Pomegranate Farming  Agrowon
यशोगाथा

Pomegranate Farming : चुकांकडे लक्ष दिले ; डाळिंबात प्रावीण्य मिळविले

Fruit Farming Success : दुष्काळी जत तालुक्यातील खंडनाळ (जि. सांगली) येथील रमेश वाघोली यांनी डाळिंब शेतीत होत असलेल्या चुकांकडे कटाक्षाने लक्ष दिले. स्वअभ्यासासह तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : सांगली शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर जत तालुका वसला आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूलता हीच संधी मानून निर्यातक्षम डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. तालुक्यातील खंडनाळ या गावापासून बारा ते पंधरा किलोमीटरवर कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते. गावातील रमेश विठ्ठल वाघोली हे युवा शेतकरी. घरची कोरडवाहू पाच एकर शेती. प्रतिकूल परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी वडिलांनी मोठे कष्ट उपसले. त्यांनी १९७२ चा दुष्काळ पाहिला.

दुष्काळात गावातील तलावकामांवर ते रोजंदारी करायचे. दिवसा दोन रुपये त्या वेळी हजेरी मिळायची. अशा परिस्थितीत कुटुंबाचा प्रपंच चालायचा. पै-पै जमवून, कष्टाचं पाणी करून त्यांनी शेतात विहिरी खोदली. २५ ते ३० फुटांवर पाणी लागलं तेव्हा शेती बागायती होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं. सुरुवातीला भाजीपाला लागवड केली. त्यातून दोन पैसे गाठीला आले. पूर्ण लक्ष देत शेतीच्या उद्धाराकडे लक्ष दिले. जिद्द आणि सचोटी हे गुण रक्तात भिनले होती. आता हक्काचे पैसे देणारे किंवा नगदी पीक हवं यासाठी अट्टहास सुरू झाला.

डाळिंबातील अनुभव

सन २००१- २००२ च्या दरम्यान रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळते अशी माहिती मिळाली. मग विठ्ठल थेट कृषी विभागात धडकले. खरं तर हे पीक त्यांच्यासाठी नवीनच होते. नाही म्हणायला परिसरातील काहींनी त्याची लागवड केली होती.

त्यांच्याकडून जुजबी माहिती घेऊन विठ्ठल यांनीही या पिकाचा श्रीगणेशा केला. जिद्दीने चांगले उत्पादन घेऊन विक्रीही यशस्वी केली. तिथून बागायती शेतीचा चांगला प्रवास सुरू झाला. आर्थिक परिस्थिती सुधारली. दरम्यान, तालुक्याचे कायम दुष्टचक्र ठरलेल्या दुष्काळाने २०१३ मध्ये मोठा दगा दिला. पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली.

हिंमत नाही हरली

बाग जगविण्याची धडपड सुरू होती. पण दुर्दैवाने झाडे वाळून गेली. पण कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. हिंमत कायम ठेवली. वाळलेली झाडे जमिनीपासून एक- दीड फुटापासून तोडली. बुंध्याजवळ मातीचं मडकं ठेवून थेंब थेंब पाणी देऊन झाडे जगवली. या काळात उत्पादनाचा विचार केला नाही. केवळ बाग जगली पाहिजे हीच भावना ठेवली. आता विठ्ठल यांना मदतीसाठी चिरंजीव रमेश देखील तयार होत होते. वडिलांकडून शेतीचे धडे घेतच त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सन २०१५ नंतर मात्र शेतीलाच पूर्ण वेळ देण्याचा निर्धार केला.

डाळिंबाची घेतली जबाबदारी

रमेश सांगतात, की डाळिंब शेतीची जबाबदारी मोठी होती. गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यात अजून म्हणावे तसे यश मिळत नव्हते. बाग योग्य प्रकारे ताणावर जात नव्हती. मर रोगाचे प्रमाण वाढत होते. होत असलेल्या चुकांचा शोध घेतला. अपयश ही यशाची पहिला पायरी असते ही उक्ती समोर ठेवली. या विषयातील च तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

‘ऑनलाइन’ प्रशिक्षण घेतले. आटपाडी, सांगोला, पंढरपूर, बारामती आदी भागांतील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलो. छाटणीपासून ते डाळिंब विक्रीला जाईपर्यंत व्यवस्थापनातील बाबी शिकलो. महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवले. जमेल तेथून ज्ञानाचे गाठोडे घेऊन ते स्वतःच्या शेतात येऊन सोडले.

व्यवस्थापनात केले बदल

मृग बहरातील छाटणी व्यवस्थापनात बदल केले. मेअखेर छाटणी करून सात जूनच्या दरम्यान पानगळ केली जाते. ‘हार्ड छाटणीमुळे फुटवा वाढला जायचा. झाडावरील दोन मिमी. पासून ते १० मिमी जाडीची काडी झाडावर ठेवली. शेंडा खुडला जातो. यामुळे फुलांची संख्या चांगली मिळण्यास मदत झाली.

काडीची जाडी योग्य प्रमाणात ठेवल्याने फुटवाही योग्य प्रकारे मिळाला. तगारा (वॉटरशूट्स) निघाला नाही. फळांचा आकार आणि दर्जा सुधारण्यास मदत झाली. बदलत्या वातावरणातील फूलगळ कमी करण्यासाठी नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित नियोजन केले. उत्पादनासाठी परागीभवन होणे महत्त्वाचे होते.

परंतु आपल्या बागेत ही क्रिया होत नसल्याचे लक्षात आले. मग अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्यातून दालचिनी, ताक, गूळ यांचे मिश्रण करून ते बागेत फवारले. त्यामुळे बागेत मधमाशा येण्याचे प्रमाण वाढले. ज्ञान घेणे व त्याचा योग्य वापर करणे यातून चार- पाच वर्षांत गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळू लागले असा अनुभव आल्याचे रमेश म्हणाले.

निर्यातक्षम उत्पादन

ज्या शेतकऱ्यांच्या बागांना भेटी दिल्या होत्या ते युरोप, बांगलादेश, आखाती देशात डाळिंबाची निर्यात करतात. त्यातूनच निर्यातक्षम उत्पादनाचा ध्यास लागला. सन २०२१च्या दरम्यान तडवळे (ता.आटपाडी) येथील विजय मरगळे डाळिंब उत्पादकांना मोफत सल्ला देतात. त्यांच्या गटात रमेश सहभागी झालो. त्यांच्याकडून निर्यातक्षम व्यवस्थापनाचे धडे घेतले. आता चार वर्षांपासून बांगलादेश आणि आखाती देशांत डाळिंबांची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना माल दिला जात आहे.

कामाचा झाला सन्मान

रमेश यांचे डाळिंबाचे तीन एकर क्षेत्र आहे. एकरी १२ ते १५ टनांच्या दरम्यान त्यांनी उत्पादकता गाठली आहे. त्यांच्याकडे ४०० ग्रॅम वजनाच्या फळांचे प्रमाण ५० टक्के, २५० ते ३०० ग्रॅम फळांचे ४० टक्के तर पाचशे ग्रॅम वजनाच्या फळांचे प्रमाण १० टक्के असते.

बहुतेक माल निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना बांधावरच देण्यात येतो. त्यास १०० ते १२३ रुपये, तर कमाल १५२ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. तर उर्वरित देशांतर्गत बाजारपेठेत ९५ ते १०० रुपये दराने विक्री झाली आहे. जत कृषी विभागातर्फे प्रदर्शनात २०२३- २४ व २०२४-२५ या दोन वर्षांत दर्जेदार डाळिंब उत्पादक म्हणून रमेश यांचा सन्मान झाला आहे.

रमेश वाघोली ७७०९१८४४८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT