Water Conservation Agrowon
यशोगाथा

Water Conservation : जलसंधारणातून बोकटे गावात कृषिकेंद्रित ग्रामविकास

मुकुंद पिंगळे

नाशिक जिल्ह्याच्या पूर्वभागात बोकटे (ता.येवला) (Bokate) हे एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसणार गाव होते. युवामित्र संस्थेच्या माध्यमातून येथे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आणि गाव पाणीदार झाले. जिरायती शिवार बागायती झाली. पारंपारिक पिके घेणारे गाव आता फलोत्पादनात (Fruit production) पुढे आले आहे. सोबतच दुग्धव्यवसायातही चांगली वाढ झाली आहे. जलसंधारणातून कृषिकेंद्रित ग्रामविकास साधून गावकऱ्यांनी प्रगतीची वाट गावाने धरली आहे.

येवला तालुक्याच्या पूर्व भागात कोळगंगा नदीकाठी वसलेले बोकटे गाव. श्री भैरवनाथ यात्रा येथे भरत असल्याने या गावाची जिल्ह्यात ओळख आहे. मात्र दुष्काळी शिक्का गावावर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी महिन्यानंतर वणवण होत असायची. सिंचन सुविधा नसल्याने बागायती क्षेत्र नावापुरते उरले होते. त्यामुळे येथे होणारा दुग्धव्यवसाय सुद्धा हिरवा चारा नसल्याने अडचणीत आला होता. युवा मित्र संस्थेच्या पुढाकारातून टाटा ट्रस्टच्या मदतीने २०१८-२०१९ गावात'जलसमृद्धी' उपक्रमांतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे जलस्रोतांचे खोलीकरण झाल्याने पाणीसाठा वाढला.

शिवारातील जमिनीत पाणी मुरल्याने भुजलपुनर्भरण होऊन तिपटीने पाणी वाढले. सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने गावात गेल्या तीन वर्षात बागायती क्षेत्र वाढते आहे. त्यामुळे कृषी विकासाची नांदी झाली आहे. शेती हा उदरनिर्वाह करण्याचा प्रमुख व्यवसाय. येथील शेतकऱ्यांकडे २ ते ३ एकर जमीन धारणा बहुतांशी आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या अडचणी होत्या. ही अडचण युवामित्र संस्थेने कायमची सोडवल्याने गाव पाणीदार झाले, अन शिवार हिरवेगार झाले आहे.

खडकाळ व मुरमाड जमीन झाली सुपीक:
युवा मित्र संस्थेने जलसाठ्यांमध्ये पाणीपातळीत वाढ, गाळमुक्त बंधारे करून खडकाळ व मुरमाड जमिनी सुपीक करणे व भुजलपुनर्भरण उद्देश ठेऊन जलसमृद्धी कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमासाठी टाटा ट्रस्टकडून खोलीकरणासाठी यंत्रांची उपलब्धता झाली. इंधन खर्चासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाने खर्च देऊ केला होता. त्यामुळे गावालगत असलेल्या कोळगंगा नदीपात्राचे ४ किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरण केल्याने मोठ्या प्रमाणावर जलसाठा वाढण्यास मदत झाली. प्रामुख्याने कोंबडवाडी, कोळगंगा, भैरवनाथ मंदिर,वकील, खामकर वस्ती आणि साळुंके वस्ती या बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. या कामातून गावातील प्रमुख सहा बंधाऱ्यातील १ लाख ४ हजार ८९३ घन मीटर गाळ उपसा केला गेला. तो शेतकऱ्यांनी स्वखर्चाने आपल्या शेतात नेऊन टाकला. त्यामुळे २०० ते २५० एकर खडकाळ व मुरमाड जमीन सुपीक झाल्याने बागायती पिके घेणे शक्य झाले आहे.

पीक पद्धतीत बदल; शेतीत रुजले आधुनिक तंत्रज्ञान
पूर्वी पारंपारिक पिके गावात घेतली जायची.जलसंधारणाची कामे झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता वाढली. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने जिरायती गाव बागायती झाले आहे. पारंपारिक बाजरी, मूग, कापूस, मका, भुईमूग पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीची जोड दिली. कालानुरूप शेतीत कात टाकून नावीन्याची कास धरली आहे. त्यामुळेच गावात फलोत्पादन क्षेत्राचा विस्तार झालेला दिसून येतो. अनेक शेतकरी ऊस, आले, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, भेंडी, उन्हाळ कांदा, कोबी, मेथी, कोथिंबीर,पपई, पेरू, डाळिंब आदी बागायती पिकांकडे वळले आहेत. त्यामुळे नाशिक, येवला, कोपरगाव बाजारात शेतीमाल विक्रीसाठी पाठविला जातो. पीकपद्धतीत बदल करण्यासह आधुनिक तंत्रज्ञान येथील शेतीत रुजले आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जवळपास ३० शेतकऱ्यांनी संरक्षित पाणीसाठ्यासाठी शेततळ्यांची निर्मिती केली आहे.

यासह शेतात सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अनेक शेतात ठिबक, तुषार सिंचन पाहायला मिळते. पॉलीमल्चिंग, शेड-नेट पद्धतीचा वापर करून भाजीपाला उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल येथे दिसून येतो. सौर ऊर्जेचा वापर करून गावात ६० सौर पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
कधी काळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल येथे घडत आहे. कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कृषीविषयक प्रदर्शने, चर्चासत्रे , परिसंवाद यामध्ये प्रयोगशील शेतकरी हिरारारीने सहभागी होत असतात. त्यामुळे शेती बदलत असून येथील शेतकरी व पशुपालकांना जिल्हा व राज्य पातळीवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

कृषी तसेच पूरक व्यवसायात नव्या संधी ः
गावात दुग्धव्यवसाय मर्यादित प्रमाणावर केला जात होता. पूर्वी कामे नसल्याने स्थलांतर वाढले होते. मात्र आता दुग्धव्यवसायाला चालना मिळाली आहे. हिरवा चारा बारा महिने घेता येत असल्याने चाऱ्यावर होणारा खर्चात बचत होऊ लागली आहे.गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या घरासमोर दुभती गाय दिसून येते. दुधाचे उत्पादन वाढल्याने पाच दूध संकलन केंद्रे गावात आहेत. त्यामुळे दोन पैसे हक्काचे मिळतात. स्थानिक पातळीवर कृषिपूरक व्यवसाय वाढीस लागल्याने रोजगार संधींसह अर्थकारण उंचवण्यास मोठा वाव निर्माण झाला आहे. कृषी क्षेत्राचा विस्तार होत असल्याने गावात तीन कृषी निविष्ठा विक्री केंद्र आहेत. भाजीपाला रोपवाटिका व्यवसायाकडे परिसरातील तरुण शेतकरी वळले आहेत.

गाव दृष्टीक्षेपात :
भौगोलिक क्षेत्र :८२४.४६ हेक्टर
कृषक क्षेत्र :७८४.४० हेक्टर
लोकसंख्या...२,२२५ (२०११ च्या जनगणनेनुसार)
कुटुंब संख्या... ४४६
एकूण खातेदार...५९९

ग्रामविकासाची ठळक कामे:
-संगणकीकृत, सीसीटीव्ही निगराणीखाली असलेली व सौर ऊर्जेचा वापर होत असलेली सुसज्ज ग्रामपंचायत.
-१०० वर्षांपूर्वीची दगडी शाळा इमारत पाडून जिल्हा परिषद मदतीने वर्ग खोल्या मंजूर करून प्रयास फाउंडेशनच्या मदतीने भव्य इमारत उभारणी, त्यामध्ये ७ वर्ग खोल्या, स्वतंत्र बैठक, संगणक, वाचनालय, मुख्याध्यापक कक्ष व स्वच्छतागृहे, शाळेसमोर पेव्हर ब्लॉक, उद्यान, सोलर पॅनेल वापर, शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लांट,अशी सर्व सुविधांसह इमारतीत उत्तम शैक्षणिक दर्जा.

- श्रमदानातून गावात दुतर्फा झाडांची लागवड.
-स्वच्छतेची जनजागृती करण्यासह आग्रह असल्याने हगणदारीमुक्त गाव.
-संपूर्ण गावात सिमेंट काँक्रिटचे रस्ते.
-सांडपाणी व्यवस्थापनासाठी आरसीसी भूमिगत गटारी.
-गावात शाळा, अंगणवाडी, मंदिर परिसरात फुलझाडांची लागवड.
-शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट.
-कपडे धुण्यासाठी स्वतंत्र धोबीघाट निर्मिती.
-गावात विविध शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी.

एकीच्या बळातून विकासाची वाटचाल ः
गावामध्ये भाऊबंदकीला थारा नाही, गावात विविध जातीधर्माचे लोक राहतात. त्यामुळे विविध सण, धार्मिक उत्सव गावात साजरे केले जातात. विविध दिंडी सोहळे, अखंड हरीनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचन, वैचारिक व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. गावातील प्रत्येक उपक्रमामध्ये प्रत्येकजण सहभागी असतो. प्रामुख्याने महिलाही उपस्थित असतात. गावातील प्रत्येक होणाऱ्या ग्रामसभेत महिला आपली मते मांडतात. बचत गटांची निर्मिती केल्याने महिला संघटित असून त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता रुजली आहे. व्यावसायिक दृष्टिकोन रुजत असून औषधे,कृषी पंप दुरुस्ती, शुद्ध पाणी पुरवठा केंद्र, नारळ, फूल विक्री, हार्डवेअर, किराणा असे व्यवसाय वाढले आहेत.

भैरवनाथ देवस्थानचा नावलौकिक:
येवला तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून बोकटे येथील यात्रा प्रसिद्ध आहे. पूर्वी यात्रा काळात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी आवर्तन देऊन बंधारा भरण्याची प्रथा होती. या यात्रेसाठी दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून या मंदिराच्या विकासासाठी भक्तनिवास, सभामंडप, पेव्हर ब्लॉक, संरक्षक भिंत, अशी विविध कामे करण्यात आली आहे.

गावात पूर्वी पाणी नसल्याने प्रगती साधणे अशक्यच होते. मात्र गाव पाणीदार झाल्याने येथे जलसमृद्धी नांदते आहे. शिवार हिरवेगार झाल्याने बाजाराची मागणी अभ्यासून पिके घेतली जात आहेत. दुपटीने सिंचन स्रोत वाढल्याने आता रब्बीतही बागायती पिके घेता येतात. कृषिविकास येथे दिसून येतो, याशिवाय ग्रामविकासाची भरीव कामे येथे होत असल्याने गावाचे रुप पालटले आहे. ग्रामविकासात माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक भाऊराव मोरे व ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे.
-प्रताप दाभाडे, ९७६४३२५८६३
(सरपंच)


पाण्याचे महत्त्व जाणून जलसंधारणाची कामे गावात मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळेच कृषिविकास व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात गावाने भरारी घेतली आहे. स्थलांतर मोठ्या प्रमाणावर थांबून गावात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे. गावाला स्वयंपूर्ण करण्यासह संपन्नतेकडे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
-महेंद्र काले, ९४२३००११७१
(माजी सदस्य, जिल्हा परिषद,नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT