Hirda Medicinal Tree : हिरडा झाला उदरनिर्वाहाचे साधन

Hirda Farming : पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील भीमाशंकर भागात हिरडा या औषधी वृक्षांची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. याच हिरड्याने आदिवासी शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले आहे. याच अनुषंगाने या औषधी वनउपजावर टाकलेला दृष्टीक्षेप.
Hirda
Hirda Agrowon
Published on
Updated on

Hirda Tree Success Story : पुणे जिल्हयात आंबेगाव तालुक्याचा पश्चिमेकडे प्रसिद्ध भीमाशंकर परिसर आहे. सह्याद्रीच्या रांगा असलेल्या या प्रदेशात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी दोनहजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडतो. विविध औषधी वनस्पती, फळझाडांची येथे विविधता आढळते. उन्हाळ्यात मात्र येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या हंगामात अनेक फळपिकांचे वा पारंपरिक वृक्षांचे बहर हंगाम सुरू असल्याने त्यांच्यापासून उत्पादन सुरू असते. साहजिकच शेतकऱ्यांना विक्रीसाठी रानमेवा उपलब्ध होत असतो.

हिरडा झाले उपजीविकेचे साधन

पित्त, कफ, वात तसेच अन्य आजारांवर गुणकारी अशा आयुर्वेदिक महत्व असलेल्या हिरडा वृक्षाची झाडेही या भागात भरपूर आहेत. पोखरी, तळेघर, राजेवाडी, भोरगिरी, चिखली, जांभोरी, फलोदे, राजपूर, तेरुंगन कोंढवळ अशी लांबलचक यादी असणाऱ्या गावांमध्ये हिरडा उपलब्ध होतो. उन्हाळ्यात इथल्या वाड्यावस्त्यांवरील शेतकरी हिरडा संकलित करण्याच्या कामात गुंतलेला असतो. हिरडा हे त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन झाले आहे.

Hirda
Hirda Production : हिरडा उत्पादकांना मदत मिळणार

हिरड्याचे व्यवस्थापन

अनेक शेतकऱ्यांकडे शेताच्या परिसरात अनेक वर्षे वयाची हिरड्याची झाडे दिसून येतात. व्यवस्थितरीत्या संगोपन करून २०० किलो पासून ते एक टनांच्या आसपास एकूण हिरडा संकलित केला जातो. काही शेतकरी नियमित हंगाम संपल्यानंतर थोड्याफार प्रमाणात छाटणी करतात. पावसाळ्यात पाण्याची फारशी गरज भासत नसली तरी रब्बी हंगामात पिके घेत असताना झाडांना पाणी देण्यात येते. प्रामुख्याने नोव्हेंबरमध्ये ढोबळा हिरडा तर मेच्या दरम्यान बाळहिरडा तयार होतो. काढणी करतानाचा हिरडा हिरवा आणि जाड असतो. अनेक शेतकरी बांबूच्या काठीच्या साहाय्याने झोडणी करतात. खाली पडलेल्या हिरडा मग संकलित केला जातो. त्यातील काडीकचरा बाजूला करून त्याची प्रतवारी केली जातो. सात ते आठ दिवस कडक उन्हात तो वाळविला जातो. पूर्ण वाळल्यानंतर गोणीमध्ये भरून ठेवला जातो.

बाजारपेठ

व्यापारी एक, दोन, तीन, चार नंबर असे प्रकार पाडून त्यानुसार दर देऊन खरेदी करतात. बाजारातील दर वाढतात त्यावेळी अनेक शेतकरी हिरडा थोडा थोडा करून विकतात. रंगारी किंवा ढोबळ्या हिरड्यास (जाड) किलोला १८ ते २० रुपये दर मिळतो. विविध रासायनिक कंपन्यांमध्ये रंगासाठी त्याचा वापर होतो. बाळ हिरड्यास (अपरिपक्व) हाच दर १६० ते १७० रुपये असतो. याचा औषधांमध्ये विशेषतः बालकांसाठीच्या औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच बरोबर पापडीला २०० ते २५० रुपये दर मिळतो.

Hirda
Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

शासनाकडून हमीभाव

शासनाकडून हिरड्याला पहिल्यांदाच प्रति किलो १७० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु भीमाशंकर, तळेघर भागात अजूनही त्याहून कमी दरांत खरेदी होत असल्याचे आढळून येते. त्यामुळे हिरडा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन हमीभावाने खरेदी करण्यास व्यापाऱ्यांना भाग पाडावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हिरड्याचा बाजार

पुणे जिल्ह्यात हिरड्याचे मार्केट फारसे उपलब्ध नाही. तथापि तळेघर येथे अनेक वर्षापासून दर गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा बाजार भरतो. परिसरातील वीस ते पंचवीस गावांमधून पाच ते दहा टन हिरडा येथे विक्रीस येतो. दोन ते तीन व्यापारी खरेदी करतात. गुणवत्तेनुसार तोंडी बोलीनुसार दर सांगतात. शेतकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर खरेदी होते. पावसाळ्यात उत्पादन कमी झाल्यावर दरांत काही प्रमाणात वाढ होते.

यावर्षी प्रथमच किसान सभा व बाळहिरडा उत्पादकांच्या सातत्यपूर्ण लढ्यातून बाळहिरड्यास हमीभाव जाहीर झाला आहे. त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करावी, शेतकरी हिताचे धोरण राज्य शासनाने जाहीर करावे अशी आमची मागणी आहे.
डॉ. अमोल वाघमारे, अध्यक्ष, पुणे जिल्हा किसान सभा ९४०५८५३४७८
आमच्याकडे बांधावर अनेक झाडे आहेत. दरवर्षी मेमध्ये संकलित करून हिरडा वाळवितो. दर वाढतात त्यावेळी विक्री करतो. यंदा एक ते दीड क्विंटल विक्री केली. प्रति किलो १५० रुपयांपर्यंत दर मिळाला.
बाळू बेंधारी, पोखरी, ता. आंबेगाव, ९७६५७१०१६०
उन्हाळ्यात हिरडा आमच्यासाठी उदरनिर्वाहाचे चांगले साधन ठरला आहे. या काळात सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हिरडा गोळा करून आणतो. वाळवून गोण्या भरून ठेवतो. या कष्टातून महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये खर्चासाठी उपलब्ध होतात.
चिंतामण भागीत, पोखरी
दहा ते पंधरा वर्षापासून हिरडा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. तळेघर येथील बाजारात दर आठवड्याला दोन ते तीन टन आवक असते. गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. गेल्या वर्षीचा ६० टन हिरडा शिल्लक आहे. खोकल्यावरील औषधासाठी त्याचा वापर होतो.
राजू इनामदार, तळेघर ९४२१०३८९९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com