Gram Urja  Agrowon
यशोगाथा

Rural Development : ग्राम ऊर्जा: शाश्वत ग्रामविकासाच्या चळवळीच्या ध्यास

Gram Urja : ग्राम म्हणजे गाव आणि ऊर्जा म्हणजे त्या गावाची क्षमता किंवा ताकद. या क्षमतेला आपण जर सूत्रबद्ध केलं तर शाश्वत विकास होऊ शकतो या धोरणानुसार २०२० पासून अंबाजोगाई (जि.बीड) येथील ग्राम ऊर्जा संस्थेचे कार्य सुरू आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

संतोष मुंढे
Village Development : ग्राम म्हणजे गाव आणि ऊर्जा म्हणजे त्या गावाची क्षमता किंवा ताकद. या क्षमतेला आपण जर सूत्रबद्ध केलं तर शाश्वत विकास होऊ शकतो या धोरणानुसार २०२० पासून अंबाजोगाई (जि.बीड) येथील ग्राम ऊर्जा संस्थेचे कार्य सुरू आहे. सध्या संस्था तीस गावांच्यामध्ये कार्यरत आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यातील सात व्यक्‍तींनी अंबाजोगाई (जि.बीड) येथे ग्राम ऊर्जा संस्थेची स्थापना केली आहे. त्यापैकी सहा जण मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून आलेले आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुशासन या मुद्यांवर संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड विविध उपक्रमाबाबत म्हणाले की, अंबाजोगाई येथे मे २०२० मध्ये ग्राम ऊर्जा संस्थेची स्थापना झाली. बीड आणि धाराशीव या दोन जिल्ह्यात संस्थेचे काम सुरू आहे. संस्थेमध्ये वैजनाथ इंगोले (उपाध्यक्ष), आसाराम हातागळे (सचिव), प्रमोद जाधव (कोषाध्यक्ष), प्रमोद जोशी ( लेखा विभाग),दीपक पवळ (प्रकल्प संयोजन) आणि अभिषेक राखेचा (समाज माध्यम संयोजक) जबाबदारी सांभाळतात. बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई, केज आणि धारूर तालुका आणि धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्‍यात संस्थेचे काम सुरू आहे. कोरोना काळात संस्थेने बीड, धाराशीव, जालना आणि परभणी जिल्ह्यामध्ये मास्क वाटप, राशन वाटप, ऑक्सिजन पुरवठा, कोरोना योध्यांना मदत केली होती. दोन्ही जिल्ह्यातील ५३ गावात आतापर्यंत संस्थेने काम केले आहे. सध्या ३० गावात संस्थेचे काम सुरू आहे.

शाळेविषयी गावकऱ्यांमध्ये प्रबोधन ः
संस्थेतर्फे गावातील शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी गावात एक सदस्य नेमला आहे. त्याला आनंददायी शिक्षणाच्या पद्धतीविषयी प्रशिक्षण दिलेले आहे. हा सदस्य शाळेतील उपक्रम, शाळा व्यवस्थापन समिती, पालक सभेसाठी मदत करतो. शिक्षणात ग्रामपंचायतीची भूमिका, ग्रामपंचायतीमधील निधी शाळा आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी कसा खर्च करता येईल याविषयी सदस्यांना मार्गदर्शन करतो.

उपजीविका साधन विकास ः
गावातील रोजगार प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. रोजगाराबरोबरच महिला बचत गट आणि शेतकरी गट सक्षम करण्यावर संस्थेचा भर आहे. पीक उत्पादन ते विक्री व्यवस्था भक्‍कम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. धाराशीव जिल्ह्यातील शेळी आणि बीड जिल्ह्यातील सीताफळ या जीआय मानांकन मिळालेल्या बाबींवर जवळपास २३ बचत गटांसोबत संस्थेचे काम सुरू आहे. त्यांना प्रशिक्षण व इतर सहायक बाबींचे मार्गदर्शन केले जाते.


हिवरा गावातील लोकसहभाग ः
हिवरा (ता.अंबाजोगाई) गावातील बहुसंख्य गावकरी अल्पभूधारक शेतकरी किंवा
शेतमजूर आहेत. गावाच्या बेसलाईन सर्वेक्षणात संस्थेला गावातील पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व म्हणावे तितके नाही आणि ते वर्षातून एकदा किंवा दोनदाच शाळेला भेट देतात असे कळले. तेथील जिल्हा परिषद शाळेत पायाभूत सुविधांचा अभाव होता. शाळेला एक बंद पोर्च असलेली जुनी खोली वगळता कोणतीही सुविधा नाही. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी जमिनीवर बसत होते. शाळेच्या नूतनीकरणात लोकांचे योगदान नव्हते.
हे लक्षात घेऊन संस्थेच्या ग्राम हुनर सहकारी संजीवनी गुळभिले यांनी शाळेतील प्रत्येक पालकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. सततच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या मासिक पालक सभा उपक्रमातून सकारात्मक परिणाम दिसून आला. आता लोक शालेय उपक्रमांमध्ये
सहभागी होतात. २६ जानेवारीच्या निमित्ताने पालकांच्या एका गटाने गावातील प्रत्येक नागरिकाकडून ५ ते १० रुपयांची वर्गणी गोळा करून शाळेसाठी तीन सिटिंग मॅट भेट दिल्या आहेत.

मंगाईवाडी शाळेत पायाभूत सुविधांचा विकास ः
मंगाईवाडी (ता. अंबाजोगाई) गावातील शाळेत बांधकाम झाल्यापासून वीज जोडणी आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. संस्थेचे ग्राम हुनर फेलो बळिराम मुसळे यांनी पालकांमध्ये शिक्षण विषयक जागृती निर्माण केली. त्यांच्या सततच्या प्रयत्नातून काही पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या आवारात पिण्याच्या पाण्याची टाकी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळेत एलईडी टीव्ही उपलब्ध करून दिला आहे.

‘स्लो लर्नर' विद्यार्थ्यांचे बदलले जीवन ः
संस्थेच्या सदस्यांनी शाळेत स्लो लर्नर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संवादातून अनुकूल स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होऊन ते विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यासाठी मुलांच्या आवडीचे खेळ आणि सुप्तगुण समजून घेणे, विविध खेळणी आणि खेळाद्वारे त्यांना स्वतःला शोधण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करत आहे.

आपला प्रकल्प, आपली जबाबदारी
उपक्रम आखणी आणि मांडणी करताना शाश्वतता हा घटक संस्थेने नेहमी केंद्रस्थानी ठेवला. ग्राम हुनर प्रकल्पात शाश्वततेचा विचार करीत असताना दोन निकष ठेवले आहेत. एक म्हणजे समाजाला हा प्रकल्प आपला आहे, ही जबाबदारी आपली आहे ही जाणीव करून देणे. एकदा हा आपलेपणा आला की, प्रकल्पाचे रूपांतर चळवळीत होते आणि मग शाश्वत विकासाची सुरवात होते.
दुसरा निकष म्हणजे लाभार्थ्यांच्या वागणुकीतील बदल. संस्थेसाठी विद्यार्थी हा प्राथमिक लाभार्थी आहे. त्यांच्या आचरणात अजाणतेपणे होणारा बदल सुद्धा शाश्वततेचा पाया रचणारा आहे. या दोन्ही निकषांवर खरे उतरायला कालावधी लागेल पण, त्याच्या काही पाऊल खुणा मात्र संस्थेला सुखावणाऱ्या,ऊर्जा देणाऱ्या आहेत. यातील पहिला बदल म्हणजे कधीही शाळेकडे न येणारा पालक वर्ग आता हळू हळू पालक सभेत सहभागी होत आहे. मुले न सांगता चपला रांगेत ठेवून शिस्त पाळायला लागली आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढली आहे.

संस्थेची स्टेम लॅब
विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान आत्मसात होण्यासाठी ‘स्टेम लॅब' ची संकल्पना संस्थेने राबविली आहे. प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य संस्था उपलब्ध करून देते. सुरूवातील विद्यार्थ्यांना त्यांना तयार करावेसे वाटलेले उपकरण, यंत्र किंवा कोणतीही वैज्ञानिक गोष्ट कशी तयार केली जाते याची प्राथमिक माहिती संस्था देते. त्यानंतर विद्यार्थी स्वकल्पनेतून त्यांना हवे ते उपकरण तयार करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला डीजे, सौर ऊर्जेवर चालणारी गाडी, ड्रोन, रस्ता, पंखा, टेबल फॅन, सौरऊर्जेचा वापर करून तयार केलेली यंत्रे शाळेत पहावयास मिळतात.

सुशासनासाठी धडपड ः
मुख्यमंत्री फेलोशीपमध्ये काम करताना संस्थेच्या सर्व प्रमुखांना जाणवले की शासनाच्या साधारणत: २८ हजार योजना आहेत. परंतु नागरिकांना या योजनांची माहिती नसते. त्यामुळे संस्थेने जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार अंबाजोगाई,केज व धारूर यांच्यासोबत ‘शासन आपल्या दारी‘ या योजनेमध्ये सहभाग नोंदविला. या माध्यमातून जाणीव जागृती वाढविणे, लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, प्राथमिक कागपदत्रांपासून लाभार्थ्यांना सीएमईजीपी,पीएमईजीपी सारख्या रोजगार निर्मिती करणाऱ्या योजनांसाठी शासन जो काही निधी देतो त्याविषयी अवगत केले जाते. योजनांशी लोकांना जोडण्याचे काम संस्था करते आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.आरोग्य तपासणी शिबिरासोबतच परसबागा आणि अन्नधान्यातून पोषणमूल्य कशी जपून आरोग्याचे रक्षण करू शकतो याविषयी महिला गटांसोबत संस्था काम करते आहे.


मंगाईवाडीत पहिली पालक सभा
मंगाईवाडी हे अंबाजोगाई तालुक्‍यातील लहानसे गाव. या गावात सुमारे ५० ते ६० घरे. सर्व गावकरी अल्पभूधारक शेतकरी. शेती डोंगराळ भागात असल्याने हंगामी शेतीचाच पर्याय. सर्व गावकरी ऊसतोडणी मजूर असल्याने वर्षातील सात महिने इतर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. संस्थेने काम सुरू केले तेव्हा गावातील शैक्षणिक वातावरण अपेक्षेपेक्षा खूपच खराब होते. तीन-चार सदस्य वगळता वर्षभरात कोणीही शाळेला भेट दिली नव्हती.
‘ग्राम हुनर फेलोशिप' कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेचे सहकारी बळिराम मुसळे यांनी सुरवातीच्या काळात गावात उपलब्ध पालक आणि आजी-आजोबांसोबत घरोघरी भेटी देऊन गावकऱ्यांमध्ये शालेय शिक्षणाबाबत जागृती केली. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे, शाळेच्या इतिहासातील पहिली पालक सभा जानेवारी, २०२३ मध्ये झाली. या सभेला सुमारे ३५ पालक, आजी-आजोबा आणि शालेय शिक्षण समिती सदस्य उपस्थित होते. तेव्हापासून दर महिन्याला गावात उपस्थित पालक एकत्र येत आहेत आणि शाळेच्या उपक्रमात सहभागी होतात.
----------------------------------------------------
संपर्क ः दादासाहेब गायकवाड,९९११८८७५६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT