Women Impowerment Agrowon
यशोगाथा

Women Empowerment : बचत गटातून महिला झाल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम

Women Self Help Group : शेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी बचत गटातून आर्थिक प्रगती साधली आहे. समृद्धी, अहिल्यादेवी, राजनंदिनी महिला बचत गटातील सदस्यांनी मिळालेल्या पैशातून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, सेंद्रिय शेतीला बळ दिले. यातून कौटुंबिक विकासालाही हातभार लागला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सूर्यकांत नेटके

Self Help Group : शेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी बचत गटातून आर्थिक प्रगती साधली आहे. समृद्धी, अहिल्यादेवी, राजनंदिनी महिला बचत गटातील सदस्यांनी मिळालेल्या पैशातून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, सेंद्रिय शेतीला बळ दिले. यातून कौटुंबिक विकासालाही हातभार लागला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील (जि. नगर) बचत गटातून महिला प्रगती साधत आहेत. तालुक्यातील शेडगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका व्यवस्थापक कांता सुपेकर, उपजीविका सल्लागार शुभांगी सूर्यवंशी, सहयोगिनी सुवर्णा क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून अहिल्यादेवी, राजनंदिनी, समृद्धी या महिला गटांसह अन्य सुमारे १८ महिला बचत गट तयार झाले आहेत. येथील महिलांनी गटाच्या माध्यमातून वैयक्तिक रोजगारांसह शेती आणि पूरक व्यवसायाला प्राधान्य दिले.

पशुपालनास सुरुवात ः
शेडगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने अडीच वर्षांपूर्वी शिल्पा बधे यांच्या अध्यक्षतेखाली अंजना गोरे, जयश्री रामदास, जयश्री जाधव, जनाबाई शिंदे, मीना बधे, सुनीता बधे, अंजना बधे, सविता भुजबळ यांनी एकत्र येऊन समृद्धी महिला बचत गटाची स्थापना केली. गटातील सदस्यांनी प्रत्येकी दोनशे रुपयांची दर महिन्याला बचत केली. सहा महिन्यांनंतर अंतर्गत व्यवहार केला. या वर्षी गटाला दहा लाखांचे कर्ज मिळाल्यानंतर प्रत्येक महिलेला एक लाख रुपये वाट्याला आले. या रकमेतून प्रत्येक महिलेने एक गाय खरेदी करून दूध व्यवसाय सुरू केला. यामुळे गटातील काही महिलांच्या कुटुंबात पूर्वी सुरू असलेल्या दूध व्यवसाय वाढीला मदत झाली. वर्षभरापूर्वी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सह्याद्री डेअरीने दूध संकलन केंद्र सुरू केले. हे केंद्र सांभाळण्याची जबाबदारी शिल्पा बधे यांच्याकडे आहे. गटातील महिला सदस्यांनी गाईंची खरेदी केलेली असल्याने प्रत्येक महिलेकडे १० ते १२ लिटर दूध संकलन होते. गटाच्या मदतीने पाच सदस्या शेळीपालन करतात. शिवणकाम, शेतीविकासासाठी गटाची मदत होत आहे. पशुपालनाच्या माध्यमातून शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध झाल्याने रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे.

‘राजनंदिनी’ गटाशी शाश्‍वत शेतीकडे वाटचाल ः
साधारण बारा वर्षांपूर्वी शेडगाव (ता. श्रीगोंदा) येथे सुरेखा मस्के, शुभांगी मस्के यांच्या पुढाकाराने मुक्ताबाई मस्के, कविता शिंदे, कमल भोसले, मनिषा केदारी, ताराबाई अनारसे, अविधा भोपळे, शंकुतला शिंदे, राहीबाई शिंदे, ज्योती भोसले, सारिका सोनवणे, कुसुम भोसले, राणी शिंदे, नरिमा शेख, मिराबाई केदारी, शांताबाई धेंडे, गजराबाई मस्के, ताराबाई मस्के, स्वाती वाघमारे आणि मंजुळा मोहळकर यांनी एकत्र येऊन राजनंदिनी महिला बचत गटाची सुरुवात केली.
गट सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी एक लाखाचे कर्ज मिळाले. या कर्जातून फळबाग लागवड आणि शेतीसाठी आवश्यक साधनांची उपलब्धता करण्यात आली. शेती उत्पादनाच्या आधारावर घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर गटाला पुन्हा दोन लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्या कर्जाच्या मदतीने महिलांनी शेळ्या, गाईपालन सुरू केले. गटातील सदस्य सारिका सोनवणे आणि शुभांगी मस्के त्यांनी स्टेशनरी दुकान सुरू केले आहे.

आतापर्यंत राजनंदिनी गटातील प्रत्येक सदस्याची सुमारे ३१ हजार रुपयांची आर्थिक बचत झाली आहे. गटाकडे असलेल्या एकूण सहा लाख रुपयांच्या बचतीतून कर्जाची देवाणघेवाण केली जाते. गटातील जवळपास सर्वच महिलांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत आहेत. या भागात लिंबू आणि अन्य फळांच्या बागा आहेत. फळबागांसह अन्य पिकांसाठी गटातील महिला ८० टक्क्यांपर्यंत सेंद्रिय खतांचा वापर करतात.
गटस्थापनेनंतर मिळालेल्या आर्थिक आधारातून गटाच्या सचीव
शुभांगी मस्के शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत असतात. सात वर्षांपासून फळबाग, ऊस, कापूस पिकाला जिवामृत, स्लरीचा वापर केला जात आहे. या वर्षी त्यांनी शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने भुईमूग उत्पादनाचा प्रयोग केला. जिवामृत, शेणखताच्या वापरातून उत्पादन क्षमता वाढली. त्यांनी देशी गाईंचे संगोपन केले आहे. राजनंदिनी गटाच्या माध्यमातून गावामध्ये सेंद्रिय शेतीला चालना मिळाली आहे.

अहिल्यादेवी गटातर्फे अवजारे बॅंक
मनीषा भुजबळ आणि सुरेखा मस्के यांच्या पुढाकारातून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रयत्नाने अहिल्यादेवी महिला बचत गट सुरू झाला. हेमलता भुजबळ, सविता शिंदे, सखूबाई बोबडे, जमुना बोबडे, रूपाली केदारी, लता मस्के, संगीता भुजबळ, वैजयंता दरेकर, लक्ष्मी बोबडे, नंदा खरात आणि शालन भुजबळ आदी महिला गटामध्ये कार्यरत आहेत.
बचत गट झाल्यानंतर सदस्यांनी एकोप्यातून प्रगती साधल्याचे पाहायला मिळत आहे. गटाला पहिल्यांदा स्थापनेनंतर तीन वर्षांनी दोन लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्याआधी महिलांनी अंतर्गत बचतीमधील रकमेतून देवाणघेवाण करत आर्थिक पत निर्माण केली. कर्जाची वेळेत परतफेड केल्यामुळे दुसऱ्यांदा चार लाख रुपये आणि तिसऱ्यांदा सुमारे दहा लाख रुपयांचे गटाला कर्ज मिळाले. कर्ज फेडीमध्येही गटाने एकोपा दाखवला आहे.

बचत गटातून कर्ज मिळाल्यानंतर या महिलांनी वैयक्तिक रोजगारांसह शेती विकासाला प्राधान्य दिले आहे. गटाच्या अध्यक्ष मनीषा भुजबळ यांनी शेळीपालन, मेंढीपालन तसेच दूध व्यवसाय सुरू केला. गटाचा आधार मिळाल्यामुळे जनावरांसाठी चांगली शेड बांधली. सविता शिंदे, संगीता भुजबळ यांनी कापड दुकान सुरू केले. हेमलता भुजबळ, जमुना बोबडे, रूपाली केदारी यांनी गायपालन सुरू केले आहे.
अहिल्यादेवी महिला बचत गटाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने जिल्हा नियोजन समितीमधून अवजार बँक मिळाली आहे. यामध्ये कडबा कुट्टी, पिठाच्या गिरणी आणि शेतीविषयक अवजारे उपलब्ध आहेत. पिठाची गिरणी सुरेखा मस्के, सखूबाई बोबडे, लक्ष्मी बोबडे या सदस्या चालवितात. ज्या महिलांनी गायपालन सुरू केले आहे त्यांना कडबाकुट्टी यंत्र देण्यात आले आहे. मनीषा भुजबळ या मिरची कांडप केंद्र चालवतात. गटातील सदस्यांना अवजारांचा शेतीत वापर करता येऊ लागल्याने मजुरीत बचत होत आहे. तसेच पीक उत्पादन वाढीस लागले आहे.

बचत गटातून दोनशे महिला एकत्र
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला सक्षमीकरण उपक्रमातून शेडगावात १८ महिला बचत गट आहे. या माध्यमातून सुमारे दोनशे महिला एकत्र आल्या आहेत. दर महिन्याला गटातील महिला दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत अधिक बचत करतात. यामुळे शेडगावात केवळ महिला बचत बचतीतून पन्नास हजार रुपयांची आर्थिक बचत होत आहे.
बचत गटांतील अनेक महिलांना दूधपालन, शेळी-मेंढीपालन, शेती विकास, कापड दुकान, दूध डेअरी, सेंद्रिय शेती सुरू केली आहे. ग्राम विकास तसेच ग्रामसभा तसेच सार्वजनिक कामांतही महिलांचा सहभाग असतो. समृद्धी महिला बचत गटाने सुरू केलेल्या दूध संकलन केंद्रावर गावातील अन्य बचत गटातील महिलांसाठी दूध विक्रीची व्यवस्था झाली आहे. बचत गटाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय गर्जे यांनी सांगितले.

संपर्क ः मनीषा भुजबळ : अहिल्यादेवी महिला बचत गट, ९६७३३ ११९५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT