Dairy
Dairy  Agrowon
यशोगाथा

Dairy : कुटुंबाच्या दुग्धव्यवसायाचा कणा बनलेली 'श्रद्धा''

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील सत्यवान ढवण हे अल्पभूधारक शेतकरी असून साडेतीन एकर शेती (Agriculture) आहे. लहानपणी पोलिओ झाल्याने त्यांना अपंगत्व (Disability Due To Polio) आले. शेती कमी असल्याने म्हशी (Buffalo) खरेदी विक्रीचा पूरक व्यवसाय सुरु केला. सोबत एक-दोन म्हशींचे दुधासाठी (MIlk Production) घरीही पालन करत.

मुलगी श्रद्धा वडील सत्यवान यांच्यासोबत म्हशींच्या खरेदी-विक्रीच्या निमित्ताने इतर गावी जात असे. तिलाही दुग्ध व्यवसायाची माहिती होऊ लागली. सन २००९ मध्ये घरी एकच दुभती म्हैस होती. तेव्हापासून मग टप्प्याटप्प्याने संख्येत वाढ करत व्यवसाय काहीसा वाढवला. श्रद्धा वयाच्या १० व्या वर्षापासून आई-वडिलांना या व्यवसायात मदत करीत होती. तिलाही व्यवसायाची आवड निर्माण झाली होती. वडील अपंग असल्याने त्यांच्या काही मर्यादा ओळखून वयाच्या १६ व्या वर्षीच श्रद्धाने दुधव्यवसायाची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यावेळी सहा-सात म्हशी गोठ्यात होत्या.

शिक्षण सांभाळून जबाबदारी

एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण व दुसरीकडे दुग्धव्यवसाय अशी श्रद्धाची दुहेरी कसरत सुरु होती.

सुरवातीच्या काळात तर पहाटे साडेतीन ते चार वाजता दिवसाची सुरवात व्हायची. सकाळी सात वाजेपर्यंत डेअरीला दूध घालून कॉलेज करायचे. ते सुटल्यानंतर पुन्हा पशुपालनाची सायंकाळची कामे करावी लागत.. दररोज निघोज ते आळेफाटा (प्रत्येकी ३० ते ३५ किलोमीटर) एकूण ६० किलोमीटर अंतरावर दुचाकी चालवत दीडशे ते दोनशे लिटर दूध घेऊन श्रद्धा ते संकलन केंद्रावर पोच करायची. दैनंदिन कामात, कष्टात, रोजच्या अभ्यासात व आई-वडिलांच्या सेवेत तिने कधीही खंड पडू दिला नाही. असे करीत तिने ‘एमएस्सी फिजिक्स’पर्यंतचे उच्चशिक्षणही यशस्वी पार पाडले.

लग्नानंतरही माहेरची जबाबदारी

अलीकडेच श्रध्दाचा चैतन्य ढोरमले यांच्याशी विवाह झाला आहे. सासर माहेरपासून काही किलोमीटर अंतरावरच आहे. मात्र सासरकडची जबाबदारी सांभाळून श्रध्दा माहेरच्या दुग्धव्यवसायालाही हातभार लावते आहे ही खरंच कौतुकाची गोष्ट म्हणायला हवी. श्रद्धाला वडील, आई जानकी यांची मदत व्हायचीच. आता पशुवैद्यकीय पदविका घेतलेला लहान भाऊ कार्तिक मुख्य जबाबदारी सांभाळतो आहे. त्याने या व्यवसायाचे दोन वर्षांचे प्रशिक्षण हरियाना येथे घेतले आहे. दोन मजूरही गोठ्यात कार्यरत आहेत.

दुग्धव्यवसायातील प्रगती

-कुटुंबाने पत्र्याच्या गोठ्यात लिंबाच्या झाडाखाली दोन म्हशींसह सुरु केलेला दुध व्यवसाय आता पक्क्या गोठ्यात आहे. पाच वर्षांपूर्वी ३० लाख रुपये खर्च करून गोठ्याचे काम केले आहे.

-सध्या म्हशींची (मुऱ्हा) संख्या ८० पर्यंत आहे.

-कुटुंबाच्या दिवसाची सुरवात पहाटे साडेतीन ते चारला होते. सकाळी चारा- पाणी, कुट्टी, आहार,

दूध काढणी, गोठा स्वच्छता व सायंकाळी साडेतीन ते चार वाजता पुन्हा हाच क्रम सुरु राहतो.

-सुमारे ८० म्हशींसाठी पुरेसा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे चार वर्षांपासून मुरघास निर्मिती.

दर वर्षी १०० टन उत्पादन. निघोज तसा पाणीदार भाग आहे. त्यामुळे पावसाळा व हिवाळ्यात चारा उपलब्ध होतो. उन्हाळ्यात मात्र महागडा चारा खरेदी करावा लागत असल्याने अशा वेळी मुरघास कामी येतो.

-दररोजचे संकलन सुमारे ३७५ ते ४०० लिटरपर्यंत.

-एका कंपनीला दूध पुरविले जाते. घरापर्यंत येऊन दूध नेले जाते. दुधाला फॅटनुसार प्रति लिटर

५३ ते ५५ रूपये दर मिळतो. व्यवसायातून सुमारे ३५ टक्क्यापर्यंत नफा मिळतो.

बायोगॅस निर्मिती

व्यवसायाचा विस्तार करताना गोठा ‘इको फ्रेंडली करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी एक वर्षापूर्वी

अकरा लाख रुपये खर्च करून बायोगॅस युनिट उभारले आहे. प्रति दिन एक टन शेणाच्या वापरातून तीस किलो गॅस निर्मिती करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. मात्र हे कुटुंब गरजेपुरते (सुमारे ५०० ते ६०० किलोपर्यंत) इंधन निमिती करते. त्यावर दररोजचा घरचा स्वयंपाक, विहिरीवरील पंप, कडबाकुट्टी, घर, गोठ्याला लागणारी वीज, घरातील विजेची उपकरणे व अन्य कामे होतात. सिलिंडरची जराही गरज पडत नाही. इंधनवायू साठवण्यासाठी ६० हजार किलो साठवण क्षमतेचा बलून बसवला आहे. त्यातून महिन्याला येणारा विजेचा पाच ते सात हजार वा त्याहून अधिकचा खर्च वाचतो. शेणापासून बायोगॅस निर्मिती करणारा एवढ्या मोठ्या क्षमतेचा या भागातील हा एकमेव प्रकल्प असावा.

सेंद्रिय खतनिर्मिती

म्हशीच्या शेणापासून श्रद्धाने दोन वर्षांपासून महिन्याला साधारण ४० ते ५० गांडूळखत व १५ ते २० टन जीवाणूखत तयार करण्यास सुरवात केली आहे. महिन्याला अडीच टनांपर्यंत शेणखत मिळते. उर्वरित खत बाहेरून खरेदी करण्यात येते. महाराष्ट्रासह परराज्यातही या खताला मागणी आहे.

प्रशिक्षकाच्या भूमिकेत

आपल्या आजवरच्या दीर्घ अनुभवातून व ज्ञानातून श्रध्दा लहान वयातच शेतकऱ्यांसाठी

प्रशिक्षक झाली आहे. आपल्या माहेरच्या घरी महिन्यातून दोन वेळा ती हे वर्ग आयोजित करते. स्वतःचा अनुभव सांगण्याबरोबरच तज्ज्ञांनाही त्यासाठी ती निमंत्रित करते.

अत्यंत कमी वयात दुग्ध व्यवसाय आपल्या खांद्यावर पेलून यशस्वी वाटचाल केलेल्या श्रद्धाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी मंत्री जयंत पाटील, उद्योगपती आनंद महिंद्रा, आमदार नीलेश लंके यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे. माजी दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनीही गोठ्याला भेट दिली.चला माती वाचवू या उपक्रमातूनही श्रद्धा कार्यरत आहे. आम्ही कुटुंबातील सर्वांनी मिळून दोन म्हशींपासून ८० म्हशींपर्यंत दुग्ध व्यवसायाचा विस्तार केला. जिद्द व धाडस बाळगल्यास कोणताही गोष्ट अशक्य नाही. नवीन पिढीने व्यवसायातून आपली स्वतंत्र ओळख तयार करायला हवी.

श्रद्धा ढवण- ८३०८२०८२७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT