Shrikrushna Dairy  Agrowon
यशोगाथा

Success Story : ग्राहकांचा विश्‍वास कमावलेली ‘श्रीकृष्ण डेअरी’ची उत्पादने

राजेश कळंबटे

Dairy Business : रत्नागिरी शहरात ‘श्रीकृष्ण डेअरी व फूड्स’ हा ब्रॅण्ड ग्राहकांच्या चांगल्या परिचयाचा झाला आहे. सौ. स्वप्ना पटवर्धन हा संपूर्ण उद्योग आपल्या संयुक्त कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने चालवतात. गावखडी हे त्यांचे माहेरघर. तेथे एकत्रित कुटुंब पद्धतीत २५ जण सदस्य राहायचे. घरी थोडी शेती, वडिलांचं किराणा मालाचं दुकान आणि गलबत होतं. त्यातून मोठा प्रवास करून मुंबईहून किराणा माल खरेदी करून आणला जायचा.

सन १९८३ मध्ये रत्नागिरी येथील आंबा बागायतदार अभय पटवर्धन यांच्याशी विवाह झाला. सासरचंही मोठं संयुक्त कुटुंब होतं. सुमारे ७० पर्यंत दुधाळ जनावरे होती. सासरे केशवरावांनी त्यातूनच १९७५ मध्ये डेअरी व्यवसाय सुरू केला. त्यातील अनेक कामे स्वप्ना स्वतः करू लागल्या. कामांतील त्यांची कुशलता व व्यवस्थापन पाहून मग हळूहळू या व्यवसायाची सूत्रे त्यांच्याकडे आली. उद्योजकतेचे गुण व व्यावसायिक दृष्टिकोनही त्यांच्याकडे होता. त्यामुळेच केवळ डेअरीवर अवलंबून न राहाता उत्पादनांची श्रेणी वाढवून व्यवसायाचा विस्तार करण्यास त्यांनी सुरुवात केली.

केला व्यवसाय विस्तार

सन १९९७ पासून स्वप्ना प्रक्रिया उत्पादने निर्मिती उतरल्या. काळाची गरज ओळखून रत्नागिरीपासून काही अंतरावरील शिरगाव येथे सहा महिन्याचा संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला. उत्कृष्ट व्यवस्थापन, प्रत्येक बाबीचे सुयोग्य नियोजन, उत्पादनांमध्ये नावीन्यता आणण्याची धडपड, गुणवत्ता, स्वाद, चव यात कोणतीही तडजोड न करणे व नेतृत्व पेलण्याची वृत्ती हे गुण विकसित केले. त्यामुळेच २६ वर्षांच्या अनुभवातून आजमितीला तब्बल ८० उत्पादने त्यांनी बाजारात सादर आणली आहेत.

उत्पादनांची झलक

अकरा प्रकारच्या स्वादांचे श्रीखंड (आंब्याच्या ताज्या पल्पचे आम्रखंड)

दोन प्रकारची बासुंदी (शाही व सीताफळयुक्त)

दोन प्रकारचा खरवस

देशी तूप व अन्य दुग्धजन्य पदार्थ, गुलाबजाम, चिवडा, लाडू, भडंग, विविध मसाले

चार प्रकारची आंबा लोणची (आंबोशीसह), लिंबू, मिरची लोणचे

आंबेडाळ, कैरी पन्हे, कोकम सरबत

स्वाद, गुणवत्ता अशी जपली

‘फूड सेफ्टी’ विषयातील परवाना घेतला आहे. उत्पादने निर्मिती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेचा पालन केले जाते. श्रीकृष्ण डेअरी असे फर्मचे नाव असून श्रीयश असेही ब्रॅण्डचे नाव तयार केले आहे. उत्पादने तयार करताना पारंपरिक ‘रेसिपीं’चा वापर करण्यावर भर असतो. यात रवीने ताक घुसळून तयार केलेले पांढऱ्या रंगाचे लोणी, त्यापासून तयार केलेले

कणीदार तूप यांना ग्राहकांकडून मागणी असते. दरवर्षी सुमारे २५ हजार पेटी घरचा आंबा असतो. कोणताही आंबा वाया जाऊ नये, अधिकाधिक चांगल्या प्रकारे मूल्यवर्धन व्हावे असा प्रयत्न असतो. आंबोशीचे लोणचे तयार करताना छोटी फळे बाजूला काढून ती कापली जातात. त्यास मोहरीची फोडणी दिली जाते. त्यामुळे या लोणच्याची चव चांगली येते. गूळ व साखर या दोन्हींचा वापर करून केशर, वेलचीयुक्त दोन प्रकारचे खरवस तयार केले जातात. गणेशोत्सवात आंबा, काजू व खवा मोदक तयार केले जातात. काजू कतलीलाही मोठी मागणी असते.

श्रीखंडाचे उत्पादन

स्वप्ना सांगतात, की आमच्या श्रीखंडाचा दर्जा व चव अगदी पूर्वीपासून एकसमान आहे. आणि म्हणूनच आमचे ग्राहक अनेक वर्षांपासून टिकून आहेत. उदाहरण सांगायचं तर श्रीखंडाला चव आणण्यासाठी दह्यापासून योग्य चक्का बनवणं हे निगुतीचं काम असतं. स्वादासाठी केशर, ‘ड्रायफ्रूट्‍स’ हे पदार्थ उत्तम प्रतीचे वापरले जातात. घरच्या आंब्याचा पल्प असल्याने तोही दर्जेदारच असतो. बासुंदी बनवत असताना लागणारी मोठी कढई आणि दूध हलविण्यासाठी लागणारा डाव दुधाची गुठळी होऊ न देता विशिष्ट पद्धतीने फिरवावा लागतो. अशी सर्व तंत्रे वापरल्यानेच उत्पादने उत्कृष्ट स्वादाची तयार होतात असे स्वप्ना सांगतात.

घरचा गोठा व दुधाची मागणी

पदार्थ तयार करण्यासाठी दिवसाला सुमारे १०० लिटर दूध लागते. ताजे दूधही विक्रीस ठेवले जाते. सध्या गायी, म्हशींची संख्या २५ पर्यंत आहे. त्यात १२ गीर गायी आहेत. घरच्या दुधाव्यतिरिक्त उर्वरित गरज पूर्ण करण्यासाठी चार शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केले जाते. देशी दुधाला लहान मुले व वयस्कर मंडळींसाठी मागणी जास्त असते.

बाजारपेठ

पटवर्धन यांची शहरात दोन दुकाने आहेत. तेथे माल उपलब्ध असतोच. शिवाय रत्नागिरी, देवरूख, गणपतीपुळे, पावस आदी ठिकाणी दररोज माल पाठवला जातो. मुंबई-पुणे येथेही उत्पादने पाठवण्यात येतात. पुणे शहरात सहकार नगर येथे विक्री केंद्र आहे. महिन्याला एकूण उत्पादनांची सुमारे दीड ते दोन टनांपर्यंत विक्री करण्यापर्यंत श्रीकृष्ण डेअरीने मजल मारली आहे.

कुटुंबाचं पाठबळ

या उद्योगात १५ कामगारांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. प्रत्येकाला कामांमध्ये पूर्ण प्रशिक्षण दिले आहे. घरच्या सर्व सदस्यांची मदत स्वप्ना यांना मिळते. घरचा आंबा व्यवसाय पती अभय व मुले गौरव, विभव व दीर उदय पाहतात. पीयूष व अक्षया या सुना प्रक्रिया उद्योग व विक्री व्यवस्थेत साथ देतात.

स्वप्ना पटवर्धन, ९४२३८१७४८९, ७०८३७७२७७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT