गांडूळखत (Vermicompost) म्हणजे गांडूळाच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करुन सेंद्रिय पदार्थापासून (Organic Matter) तयार झालेले खत. यात नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, संजिवके आणि सूक्ष्मद्रव्ये इत्यादीचे प्रमाण शेणखतापेक्षा अधिक असते. यात गांडूळाचे अंडीपुंज असून उपयुक्त जिवाणू आणि प्रतिजैविके असतात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गांडूळ खत कसे तयार करायचे याविषयी दिलेली माहिती पाहू.
गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत?
गांडूळ खताचे उत्पादन कुंडी पद्धत, टाकी पद्धत, खड्डा पद्धत आणि बिछाना पद्धत अशा चार पद्धतीने करतात. शेतावर मोठ्या प्रमाणावर गांडूळखत तयार करण्यासाठी खड्डा पद्धत अधिक सोयीची आहे.
गांडूळ खत तयार करण्याच्या चार पद्धतीपैकी आपल्या सोयीनुसार एक पद्धत निवडावी. निवड केलेल्या पद्धतीसाठी लागणारी खड्डयाची रचना ही जनावरांच्या गोठ्या
जवळ उंच जागेवर योग्य निचरा असणाऱ्या ठिकाणी मांडवाच्या किंवा झोपडीच्या सावलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये करुन घ्यावी, ज्यामूळे उन्हापासून व पावसापासून खताचे व गांडूळाचे संरक्षण होईल.
गांडूळ खत तयार करण्याची खड्डा पद्धत कशी आहे?
३ मीटर लांब, २ मीटर रुंद आणि ०.६ मीटर खोल खड्डा तयार करावा. खड्डा भरतांना सर्वच पद्धतीमध्ये थरांची रचना सर्वसाधारणपणे एकाच प्रकारे केली जाते. सुरुवातीला तळाशी १५ सेमी जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा (उदा. गव्हाचे काड, ऊसाचे पाचट, सोयाबीन, तूर, सूर्यफुलाचा भुसा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग इत्यादी) थर द्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व चाळलेली माती ३:1 या प्रमाणात मिसळून त्याचा १५ सेमी चा थर द्यावा. त्यावर ताज्या शेणाचा किंवा पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करुन १० सेमी चा तिसरा थर द्यावा. शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा. वातावरणानुसार व आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे व खतामध्ये ५० टक्के ओलावा टिकून राहील, याची काळजी घ्यावी. रचलेल्या थरातील उष्णता कमी झाल्यावर एक ते दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारुन कमीत कमी एक हजार प्रौढ गांडुळे सोडावीत. गांडुळांची संख्या कमी असेल तर खत तयार होण्यास अधिक काळ लागतो. पण सर्वसाधारणपणे ३ मी. लांब २ मी. रुंद ०.६ मी खोल या आकारातील जागेत गांडुळांची संख्या १० हजार झाली की, दोन महिन्यात उत्तम असे एक टन गांडूळ खत तयार होते. गांडूळ खताचा रंग काळसर तपकिरी असतो. खत तयार झाल्यावर पाणी बंद करावे. वरचा थर कोरडा झाला की, पूर्ण गांडूळ खत गांडूळासकट बाहेर काढावे व त्याचा बाहेर सूर्य प्रकाशात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकु आकाराचा ढीग करावा. उन्हामुळे सर्व गांडुळे ३-४ तासानंतर तळाशी जाऊन बसतात. नंतर वरचा खताचा भाग हलक्या हाताने वेगळा करुन घ्यावा, ज्यामध्ये कुजलेले गांडुळखत तसेच गांडूळाची अंडी असतील, खाली राहिलेली गांडूळ परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात सोडावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.