
सातारा : गेल्या काही महिन्यांत लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) थैमान घातले आहे. या संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्याला सावरण्यासाठी राज्य शासनाने मदतीचा (Lumpy Skin Compensation) हात पुढे केला आहे. लम्पी स्कीनने जिल्ह्यातील ५९० मृत जनावरांची एक कोटी ५३ लाख ४६ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना येत्या महिनाभरात मदत मिळेल.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लम्पी स्कीनने राज्यातील जळगाव जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू राज्यभरात या आजाराचा फैलाव वाढत जाऊन जनावरे दगावण्याचे प्रमाणही वाढले. राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.
त्यानुसार दुधाळ जनावरे ३० हजार, बैल २५ हजार, तर एक वर्षाखालील पशुधनास १६ हजार रुपये मदत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अकरा तालुक्यांतील १९७ बाधित गावांमध्ये ७७७ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामधील ५९० मृत जनावरांचे अनुदान जमा झाले आहे. उर्वरित १८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच मदत जमा होईल.
‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ अभियान
पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ हे अभियान सुरु केले आहे. गोठा स्वच्छ ठेवल्यास संसर्गजन्य आजारांना आळा बसू शकतो. पशुधन सुरक्षित राहण्यासाठी अभियान मोहीम स्वरूपात चळवळ म्हणून राबविण्यात येईल. या अभियानाची गावोगावी जनजागृती केली जाईल, असे पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.