Poultry Farming Agrowon
यशोगाथा

Desi Poultry Farming : गावरान कोंबडीपालनातून मिळतोय ‘मनानंद’

Farmer Success Story : पुणे जिल्ह्यातील करडे (ता. शिरूर) येथील अल्पभूधारक असलेल्या गणेश घायतडक यांनी गावरान कोंबडीपालनाच्या पूरक व्यवसायातून पंचक्रोशीमध्ये ओळख मिळवली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

संदीप नवले

Income from Poultry : करडे गावशिवारात गणेश पांडुरंग घायतडक यांच्या कुटुंबीयांकडे फक्त तीन एकर शेती आहे. त्यात दहा वर्षापूर्वी संपूर्ण क्षेत्रात लावलेली लिंबू बाग असून, दर आठवड्याला ४०० ते ५०० किलोचे उत्पादन मिळत आहे. त्याच प्रमाणे पूर्वीपासून गावात गणेश हे केश कर्तनाचेही काम करत.

आता त्यांनी पूर्ण शेती व पूरक व्यवसायामध्ये झोकून दिले आहे. सलूनचे दुकान आता मुलगा ऋषिकेश सांभाळतो. सात वर्षापूर्वी लिंबू बागेला जाळीचे कुंपण करत अर्धबंदिस्त कुक्कुटपालनाचे नियोजन केले.

गावरान कुक्कुपालनास सुरूवात

सुरुवातीला प्रयोग म्हणून मुक्त संचार कोंबडीपालन करताना घायतडक यांनी २५ ते ३० कोंबड्या खरेदी केल्या. आपल्याला संगोपन करताना कोणत्या अडचणी येतात, याची पाहणी तीन ते चार महिने केली. कोंबड्यांचे आजार व आरोग्य या बाबत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली.

त्यानंतर त्या बाबत वेगवेगळ्या अनुभवी शेतकऱ्यांच्या भेटी घेत कोंबडीपालनातील विविध बारकावे, लसीकरण, खाद्य व्यवस्थापन यांची शास्त्रीय माहिती मिळवली. थोडासा आत्मविश्वास मिळाल्यानंतर नवीन ३०० पिल्लाची बॅच घेण्याचा निर्णय घेतला आणि ‘मनानंद फार्म’ ने आकार घेतला.

कुक्कुटपालनासाठी तीन शेडची उभारणी

सुरुवातीला १५ बाय ४० फुटाचे पत्र्यांचे एक शेड उभारले असून, त्यामध्ये पाण्याची सुविधा, कोंबड्यांना बसण्यासाठी बांबूचे सुविधा, पाण्यासाठी निपल ड्रिंकर, अंडी घालण्यासाठी प्लॅस्टिकचे कॅरेट यांची व्यवस्था करण्यात आली. सभोवती लोखंडी जाळ्याचे कुंपण केले असून त्यात कोंबड्यांचे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जाते.

या मुक्त संचार पद्धतीमुळे कोंबड्यांची शारीरिक वाढ चांगली होते. आरोग्यही चांगले राहते. पिल्लाची जोपासना सुमारे तीन महिने केल्यानंतर त्यांचे वजन १२०० ते १४०० ग्रॅम आल्यानंतर विक्री केली जाते. या गावरान कोंबडीला प्रति नग ५०० रुपये दर मिळतो. या व्यवसायातून येणाऱ्या उत्पन्नातून हळूहळू पिल्लांची संख्या वाढवत नेली. काही कोंबड्यापासून अंड्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे १६ बाय ६० फूट आणि १८ बाय ९० फूट आकाराची आणखी शेड उभारली असून, त्यात तीन हजार गावरान कोंबड्याचे पालन केले जात आहे.

कोंबड्यांचे खाद्य

संपूर्ण बंदिस्त पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालनामध्ये खाद्याचा खर्च सर्वाधिक असतो. त्या तुलनेमध्ये मुक्त संचार पद्धतीतील गावरान कोंबड्या या लिंबू बागेतील कीडे, मुंग्या खातात. बागेमध्ये पिकांचे अवशेष तसेच राहू दिल्यास त्याखाली कीटकांची पैदास आपोआप होते. त्याच प्रमाणे काही प्रमाणात हॉटेलमधील टाकाऊ खाद्य पदार्थ बागेमध्ये टाकले जातात. या सोबतच स्वस्तामध्ये उपलब्ध होणारा खराब भाजीपाला, गिरणीतील पीठ, गोदामातील वाया जाणारे धान्य देण्यात येते. यामुळे खर्चात बचत होते.

विक्री व्यवस्था

फार्ममध्ये गावरान कोंबड्याची विक्री शिक्रापूर, शिरूर, तळेगाव, चाकण, वाघोली येथे केली जात असे. दरम्यानच्या काळात व्यवसायाची यूट्यूबवर जाहिरात सुरू केली. त्यात त्यांनी संगोपनापासून ते माल विक्रीपर्यतचे सर्व माहिती दिली. त्यामुळे ग्राहक थेट फार्मवर येऊन योग्य जोपासलेल्या कोंबड्यांची मागणी करू लागले. नियमित ग्राहकांना थेट आत फार्ममध्ये स्वतः कोंबडी निवडण्याचीही सोय केली जाते.

गावरान कोंबडीच्या अंडी व मांसाची चव अप्रतिम असल्यामुळे अलीकडे अनेकजण फोनवर किंवा सामाजिक माध्यमातूनही मागणी करू लागले आहे. दूर राहणाऱ्या ग्राहकांकडून कोंबड्या त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी अंतरानुसार योग्य ती रक्कम घेतली जाते. आता त्यांनी प्रत्यक्ष पुणे शहरात कोंबड्या व अंडी वितरणाचे पुढील लक्ष्य ठेवले आहे. वितरण आणि फार्ममधील अन्य कामांसाठी सुमारे चार लाख रुपये खर्चून इलेक्ट्रीक तीन चाकी गाडी घेतली आहे.

उत्पन्न

सध्या कोंबडीला प्रति नग ४०० ते ५०० रुपये, तर कोंबड्याला प्रति नग ६०० ते ८०० रुपये असा दर मिळतो. गावरान अंडी प्रति नग १० रुपये प्रमाणे विकले जाते. वयानुसार पिल्लाची विक्री केली जाते. सध्या महिन्याकाठी साधारण आठ ते नऊ हजार गावरान अंडी व ५०० ते ६०० जिवंत कोंबड्यांची विक्री होते.

आषाढ महिना आणि यात्रा जत्रांच्या काळामध्ये कोंबड्यांना अधिक मागणी असते. दर महिन्याला दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. व्यवस्थापनासाठी येणारा खर्च वजा जाता दरमहा एक ते सव्वा लाख रुपये निव्वळ उत्पन्न हाती येते. त्यांच्या या गावरान कुक्कुटपालन व्यवसाय परिसरात ‘मनानंद फार्म’ म्हणूनच ओळखला जातो.

अन्य पूरक व्यवसायाकडेही वाढला कल

तीन वर्षापासून कुक्कुटपालनाबरोबर शेततळ्यामध्ये बीज सोडून मत्स्यव्यवसाय करत आहेत.

उपलब्ध पीक अवशेष व कोंबडीपालनातील अवशेषांवर गांडूळ खत निर्मिती केली जात आहे.

वीस गुंठे क्षेत्रावर चारा लागवड केली असून, दोन महिन्यात अर्धबंदिस्त शेळीपालन करण्याचा विचार आहे.

मक्यापासून चारा निर्मितीसाठी हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर सुरू केला आहे.

कोंबड्या व शेळ्यांच्या आहाराला पूरक खाद्य म्हणून अझोलाची निर्मिती करत आहेत.

अंडी उबवण यंत्रामुळे तिहेरी व्यवसाय वाढ

काही पक्षी अंड्यासाठी ठेवत प्रथम ५० अंड्यापासून सुरुवात केली. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत नेली. आज दररोज सुमारे ५०० ते ७०० अंड्यांचे उत्पादन व विक्री केली जाते. पूर्वी पारंपरिक खुडूक कोंबड्यांच्या साह्याने अंडी उबवून पिल्ले मिळवली जाते. पण त्यात आता सुधारणा करण्यासाठी १० हजार रुपये खर्चून आधुनिक अंडी उबवण यंत्र विकत घेतले आहे. त्यामुळे एकाच वेळी अंडी विक्री, पिल्लांची विक्री आणि मांसासाठी कोंबड्यांची विक्री अशा तिहेरी पद्धतीने व्यवसायामध्ये वाढ झाली आहे.

गणेश घायतडक, ९२२६३६७५६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT