Orange Crop Management : शेतकरी नियोजन पीक : संत्रा

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील अपूर्व निरंजन जावंजाळ यांची १६ एकर बागायती शेती आहे. संपूर्ण शेती काटोलपासून ४ किमी अंतरावर असलेल्या फेटरी या गावाजवळ आहे.
Orange Crop Planing
Orange Crop Planing Agrowon

शेतकरी : अपूर्व निरंजन जावंजाळ

गाव - काटोल, ता, काटोल, जि. नागपूर

एकूण शेती : १६ एकर

संत्रा लागवड : साडेचौदा एकर (२५०० झाडे)

मोसंबी लागवड : दीड एकर (१००० झाडे)

Orange Crop Management नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील अपूर्व निरंजन जावंजाळ यांची १६ एकर बागायती शेती आहे. संपूर्ण शेती काटोलपासून ४ किमी अंतरावर असलेल्या फेटरी या गावाजवळ आहे. त्यात साडेचौदा एकरावर संत्रा (Orange Cultivation) तर दीड एकरावर मोसंबी लागवड (Mosambi Cultivation) केलेली आहे.

साडेचौदा एकरावर संत्र्याची २५०० झाडे आहेत. संपूर्ण लागवड २० बाय १५ फूट अंतरावर आहे. लागवड टप्प्याटप्प्याने केलेली आहे.

Orange Crop Planing
Orange Market : गारपीटीच्या भीतीने शेतकऱ्यांनी पिकण्यापूर्वीच संत्रा आणला बाजारात

बागेत ८ वर्षे वयाची १००० झाडे, ६ वर्षे वयाची ६०० झाडे तर ३ वर्षे वयाची ७०० झाडे आहेत. याशिवाय पारंपरिक पद्धतीने मोसंबीची १ हजार झाडांची लागवड केलेली आहे. त्यातील ८०० झाड ही ७ वर्षाची तर २०० झाडांचे वय हे दोन वर्षांचे आहे.

बागेचे संपूर्ण व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने केले जाते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा (Pesticide) वापर पूर्णपणे टाळला आहे. त्याऐवजी जैविक निविष्ठांच्या (Organic Inputs) वापरावर भर दिला जातो. बागेत फक्त आंबिया बहरामध्येच उत्पादन घेतले जाते. त्यानुसार कामांचे नियोजन केले जाते.

शास्त्रीय पद्धतीने लागवड

- नवीन संत्रा लागवड ही बेडवर केलेली आहे. पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेत बेडवरील लागवड फायदेशीर ठरली आहे. अनेक बागायतदार संत्रा बागेत कीड-रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात न आल्याने बागा काढून टाकतात.

हे प्रामुख्याने पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने घडून येते. मात्र, शास्त्रीय पद्धतीने बेडवर लागवड केल्यास बागेतील अतिरिक्त पाणी निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो, असा अनुभव अपूर्व जावंजाळ सांगतात.

सुरवातीला बेडवर लागवड केल्यामुळे झाडे वादळाच्या तडाख्यात कोसळण्याची भीती मनामध्ये होती. परंतु, ही पद्धती अवलंबल्यानंतर झाडे कोसळत नसल्याचे आढळून आले. सध्या बरेच शेतकरी या तंत्रज्ञानाकडे वळत आहेत.

बहार नियोजन

- बहार धरण्यासाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाग ताणावर सोडली जाते. ताण कालावधीत झाडांच्या अतिरिक्त फांद्याची छाटणी केली जाते.

- बागेस साधारण १ महिन्याचा ताण दिला जातो. जमिनीच्या प्रकारानुसार ताणाचा कालावधी निश्चित केला जातो. हलक्या जमिनीत ताण लवकर बसतो तर भारी जमिनीत ताण बसण्यास वेळ लागतो.

- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठिबकद्वारे २ ते ४ तास पाणी देऊन ताण तोडला जातो. त्यानंतर झाडांची पाण्याची गरज पाहून सिंचनाचे नियोजन केले जाते.

- वेळापत्रकानुसार ठिबकद्वारे जिवामृताची मात्रा दिले जाते.

सिंचन व्यवस्थापन

- संपूर्ण संत्रा आणि मोसंबी लागवडीत ठिबक सिंचन यंत्रणेचा अवलंब केला आहे. जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळला जाईल.

- झाडांची पाण्याची गरज आणि जमिनीतील वाफसा यांचा अंदाज घेऊन सिंचन केले जाते.

- बागेत पाणी साचून राहिल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी बागेच्या उताराच्या दिशेने चर काढले आहेत. जेणेकरून बागेत पाणी साचणार नाही.

मागील कामकाज

- ताण तोडल्यानंतर नवती फुटण्यास सुरवात होते. या काळात सिट्रस सायला, मावा या सारख्या किडी तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांची फवारणी केली आहे. जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळला जाईल.

- फूट चांगली निघण्यासाठी जैविक घटकांचा पुरवठा केला.

- फळगळ टाळण्यासाठी जीवामृत, एरंडी ढेप, निंबोळी ढेप यांचा

बेसल डोससोबत वापर केला आहे.

- बागेतील झाडांचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी वेळोवेळी निरिक्षण केले. आवश्यकतेनुसार उपाययोजनांवर भर दिला आहे.

Orange Crop Planing
Orange Processing : संत्रा प्रक्रिया केंद्राच्या घोषणेचे उत्पादकांकडून स्वागत

आगामी नियोजन

- मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. त्याचा झाडांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. झाडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आवश्यकतेनुसार नीमअर्क फवारणी घेतली जाईल.

- ठिबकद्वारे जीवामृत सोडले जाईल.

- पुढील काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्यास सुरवात होईल. त्यामुळे झाडांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता असते. झाडांना पाण्याचा ताण बसू नये यासाठी सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाईल.

- बागेत वाढलेल्या गवत काढून त्याचा आच्छादनासाठी वापर केला जाईल. त्यामुळे काही प्रमाणात तापमान नियंत्रणास मदत होते.

- या काळात फळगळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी बागेची योग्य काळजी घेण्यावर भर दिला जाईल.

अपूर्व जावंजाळ, ७०२०१८२२७१ (शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com