Orange Production Agrowon
यशोगाथा

Nagpuri Orange Production : नागपुरी संत्रा उत्पादनात ‘प्रगतिशील’ ओळख

Vinod Ingole

Agriculture Success Story : नागपूर जिल्ह्यात कळमेश्‍वर तालुक्‍यातील पानउबाळी हे एक हजारांवर लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाच्या शिवारात संत्रा लागवड (Orange Cultivation) मोठी आहे. सिंचनासाठी विहिरी, बोअरवेलची सुविधा आहे.

गावातील गुलाबराव मुळे यांचीही प्रगतिशील संत्रा बागायतदार (Orange Producer) म्हणून ओळख आहे. त्यांची ४० एकर शेती आहे. त्यातील सुमारे १६ एकर क्षेत्र संत्राबागेने व्यापले आहे.

नागपुरी संत्रा हेच प्रसिद्ध वाण घेतले आहे. आजमितीला दहा ते पंधरा वर्षांची झाडे बागेत पाहण्यास मिळतात. २० बाय १५ फूट अंतरावर लागवड केली असून सर्व मिळून सुमारे दोन हजार झाडे आहेत.

व्यवस्थापनातील बाबी

१) दोन हजार झाडांचे संगोपन करणे तशी सोपी बाब नाही. पण अभ्यास, स्वतः सतत कष्ट करीत राहणे व प्रयोगशील राहणे या गोष्टींमधून मुळे यांनी मुलगा वीरेंद्र यांच्या मदतीने ते शक्य केले आहे. संत्रा पिकात फायटोप्थोरा हा महत्त्वाचा रोग असतो.

पाण्याचा काटेकोर आणि नियोजनबद्ध वापर न केल्यास बागेत बुरशीजन्य रोग वाढीस लागतात. त्यामुळे फळगळतीलाही सामोरे जाण्याची वेळ येते. मुळे सांगतात की माझ्या बागेत तुम्हाला फायटोप्थोरा आढळणार नाही.

झाडाच्या खोडापासून तीन फूट अंतरावर ठिबकच्या दोन लॅटरल्स अंथरल्या आहेत. त्यामुळे पाणी एकाचजागी अतिरिक्त साठून राहत नाही. त्याचे समान वाटप होते. रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचे ड्रेंचिंगही केले जाते.

२) दरवर्षी आंबिया बहर घेतला जातो. त्याची फळे झाडावर असताना १० डिसेंबरला पाणी देण्यात येते. त्यानंतर ३० डिसेंबरपर्यंत बाग ताणावर सोडली जाते. तीस डिसेंबरला पुन्हा पाणी व त्यानंतर १५ तारखेपर्यंत पाणी दिले जात नाही.

फेब्रुवारी पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात फुलधारणा होते. २८ तारखेपर्यंत बागेची सेटिंग होते. जूननंतर फळांचा आकार भरण्यास सुरुवात होते. नोव्हेंबरच्या अखेरीस फळांना रंगधारणा होते. पिवळसर रंगाच्या छटा त्यावर असतात. ऑक्टोबर ते जानेवारी

हा काढणी हंगाम राहतो. फळे जानेवारी पंधरवडा किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यापर्यंत हिरव्या छटा धारण केलेली राहतात. अशा फळांना हंगामा अखेरपर्यंत चांगली मागणी व दरही राहतात.

३) जैविक व रासायनिक निविष्ठांचा योग्य मेळ घातला जातो. जानेवारी, मार्च, जून व ऑक्टोबर अशा वर्षातून चार वेळा खतांचे वितरण होते.

उन्हाळ्यात एकरी ६ टन याप्रमाणे शेणखत दिले जाते. पावसाळ्यात ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीचा वापर होतो. शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो.

यात बागेत मशागतीसाठी वखरणी, रोटाव्हेटरचा वापर केला जात नाही. मशागतीमुळे झाडाची मुळे तुटण्याची भीती राहते. तणनाशकाचा वापर करून तणांची वाढ नियंत्रित केली जाते. ती जागेवर कुजल्यानंतर त्यांचे नैसर्गिक खत तयार होते.

४) नव्या बागेत सरासरी तीन वर्षांपर्यंत आंतरपीक घेता येते. मुळे यांनीही नव्याने वीस एकरांवर संत्रा लागवड केली असून, त्यात आंतरपीक म्हणून कापूस घेतला आहे. एकूण लागगवड क्षेत्रातून त्यांना ८० ते ९० क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पादन मिळाले आहे.

संत्रा झाडांची वाढ होईपर्यंत आंतरपिके बोनस उत्पन्न देऊन जातात. संत्रा बागेत उत्पादन खर्च एकरी दीड लाख रुपयांपर्यंत होतो. एकूण उत्पन्नापैकी प्रत्येकी ५० टक्के खर्च व नफा असतो.

जागेवरच तयार केली विक्री व्यवस्था

फळांच्या दर्जात सातत्य राखले आहे. त्यामुळे दरवर्षी तीन ते चार व्यापाऱ्यांकडून विचारणा होते. ज्यांच्याकडून जास्त दर मिळेल त्यास बाग दिली जाते. फळांची काढणी व्यापाऱ्याकडेच असते. खरेदी देखील जागेवरच होते.

त्यामुळे संत्रा वाहतुकीची गरज भासत नाही. दरवर्षी किलोला ३० ते ३५ रुपये दर मिळतो. यंदा हंगामअखेरीपर्यंत हिरवट छटा असलेली फळे व्यापाऱ्यांना मुळे यांच्या बागेत मिळाली. त्यास किलोला ६५ ते ७० रुपये उच्चांकी दर मिळाला. बाजारपेठेत त्या वेळी

४० ते ४५ रुपये दर सुरू होता. चेन्नई येथील व्यापाऱ्याने बाग खरेदी करण्यापूर्वी थेट विमानाने नागपूर गाठले आणि बागेची पाहणी केल्यानंतर व्यवहार अंतिम केला. सन २०२१-२२ मध्ये बागेतील फळांची ५५ रुपये दराने खरेदी झाली होती.

संत्र्याला आली तेजीची झळाळी

मृग बहराच्या बागांतील संत्राफळांचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. गेल्या पंधरवड्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. कळमेश्‍वर, काटोल, सावनेर, अमरावती जिल्ह्यंतील वरुड, मोर्शी या भागातील संत्रा पट्ट्यात फळगळ झाली.

परिणामी, फळांची उपलब्धता कमी झाल्याने दर तेजीत आहेत. शेतकऱ्यांच्या थेट बागेतूनच खरेदी होत असून ५५ ते ६० हजार रुपये प्रति टन दर मिळत आहे.

शेतकऱ्यांना अन्य खर्च करावा लागत नसल्याने चांगला परतावा मिळत आहे. यापूर्वी दर ३५ हजार रुपयांपर्यंत होते. चेन्नई, हैदराबाद भागातून नागपुरी संत्र्याला चांगली मागणी आहे.

नांदेड येथे खासगी व्यवस्थापन माध्यमातून ‘सिट्रस इंडिया’ उद्योगाची उभारणी झाली. हा प्रकल्प काही कारणांमुळे अवसायनात निघाला. तो ‘सह्याद्री फार्म’ने नुकताच खरेदी केला. या ठिकाणी प्रक्रियेसाठी लहान आकाराच्या फळांचा (चुरी) उपयोग होतो. याला चुरी म्हटले जाते.

एरवी बाजारात या फळांना मागणी नसल्याने संत्रा उत्पादकांना त्याचा फायदा होत नाही. प्रकल्प कार्यान्वित झाल्याने चुरींना मागणी वाढली आहे.

यंदाच्या हंगामात १५ रुपये प्रति किलो दराने त्यांची खरेदी करण्यात आली. नागपूरच्या कळमना बाजार समितीत मोठ्या फळांची दररोज दोन हजार क्विंटल आवक होत असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

गुलाबराव मुळे, ९३७०२६५२९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT