यशोगाथा

Dairy Business : दुग्ध व्यवसायातून तुजारपूर गावाने साधली प्रगती

श्‍यामराव गावडे 

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर या मुख्य शहरापासून सांगली रस्त्यावर पाच किलोमीटरवर तुजारपूर
(ता. वाळवा) गावचे शिवार लागते. या गावाने दुग्ध व्यवसायात (Dairy Business) आपला हातखंडा निर्माण केला आहे. गावच्या शिवारात क्षारयुक्त वा चोपण स्वरूपाची जमीन आहे. खरीप हंगामात सोयाबीन तर रब्बीत गहू (Wheat)हे मुख्य पीक (Crop) येथील शेतकरी (Farmer) घेतात. सुमारे १० किलोमीटरवर असलेल्या वाळवा गावच्या हद्दीतून कृष्णा नदीचे (River) पाणी ‘लिप्ट इरिगेशन’ साह्याने आणून शेतकऱ्यांनी बागायती पिके घेण्यास सुरुवात केली. हा बदल गावातील शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

पूरक व्यवसाय बनला मुख्य

पूर्वी कोरडवाहू वा पावसाच्या पाण्यावर आधारित इथली शेती होती. अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागे. प्रत्येकाकडे दोन चार दुभती जनावरे दावणीला असत. त्यांच्या आधारे
दररोजचा कोटुंबिक खर्च भागवला जायचा. गावातील तरुणाईकडे शेतीची जबाबदारी येत गेली तसतसा नव्या विचारांचा बदल सुरू झाला. नफा- तोट्याचे गणित, शेती व पूरक व्यवसायाचे अर्थकारण तरूण पिढीने समजावून घेतले. त्यातून दुग्ध व्यवसायावर भर दिला आणि हाच व्यवासाय पूरक न होता मुख्य झाला.

व्यवसायातून साधली प्रगती

दुग्ध व्यवसायतील नवे तंत्रज्ञान युवा पिढीने आत्मसात करण्यास सुरुवात केली. यशस्वी व अनुभवी पशुपालकांच्या गोठ्यांना त्यांनी भेटी दिल्या. व्यवसायातील बारकावे समजून घेतले. सुरुवातीला दोन ते तीन गायींचे दिसणारे गोठे आता पंधरा- सोळा गायींच्या संख्येवर पोचले आहेत. गावकऱ्यांचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो.

गोठ्यातील कामे, दुधाच्या धारा काढणे व दूध संकलन केंद्रावर जाऊन घालण्यासाठी लागलेली रीघ हे दृश्‍य दिसून येते. व्यवस्थपनात संपूर्ण कुटुंब राबत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्च कमी झाला आहे. जनावरे पैदाशीसाठी कृत्रिम रेतन तंत्राचा वापर केला आहे. त्यातून चांगल्या प्रतीच्या एचएफ संकरित गायींची निर्मिती करणे शक्य झाले आहे.

दोन वेळेस मिळून २५ लिटरपेक्षा अधिक दूध देणारी गाय देखील गोठ्यात दिसते. गावात सुमारे ३५० कुटुंबे आहेत. दररोज पाच हजारांपासून ते सात हजार लिटरपर्यंत दुधाचे संकलन केले जाते. प्रति लिटर ३५ रुपये दर मिळतो. त्यातून वर्षाला काही कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते.

ताजा पैसा देणारा व्यवसाय
गावातील मकरंद नागनाथ पाटील यांच्याकडे दहा गायी व सात पाड्या आहेत. मुक्तसंचार पद्धतीचा गोठा आहे. प्रति गायीपासून सरासरी १५ ते कमाल १८ लिटरपर्यंत दूध मिळते. दररोज सुमारे ६० लिटर वा त्याहून अधिक प्रमाणात दूधसंकलन होते. चांगल्या वंशावळीची पैदास करण्यावर भर दिला जातो प्रति वर्षी एक किंवा दोन पाड्यांची विक्री होते.

त्यातून चांगले उत्पन्न मिळते. पाटील यांना २००८ पासूनचा या व्यवसायातील अनुभव तयार झाला आहे. शेतात दीड एकर हत्ती गवत व मका त्यांनी घेतला आहे. चाऱ्याची शाश्‍वतता जपण्यासाठी मुरघासही तयार केला जातो. या व्यवसायाच्या जोरावरच रोख पैशांद्वारे शेतीसाठी पाणी योजना करणे व कौटुंबिक प्रगती करणे शक्य झाल्याचे ते सांगतात.

प्रति गायीतून वर्षाला ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. वर्षाला प्रति गाय ४० हजार रुपये उत्पन्नाचे ‘टार्गेट’ ठेवूनच व्यवस्थापन केले जाते. या व्यवसायामुळे ताजा पैसा हाती येतो. स्वाभिमाने जगता येते व पैशांसाठी कुणापुढे हात पसरण्याची वेळ येत नाही असे पाटील सांगतात.

अन्य दुग्ध उत्पादकांचे अनुभव

दीपक भीमराव निकम यांच्याकडे लहान- मोठ्या मिळून १२ गायीचा गोठा आहे. शेती व दुग्ध व्यवसाय यांच्या एकत्रीकरणातून सुंदर घऱ बांधणे त्यांना शक्य झाले. त्यास कृषिधन असे नाव दिले आहे. संपूर्ण कुटुंबाने या व्यवसायात घेतलेल्या कष्टाचे या निमित्ताने चीज झाल्याचे निकम सांगतात. दुग्ध उत्पादक सरिता कृष्णा पाटील यांच्याकडे १९८० पासून जनावरांचे संगोपन केले जाते.

मुक्तसंचार गोठा पद्धतीचा विकास त्यांनी केला आहे. दिग्विजय पाटील यांच्या कुटुंबाचा सन २००८ पासून गोठा आहे घरची साडेतीन एकर जमीन आहे. पैकी दीड एकर शेती, राहते घर व पाणी योजना यांचा एकूण विकास दुग्ध व्यवसातून करता आल्याचे त्यना समाधान आहे. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये काहना आर्थिक परिस्थितीमुळे चांगले शिक्षण घेता आले नाही. मात्र आपल्या मुलांनी चांगल्या पद्धतीचे शिक्षण घ्यावे ही तळमळ जवळपास सर्वच कुटुंबांमध्ये दिसून येते. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गावातील बहुतांश मुले जातात. गावातून दररोज सात ‘स्कूल बसेस’ इस्लामपूर या शहराच्या ठिकाणी जाताना दिसतात.

गावात ‘चिलिंग प्लांट’

गावातील दररोजचे दूध संकलन पाहता या भागातील प्रसिद्ध डेअरी कंपनीने येथे ‘चिलिंग प्लांट’ उभा केला आहे. त्या माध्यमातून गाव व परिसरातील गावांमधील दूधही येथे संकलित केले जाते.
गावात लहान मोठ्या सात डेअरी आहेत. या कंपनीमार्फत उत्पादकांना प्रशिक्षण दिले जाते. उच्च दूधक्षमता असलेल्या जनावरांची गोठ्यातच पैदास करण्यासाठी योग्य मार्गदर्शनही केले जाते.

जिद्दी शेतकऱ्यांनी आणले पाणी :

तुजारपूर हे तसे सर्वच पातळीवर दुर्लक्षित असणारे गाव होते. कमी निचरा होणारी जमीन होती. पूर्वी जनावरांच्या चाऱ्यासाठी येथील शेतकऱ्यांना बाहेरगावी जावे लागे. अन्य भागातील शेतकऱ्यांची बागायती शेती पाहून आपल्याकडेही अशी सोय असावी असे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला वाटे. अनेकांनी कूपनलिका घेतल्या.

पण पाणी बऱ्यापैकी पाणी क्षारयुक्त होते. पण कोणत्याही योजनेची प्रतीक्षा न करता पाहता दहा बारा शेतकरी एकत्र आले. त्यांनी पाच ते सात किलोमीटरवरून कृष्णा नदीचे पाणी शेतापर्यंत आणले. पाहिलेले स्वप्न कोणतेही कर्ज न घेता प्रत्यक्षात आणले. विशेष म्हणजे दुग्ध व्यवसायतील नफ्यातून ही रक्कम उभारणे त्यांना शक्य झाले.


संपर्क ः मकरंद पाटील, ९४२११७७९१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT