय वर करून उजव्या बाजूस लोळते. अशी लक्षणे दिसून आल्यास पशुवैद्यकाकडून तत्काळ उपचार करून घ्यावे.
पोळा हा आनंददायक आणि विशेष संदेश देणारा सण आहे. हा सण पशूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आगामी शेतीचा हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करण्याचा आहे. हा सण ग्रामीण भागातील सामुदायिक बंधन आणि सांस्कृतिक परंपरांनाही प्रोत्साहन देतो. बळीराजा सुखी आणि समाधानी झाला, तर पोळा सण साजरा करण्यामागील उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला, असे म्हणता येईल.
------------------
- डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५
(सहायक प्राध्यापक, पशुपोषण शास्त्र विभाग,
नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.