Snehvan With Ashok and Archana Deshmane Agrowon
यशोगाथा

Success Story : शेतकऱ्यांच्या लेकरांचे हक्काचे घर- ‘स्नेहवन’

Snehvan Hostel : आत्महत्याग्रस्त, निराधार किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी अशोक व अर्चना या देशमाने दांपत्याने श्री. क्षेत्र आळंदीपासून (जि. पुणे) नजीक ‘स्नेहवन’ उभारले आहे.

मनोज कापडे

Success Story of Hostel : अशोक देशमाने हा परभणी जिल्ह्यातील मंगरूळ (ता. मानवत) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण. जिद्दीने शिकून तो संगणक अभियंता झाला. एकीकडे चांगल्या वेतनाची नोकरी करीत जगणे सुरू होते. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांविषयक समस्यांमुळे तो अस्वस्थ होत असे.

अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते. ती बालमजुरीकडे वळतात. अशा मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे हा ध्यास अशोकला लागला. मग चक्क नोकरी सोडत त्याने पुणे उपनगर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये केवळ दोन खोल्यांमध्ये १८ मुलांसह २०१५ मध्ये वसतिगृह सुरू केले. या प्रकल्पाला नाव दिले स्नेहवन. बाबा आमटे, स्वामी विवेकानंद, भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या स्नेहवनाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वाटचालीत अशोक यांना तेवढीच समर्थ साथ मिळाली ती पत्नी अर्चना यांची. दांपत्याचा हा प्रवास प्रेरणादायी व चकित करणाराच आहे.

आळंदी भागात साकारले ज्ञानग्राम

निराधार मुलांना वाढविण्याची दांपत्याची धडपड, जिद्द पुण्यातील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. रवींद्र व स्मिता हे कुलकर्णी दांपत्य बारकाईने बघत होते. त्यांनी आपली आळंदीमधील काही कोटी रुपयांची दोन एकर जागा ‘स्नेहवन’साठी दान केली. अशोक यांनी मग त्या भागात समाजातील दानशूर व्यक्तींकडून हळूहळू आवश्‍यक साधने जमा करीत या परिसराला नाव दिले ‘नलिनीताई कुलकर्णी ज्ञानग्राम’.

आजमितीला येथे राज्यातील गरजू शेतकरी कुटुंबातील सुमारे २०० मुलांसाठी निवास व शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. सक्षम व आत्मनिर्भर भारतासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना त्याग, सेवा, समर्पण, सामाजिक बांधिलकीचे धडे देण्याचा संकल्प असल्याचे अशोक सांगतात.

संपूर्ण परिवार झटतोय

अशोक यांचे आई- वडील सत्यभामा व बाबाराव हे देखील आपले गाव सोडून नव्या रूपातील स्नेहवनमध्ये राहण्यासाठी आले आहेत. मुलांचे शिक्षण, आरोग्य व एकूणच संगोपनाची जबाबदारी

आता संपूर्ण परिवाराने घेतले आहे. अशोक- अर्चना दांपत्याच्या आनंदी व राधा या मुलींना देखील याच स्नेहवनमध्ये वाढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. देणगीतून आता तीन सुसज्ज इमारती उभारल्या आहेत. विविध संकटांमधून मार्ग काढत स्नेहवनचा ज्ञानयज्ञ अखंड सुरू ठेवण्यात देशमाने परिवार यशस्वी झाला आहे.

स्नेहवन व त्यातील सुविधा

आळंदीपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे स्नेहवन.

रखुमाई, विठाई, माउली अशी तीन वसतिगृहे. पहिल्या इमारतीत निवासाची सोय.

स्वयंपाकघर, ग्रंथालयासह असलेल्या या इमारतीत खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश, प्रसाधनगृहे, सौर दिव्यांची सोय.

रखुमाई नावाच्या इमारतीत १०० मुलींच्या संगोपनाची सोय.

तीन लाख लिटर क्षमतेचा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प.

माउली वसतिगृहात आणखी १०० मुलांच्या निवासाची सोय. साहित्य ठेवण्यासाठी कप्पे.

परदेशी शिक्षक विविध विषय शिकवण्यासाठी येतात. ‘ग्लोबल क्लासरूम तयार करण्यात

आली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात सामाजिक विषयात कार्यरत युवावर्ग दूरदृश्‍यप्रणालीद्वारे येथील मुलांना प्रशिक्षित करतात. वर्षातून एकवेळ तरुण किंवा तरुणी सहा आठवडे येथे मुक्कामाला असतात.

मुलांना संभाषण कौशल्य, जागतिक भाषा, विज्ञान- तंत्रज्ञानाची माहिती या वेळी दिली जाते.

मुलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसर ‘सीसीटीव्ही’ प्रणालीखाली.

पुस्तकांच्या जगात रमतात मुले

इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांमधील सुमारे पंधरा हजार पुस्तकांचे वाचनालय येथे आहे. वाचनालयाचे विविध भाग केले आहेत. प्रत्येक भागाला समन्वयक असून त्याची जबाबदारी मुलांकडे सोपविली आहे. ते पुस्तकांची देवघेव घडवून आणतात. एक पुस्तक- एक चित्रपट असा अभिनव उपक्रमही येथे राबवला जातो.

देशी गायींचे दूध

सुमारे १६ गीर गायींच्या गोशाळा उभारणीतून मुलांना देशी, निर्भेळ दूध मिळते. त्याचबरोबर

दुग्ध व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, शेणापासून बायोगॅस, वीजनिर्मिती, आधुनिक गोठा उभारणी आदींचे प्रत्यक्ष शिक्षण मुलांना मिळते.

मुलांमध्ये रुजतेय कौशल्य

मल्लखांब, योग आदींच्या माध्यमातून येथे खेळाडू तयार होत आहेत. स्नेहवनचा एक विद्यार्थी मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात तिसरा आला आहे. बुद्धिबळ, कथ्थक, पाककला, शेतीकामांपासून ते प्रशासन, व्यवस्थापन, लेखा, संभाषण अशा प्रत्येक कौशल्याला हलक्याफुलक्या खेळांमधून मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

संगीत आणि शास्त्राचे धडे

स्नेहवनमध्ये फेरफटका मारला संगीत वर्गात संवादिनीची धून, तबल्यावरील ठेके ऐकू येतात. नृत्याचेही धडे मिळतात. शालेय अभ्यासक्रमातील प्रयोगांचे योग्य आकलन व्हावे यासाठी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळा येथे उभारल्या आहेत. संगणक प्रशिक्षण केंद्रही चालवले जाते.

घडताहेत उद्याचे उद्योजक

उद्योजक होण्याचे प्रत्यक्ष धडे स्नेहवनातील मुलांना शालेय जीवनातच मिळत आहेत. येथील काही मुले पदवीधर होत आहेत. भारतरत्न नानाजी देशमुख श्रम संस्कार केंद्र आणि सावित्री महिला सक्षमीकरण केंद्र या ठिकाणी आहे. शिवणकाम, दुग्ध व्यवसाय, प्लंबिंग, वेल्डिंग, वायरमनपासून ते भरतकामापर्यंत व्यावसायिक शिक्षणाची सुविधा येथे आहे. डाळ, पापड, मसाले, पनीर निर्मितीची साधने येथे आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम शेती उद्योग प्रशिक्षक केंद्र आकारास आले आहे.

पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श

पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श देशमाने दांपत्याने मुलांना घालून दिला आहे. स्नेहवन पूर्णतः सौरऊर्जेवर चालवले जाते. त्यासाठी ७० किलोवॉट ऊर्जेचा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर स्वयंपाकघर किंवा परिसरातील ओला कचरा संकलित करून बायोगॅस प्रकल्पही साकारला आहे.

मान्यवरांच्या भेटीने गजबजते स्नेहवन

राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्नेहवनला भेट देण्यासाठी व मुलांशी गप्पा मारण्यासाठी दानशूर मंडळी तसेच मान्यवर येथे येतात. यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, सनदी अधिकारी किरण गित्ते, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अशोक कुकडे, रमेश पतंगे, डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांचा यात समावेश आहे.

खेडेगावात घरची गरिबी असेल, गावात शाळा नसेल तर मुलांना शिकवणे शक्य होत नाही. त्यातूनच स्नेहवनचा जन्म झाला. राज्यातील आत्महत्याग्रस्त किंवा आईवडील नसलेल्या शेतकरी कुटुंबातील मुले ‘येथे जरूर पाठवावीत. त्यांना मोफत प्रवेशाची संधी देणारा हा अभिनव प्रकल्प दानशूरांच्या बळावर सुरू आहे. येथे पहिल्या वर्षापासून प्रवेश दिला जातो. मुलांना ज्ञान- विज्ञानाबरोबरच गीता, ज्ञानेश्‍वरीचे धडे दिले जातात. उत्तम संस्कार व व चारित्र्याने भारलेला येथील विद्यार्थी असावा याच ध्येयाने आमची वाटचाल सुरू आहे.
अशोक देशमाने, ८७९६४००४८४

पत्ता- स्नेहवन (आळंदीपासून ८ किलोमीटर) वडगाव घेनंद रोडवर, कोयाळी फाटा, कोयाळी फॉरेस्ट, कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड, जि. पुणे ४१०५०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT