Vermicomposting Project
Vermicomposting Project Agrowon
यशोगाथा

Vermicompost Production : बचत गटाने उभारला गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प

राजेश कळंबटे

Women Empowerment : राज्यभर २००३ मध्ये बचत गटांची चळवळ सुरू झाली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पंचायत समितीमार्फत गावागावांतील महिलांना गटांच्या (Women Self Help Group) माध्यमातून विविध विषयांतील प्रशिक्षण देण्यात येत होते. या प्रशिक्षणामध्ये असगोली गावातील उपक्रमशील महिला सहभागी झाल्या होत्या.

या महिलांनी स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत (Self Employment Scheme) १ जानेवारी २००४ रोजी श्री व्याघ्रांबरी स्वयंसाह्यता महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला गटाने पत्रावळ्या तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली.

बचत गटामध्ये सुजाता कावणकर (अध्यक्ष), अनिता कावणकर (सचिव), रंजना कावणकर (खजीनदार), सुलभा रामाणे, सविता कोळंबे, विजया कोळंबे, आश्‍विनी पानगले, तारामती पानगले, राधिका घाणेकर, वंदना कावणकर या महिला कार्यरत आहेत.

पंचायत समितीने घेतलेल्या प्रशिक्षणामध्ये महिलांना गांडूळ खत निर्मितीबाबत (Vermicompost Production) माहिती मिळाली. या गटातील महिलांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तसेच काही खासगी स्तरावरील गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पांना भेटी देऊन गांडूळ खत निर्मितीमधील तंत्रज्ञान समजून घेतले.

गांडूळ खतनिर्मितीला सुरुवात ः

गटातील महिलांनी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या सल्ल्याने ३१ डिसेंबर २००५ रोजी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली. यास पंचायत समितीची चांगली साथ मिळाली.

प्रकल्पाबाबत रंजना कावणकर म्हणाल्या, की आम्ही खतनिर्मितीसाठी चार शेड उभारल्या आहेत. त्यामध्ये १३ फूट बाय ३ फूट बाय ३ फूट आकाराच्या टाक्या बांधल्या आहेत. सध्या ३६ टाक्यांमध्ये गांडूळ खताची निर्मिती केली जाते.

गांडूळ खत निर्मितीसाठी ८० टक्के शेण आणि २० टक्के पालापाचोळ्याचा वापर करतो. गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे शेण महिनाभर कुजवलेले असते. त्यासाठी वेगळा खड्डा तयार केला आहे. आजूबाजूच्या गावांतून गोळा केलेले शेण त्या खड्ड्यात ठेवले जाते.

उन्हाळ्यात पालापाचोळा शेडच्या जवळ जमा करून ठेवला जातो. खत तयार करताना टाकीच्या तळात नारळाच्या सोडणाचा थर देऊन त्यावर पालापाचोळ्याचा थर असतो. त्यावर शेणाचा थर, पुन्हा पालापाचोळा आणि परत शेणाचा थर टाकला जातो.

या ढिगावर पुरेशा प्रमाणात गांडुळे सोडली जातात. साधारणपणे दीड महिन्यात खत तयार होते. आम्ही गांडूळ खताचा दर्जा राखण्यावर भर दिला आहे. खताची प्रयोगशाळेतून तपासणी केली आहे. त्यांचे प्रमाणपत्र आमच्याकडे आहे.

खत उत्पादन आणि विक्रीबाबत रंजना कावणकर म्हणाल्या, की प्रकल्पातून सध्या वर्षाला ४० टन गांडूळ खताची निर्मिती होते.आम्ही १२ रुपये प्रति किलो या दराने खताची विक्री करतो. वर्षाला पावणेचार लाखांची उलाढाल होते.

प्रकल्पामध्ये गटातील दहा महिलांसह अन्य पाच महिलांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गटातील सदस्यांना दरमहा दोन हजार रुपये मजुरी मिळते. वर्षभरातील खत विक्रीच्या नफ्यातून दरवर्षी प्रत्येक सदस्याला दहा हजार रुपये मिळतात.

गटाचे नियोजन ः

दर महिन्याला बचत गटाची बैठक होऊन पुढील महिन्यात करावयाच्या कामाचे नियोजन केले जाते. बचत गटामध्ये दरमहा प्रति सदस्य पन्नास रुपये वर्गणी जमा केली जाते. सध्या गटाची पाऊण लाखांपर्यंत बचत झाली आहे.

मासिक वर्गणी, खेळते भांडवल यामधून अंतर्गत कर्ज व्यवहार, कर्जाचा लाभ, कर्ज व्यवहारातून गटातील सदस्यांना मागणीनुसार आर्थिक मदत केली जाते. शौचालय बांधकाम, घर दुरुस्तीसाठी देखील या रकमेचा वापर केला जातो.

मदतीची पूर्ण परतफेड होते की नाही याचा हिशेब ठेवला जातो. गांडूळ खत प्रकल्पासाठी बँकेकडून मिळालेले पाच लाखांचे कर्ज फेडून आज बचत गट स्वतःच्या आर्थिक गुंतवणुकीवर खंबीरपणे उभा आहे, असे गटाच्या अध्यक्षा सुजाता कावणकर यांनी सांगितले.

बचत गटामुळे फायदा ः

बचत गटाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, ग्रामसभा, पंचायत समिती, विविध शासकीय कार्यालय, बँक या ठिकाणी वारंवार संपर्क सुरू झाल्याने महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढला. वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती मिळाली.

बचत गटाच्या माध्यमातून सहलीचे नियोजन केले जाते. स्वच्छता अभियान, निर्मल गाव, चारसूत्री भात लागवड, शेतीशाळा, वनराई बंधारे, वृक्ष लागवड, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी असलेल्या योजनांचा फायदा झाला.

रोजगार उपलब्धीसोबतच महिलांची एकी, श्रम आणि गांडूळ खतनिर्मिती तसेच शेतीमधील विविध उपक्रमांची दखल घेत शासनाने बचत गटाला कोकण विभाग स्तर, जिल्हा स्तर आणि तालुका स्तरावर राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविले आहे. याचबरोबरीने गटाला २०१९ मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

गटाचे विविध उपक्रम ः

- गावातील नदीवर श्रमदानातून बंधारा बांधून पाणी साठवण. भाजीपाला लागवडीस फायदा.

-समृद्ध ग्राम योजनेतून रोपवाटिका निर्मिती. कोकम, सागाच्या तीन हजार रोपांची निर्मिती.

-असगोली किनाऱ्यावर गणेशोत्सवात दोन टन निर्माल्य संकलन करून खत निर्मिती. सलग चार वर्षे मोहीम.

-चारसूत्री पद्धतीने भातशेती उपक्रम. २००८ पासून गावातील शेतकऱ्यांकडे प्रात्यक्षिकांचे आयोजन.

संपर्क ः सुजाता कावणकर, ८६०५९३०९५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT