Dairy Business : दुष्काळात जपले दुग्धव्यवसायात सातत्य

Dairy Farming : देवलगाव आवचार (ता.मानवत, जि. परभणी) येथील बालासाहेब आवचार यांच्या संयुक्त कुटुंबाने कोरडवाहू स्थितीत चौदा वर्षांपासून दुग्धव्यवसाय चांगल्या प्रकारे टिकवून यशस्वी केला आहे.
Aavchar Family
Aavchar FamilyAgrowon

Success Story of Milk Farmer : देवलगाव आवचार (ता.मानवत, जि. परभणी) येथील बालासाहेब आवचार यांच्या संयुक्त कुटुंबाने कोरडवाहू स्थितीत चौदा वर्षांपासून दुग्धव्यवसाय चांगल्या प्रकारे टिकवून यशस्वी केला आहे. गोठ्यात सुमारे २४ म्हशींची पैदास करून आज ५० पर्यंत पशुधनाचा सांभाळ होत आहे. दररोज दोनशे लिटर दुधाची निर्मिती व स्वतःच्याच डेअरीतून त्याची विक्री व्यवस्था देखील उभारली आहे.

परभणी जिल्ह्यात मानवत-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर देवलगाव-आवचार (ता. मानवत) गाव आहे. परभणी-मनमाड रेल्वेमार्गावरील ते रेल्वे स्टेशनही आहे. गावातील बालासाहेब शेषराव आवचार यांचे पूर्वी तीन भावांचे संयुक्त कुटुंब व २८ एकर वडिलोपार्जित जमीन होती. विभक्तीनंतर बालासाहेबांच्या वाट्याला नऊ एकर जमीन आली. कोरडवाहू भाग व सतत दुष्काळी स्थितीमुळे केवळ पिकांवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्यामुळे कुटुंबाने पूरक व्यवसायाचे पर्याय स्वीकारले. काही वर्षापूर्वी ट्रॅक्टरचलित अवजारांव्दारे शेतीची कामे ते भाडेतत्वावर करून देत. व्यवसायात चांगला जम बसला. तीन ट्रॅक्टर होते. पुढे गावात ट्रॅक्टरची संख्या वाढली. मग घरच्या शेतीसाठी एक ट्रॅक्टर ठेऊन हा व्यवसाय बंद केला. आज हळद, सोयाबीन, कापूस, आदी पिके ते घेतात. सिंचनासाठी विहीर व शेततळ्याची व्यवस्था आहे.

Aavchar Family
Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

दुग्धव्यवसायात बसविला जम

सन २०१० मध्ये म्हैस खरेदी केली. घरची दुधाची गरज भागून थोड्या प्रमाणात विक्री सुरू केली. मग दोन म्हशी घेतल्या. गावाशेजारील हॉटेल्सना दुधाची विक्री होऊ लागली. हळूहळू व्यवसायाचा आवाका येऊ लागला. मागील १४ वर्षांच्या काळापासून विविध आव्हानांचा सामना करीत व्यवसाय टिकवण्यासह त्याचा विस्तार साधला आहे. सध्या जाफराबादी व मुऱ्हा जातीच्या मिळून २६ म्हशी व लहान जनावरे मिळून सुमारे ५० पर्यंत पशुधन आहे.

असे आहे दुग्धव्यवस्थापन

गावापासून एक किलोमीटरवर शेत. तेथील आखाड्यावर दोन गोठ्यांची उभारणी. जुना गोठा १५ बाय १२ फूट तर नवा गोठा ६० बाय ३५ फूट आकाराचा.

पक्क्या गव्हाणी बांधल्या आहेत. त्यात नळाव्दारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

म्हशींना बसण्यासाठी रबरी मॅटस. वयानुसार व दुभत्या अवस्थेनुसार जागेची विभागणी. येत्या काळात मुक्त गोठा तयार करण्याचा मानस.

दरवर्षी ३- ४ एकरांत विविध सुधारित जातींच्या चारा पिके. रब्बीत ७ ते ८ एकर ज्वारी. त्यापासून धान्याबरोबर कडबा उपलब्ध होतो. सोयाबीनचे कुटार, मक्याचा भरडा आदींचा वापर. हरभऱ्याचा भुस्सा विकत घेण्यात येतो. दर महिन्याला ६० क्विंटल सरकी पेंडीची गरज. यंत्राद्वारे कुट्टी करून खाद्याचा वापर.

लाळ्या खुरकत, घटसर्प प्रतिबंधक लसीकरण. आरोग्याची नियमित तपासणी.

गोठ्यातील कामांसाठी परराज्यातील दोन मजूर तर शेतीकामांसाठीही दोन मजूर तैनात. सर्व कामांच्या वेळा ठरवण्यात आल्या असून त्यानुसारच कामे करण्यावर भर असतो. चोख व्यवस्थापनातून व्यवसायात सुसूत्रता आणली आहे.

Aavchar Family
Dairy Business : कुटुंबाच्या एकीतून दुग्ध व्यवसाय केला यशस्वी

स्वतःची दूधविक्री व्यवस्था

दूधसंकलन वाढू लागले तशी परभणी येथील हॉटेल्सना विक्री सुरु केली. परंतु दरांच्या बाबतीत मर्यादा येऊ लागल्या. मग स्वतःची विक्री व्यवस्था उभारण्याचे ठरवले. परभणी शहरातील गणपती चौक परिसरात भाडेशुल्काने जागा घेत डेअरी सुरु केली. आज दररोजचे दूध संकलन २०० लिटरच्या आसपास आहे. सकाळ, संध्याकाळी विक्री होते. पंधरा ते वीस लिटर दुधाचे रतीब आहे. प्रति लिटर ७० रुपये दर आहे. येत्या काळात तूप, पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे नियोजन आहे.

पासष्टीतही बालासाहेबांचा उत्साह

बालासाहेबांचे वय आज पासष्ट वर्षे आहे. पण नव्या उमेदीने व उत्साहाने दुग्धव्यवसायातील विविध कामे ते करतात. मुलगा गोविंद यांनी दुग्धव्यवसायाची तर सुरेश यांनी शेतीची मुख्य जबाबदारी पेलली आहे. विशेष म्हणजे बालासाहेब मोटारसायकलवरून कॅन वाहून २५ किलोमीटरवरील परभणीत दररोज दूध विक्रीसाठी नेतात. आजवरच्या अनेक दुष्काळांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. परंतु यंदा मात्र मोठ्या प्रमाणावर चारा विकत घेऊन नियोजनाची वेळ आल्याचे ते सांगतात.

उंचावले अर्थकारण

शेती व दुग्धव्यवसायाची जोड यातून कुटुंबाचे व शेतीचे अर्थकारण उंचावले आहे. दुग्धव्यवसायात तीस ते चाळीस टक्के नफा मिळतो. त्यातील उत्पन्नातून घर बांधले. फोर व्हीलर घेतली. मुलांचे शिक्षणा करता आली. सहा- सात एकर शेती खरेदी करता आली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेणखत मिळते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास व रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत झाली आहे. एका म्हशीपासून व्यवसायाला सुरवात केली होती. आज गोठ्यातच २४ म्हशींची पैदास केल्याने त्या विकत आणण्याचा मोठा खर्च कमी केला आहे. त्यामुळे भांडवलात बचत साधली आहे.

दुष्काळात चाऱ्यासाठी संघर्ष

यंदा मानवत तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप कमी राहिले. विहिरींची पातळी खालावली. जानेवारीपासूनच विहीरी उपशावर आल्या. हिरव्या चाऱ्याचे क्षेत्र कमी झाले. त्यामुळे यंदा रब्बी ज्वारी निसवल्यानंतर हिरवा चारा म्हणून त्याचा वापर केला. प्रति शेकडा चौदाशे रुपये दराने ज्वारी कडब्याच्या १८ हजार पेंढ्या तर हरभऱ्याचा भुस्सा प्रति किलो चार रुपये दराने विकत घेऊन साठविला.असा संघर्ष व आर्थिक नियोजन केल्याने दुग्धसंकलनात खंड पडला नाही. जनावरांची संख्या कमी करण्याची वेळ आली नाही.

बालासाहेब आवचार ९९२१९३३९४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com