पुणे ः कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये (Indigenous Cow Research Training Center) भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून (Embryo Transplantation Technology) साहिवाल कालवडीचा जन्म (Sahiwal Heifer Birth) झाला. कालवडीचे वजन २७.४०० किलो आहे. भ्रूण प्रत्यारोपण होलस्टीन फ्रिजियन (HF Cow) गाईमध्ये करण्यात आले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून पहिल्यांदाच साहिवाल कालवडीचा जन्म झाला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.
पशुतज्ज्ञ डॉ. प्रमोद साखरे म्हणाले, ‘‘भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे जन्मलेल्या साहिवाल जातीच्या कालवडीचा पिता ‘बाएफ करीम’ असून वळूमाता लक्ष्मी हिचे प्रती वेत दूध उत्पादन ४,८०० लिटर आणि दाता गाईचे ( एनडीडीबी १६००५०२५०२६२) प्रति वेत दूध उत्पादन ४,३८४ लिटर आहे.’’
प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे म्हणाले, ‘‘हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने २०२०-२०२४ या कालावधीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारला आहे. महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास सुरवात केली. या प्रकल्पांतर्गत १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. हा प्रकल्प राहुरी येथील एनडीडीबी सिमेन स्टेशनच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.’’
विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ. सुनील अडांगळे आणि डॉ. शिवकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.