Indian Agriculture Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : अल्पभूधारक देसले बंधू झाले ४५ एकरांचे मालक

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Indian Agriculture :

जळगाव जिल्ह्यात अंमळनेर येथे प्रकाश, राजेंद्र, अधिकार, देवाजी या चार देसले बंधूंची एकत्रित शेती आहे. एकमेकांच्या समन्वयातून तसेच कष्टी, जिद्दी वृत्तीतून एकेकाळी अल्पभूधारक असलेल्या या बंधूंनी शेती व पूरक व्यवसायांमधून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. देसले बंधू मूळचे नंदाळे (ता. पारोळा) येथील आहेत. मात्र चार पिढ्यांपासून अमळनेर येथे त्यांचे वास्तव्य आहे. वडील उत्तम नारायण देसले यांची केवळ तीन एकर शेती होती. तीही कूळ कायद्याची होती. तिची विक्री करावी लागली. चार मुले व पाच मुली असा उत्तमरावांचा संसार होता. मोठ्या आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे देसले बंधूंचे उच्च, व्यावसायिक शिक्षण होऊ शकले नाही. चौघे बंधू कोबी, मिरची, भुईमूग आदी भाजीपाला व अन्य पिकांची शेतीच सांभाळू लागले.

एकीच्या जोरावर प्रगती

उत्तमरावांनी पुढे चार म्हशी घेत दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यातून शेतीला पूरक आधार मिळून आर्थिक स्रोत तयार झाला. चौघा बंधूंसह कुटुंबातील मंडळीही शेतात राबायची. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होऊ लागली. शेतीची उत्पादकता वाढू लागली. दोन पैसे अधिक हाती येऊ आले. पैशांच्याबचतीमधून शेतीत गुंतवणूक होऊ लागली. मग हळूहळू क्षेत्र खरेदी होऊ लागली. आजमितीला अमळनेर शहरानजीक ढेकू रस्त्याला ४५ एकर बागायती शेती होण्यापर्यंत या कुटुंबाने शेतीत विकास साधला आहे. तीन विहिरी, एक कूपनलिका, दोन मोठे ट्रॅक्टर, दोन बैलजोड्या आहेत. एवढ्या शेतीचा पसारा आजही देसले कुटुंबीय स्वतः राबून सांभाळतात. गरजेनुसार मजूर हाताशी ठेवतात. ट्रॅक्टरसह सर्व यंत्रे, अवजारे चालवण्यात हे बंधू पारंगत आहेत. कुटुंबात २५ सदस्य आहेत. व्यवहार एकत्र आहे. एकीच्या जोरावर कुठलीही अवघड वाटणारी कामे व्यवस्थित उरकून कुटुंबाने शेतीत यश मिळवले आहे.

जबाबदाऱ्यांची विभागणी

शेतीतील विविध जबाबदाऱ्या सर्व बंधूंनी वाटून घेतल्या आहेत. शेतीशी बोला, राबा, आरोग्य, समृद्धी मिळवा, असा मंत्र ते देतात. देवाजी माळरानावर म्हशी चरण्यासाठी घेऊन जातात. मोठे बंधू प्रकाश यांचे वय ६८ वर्षे आहे. मात्र तरुणांच्या उत्साहाने ते दिवसभर शेतात सक्रिय असतात. मजुरांवर देखरेख, बाजार व्यवस्थापन ते पाहतात. राजेंद्र हे बैलजोडी, यंत्रे-अवजारे तर अधिकार हे फवारणी, खते आदी कामे सांभाळतात. अशा समन्वयामुळे कामे चोख, लवकर होतात.

रेशीम शेतीचे उत्तम व्यवस्थापन

दोन रेशीम कीटक संगोपन गृहे आहेत. चार एकरांत व्ही वन वाणाची तुती आहे. तापमान नियंत्रणासाठी संगोपन गृहाला हिरवी नेट लावली आहे. लोखंडी रॉड, सळयांच्या मदतीने तयार केलेले पाच मजली रॅक्स आहेत. घरातील महिला सदस्य येथील कामकाज पाहतात. प्रति बॅच सुमारे २५० अंडीपुंजांची असते. दर २५ दिवसांच्या या काळात सव्वादोन ते कमाल अडीच क्विंटलपर्यंत रेशीम कोषांचे उत्पादन साध्य करण्यात येते. त्यानंतर संगोपन गृहाची स्वच्छता, सफाई व निर्जंतुकीकरण होते. कोषांची विक्री जालना येथील बाजारात होते. देसले यांच्याकडील रेशीम कोष दर्जेदार असल्याने त्यांना चांगला उठाव असतो. चारशे ते ५५० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. वर्षात चार ते पाच बॅचेस घेण्यात येतात. शेळीपालनासाठीही वेळ देणे आवश्‍यक असते.

बंदिस्त शेळीपालन

राजस्थानातील टोंक येथून राजस्थानी वाणाच्या शेळ्या आणल्या असून प्रत्येकी ५० शेळ्या व बोकड आहेत. पत्र्याचे मजबूत असे ६० बाय ४० फूट आकाराचे बंदिस्त प्रकारचे संगोपनगृह तयार केले आहे. दिवसभरात एक वेळेस शेळ्यांना भ्रमण करण्यासाठी मोकळे सोडले जाते. तुतीचा चारा तसेच शेतातील मका व अन्य पिकांचा चारा त्यांच्यासाठी राखीव ठेवला जातो.

जाफराबादी म्हशींचे संगोपन

सुमारे १५ जाफराबादी म्हशी व एक रेडा आहे. म्हशी रोज चराईसाठी नेण्या येतात. दररोजचे ५० ते ६० लिटर दूध संकलन होते. दुधाची खरेदी करण्यासाठी खरेदीदार थेट गोठ्यात येतात. दुधाची गुणवत्ता व सचोटी अनेक वर्षांपासून जोपासली असल्याने ३० ते ३२ वर्षांपासून या खरेदीदारांकडून दुधाची थेट खरेदी होते.

शेतीचे अर्थकारण उंचावले

मका, सोयाबीन, कापूस, गहू, हरभरा. चारा अशी पिकांची विविधता जपली आहे. कापूस प्रमुख पीक असून त्याचे २५ एकर क्षेत्र असते. चोख व्यवस्थापन हा मंत्र घेऊन देसले बंधूंनी सर्व पिकांमध्ये हातखंडा तयार केला आहे. रेशीम शेती व अन्य पूरक व्यवसायांच्या उत्पन्नाचा मोठा आधार तयार झाला आहे. त्यामुळे शेतीत चांगली गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. वर्षातून एक वेळेस बोकडांची विक्री होते. त्यातून तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात. दुग्ध व्यवसायातून दर आठवड्याला ताजे उत्पन्न मिळते. जनावरांचे शेण- मूत्र शेतीत वापरले जाते. त्यामुळे जमीन सुपीकता वाढीस चालना मिळते. शेतातच निवासस्थाने असल्याने शेती व पूरक व्यवसायांकडे पूर्णवेळ लक्ष देता येते.सर्वांच्या एकत्रित विचार विनिमयातून व निर्णयातून शेतीत चांगली स्थिरता मिळवणे देसले कुटुंबाला शक्य झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT