Gir Cow Management : जातिवंत गीर संगोपनात आरोग्य, चारा व्यवस्थापनावर भर

Cow Rearing : नाशिक येथील राहुल मनोहर खैरनार यांनी २०१७ मध्ये गीर गोवंश संगोपनास सुरवात केली. संगोपनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला.
Gir Cow
Gir CowAgrowon

Indigenous Cow Conservation :

शेतकरी नियोजन: गोपालन

शेतकरी : राहुल मनोहर खैरनार

गाव : गंगापूर रोड, जि. नाशिक

एकूण गीर गायी : ८०

गोपालनाचा अनुभव : ७ वर्ष

नाशिक येथील राहुल मनोहर खैरनार यांनी २०१७ मध्ये गीर गोवंश संगोपनास सुरवात केली. संगोपनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला. त्यासाठी गुजरात राज्यातील विविध गोशाळा तसेच पशुपालकांना भेटी दिल्या. जुनागढ, गोंडल परिसरातील गोशाळांमध्ये गाईंचे संगोपन आणि व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण घेतले.

जातिवंत दुधाळ गीर गाईंचे संगोपन करण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. त्यासाठी गायींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची राष्ट्रीय दूध विकास बोर्डाच्या आनंद (गुजरात) येथील पशुधन आणि आहार विश्‍लेषण अध्ययन केंद्र आणि पशुसंवर्धन विभाग, पुणे येथील प्रयोगशाळेत रक्त तपासणी केली. तपासणीअंती सुमारे ४४ निरोगी दुधाळ गीर गाईंची संगोपनासाठी खरेदी केली.

सध्या राहुल यांच्याकडे ८० गीर जनावरे आहेत. त्यामध्ये १८ दुभत्या गाई, २० गाभण गाई, तीन नंदी, २० कालवडी व १९ वासरे आहेत. गोपालनासाठी त्यांनी सुमारे एक एकरामध्ये मुक्त संचार गोठ्याची उभारणी केली आहे. त्यात लहान वासरे, गाभण गाई आणि दुभत्या गाई असे वेगवेगळे विभाग करून त्यांचे व्यवस्थापन केले जाते. दैनंदिन पशुपालन व्यवस्थापनात राहुल यांना मोठे बंधू राजेश, पत्नी सौ. रीना, भावजय सौ. गायत्री यांची मोलाची मदत होते.

Gir Cow
Cow Rearing : लालकंधारी गोपालनातून सक्षम पर्याय

उन्हाळ्यातील व्यवस्थापन :

संकरित जनावरांच्या तुलनेत देशी जनावरांचे व्यवस्थापन करताना थोडी जोखीम कमी असते. मात्र दैनंदिन कामकाजात अचूकता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विशेषतः पाणी, खाद्य व आरोग्य व्यवस्थापन या महत्त्वाच्या बाबी आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात होणाऱ्या वाढीचा जनावरांच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यासाठी जनावरांच्या गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यासह जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. गोठ्यामध्ये तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पंखे लावलेले आहेत. जेणेकरून गोठ्यामध्ये थंडावा निर्माण होईल.

गाईंना २४ तास स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात थंड पाणी उपलब्ध होण्यासाठी मुक्त गोठ्यामध्ये पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत.

गरजेनुसार जनावरांना थंड पाण्याने धुवून घेतले जाते.

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास गाईंची विशेष काळजी घ्यावी लागते. मुक्त गोठ्यामध्ये गाईंना सावली उपलब्ध होण्यासाठी

६० बाय ७० फूट आकाराचे शेड उभारले आहे.

नियोजनातील ठळक बाबी :

रोगप्रतिकारक व पचनशक्ती उत्तम राहण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी गाईंच्या आहारात शतावरी, अश्‍वगंधा, जिवंती, गुळवेल, आवळा, बेहडा, त्रिफळा, सफेद मुसळी, शेवगा पावडर, ज्येष्ठमध, पुत्रंजीवी, अर्जुन, बेल, विदारीकंद, हळद, सुंठ आदी औषधी वनस्पतींचा समावेश केला जातो.

अशक्तपणा येऊ नये यासाठी गूळ, पाणी व ताक गाईंना पिण्यासाठी दिले जाते.

पिण्याच्या पाण्याच्या सिमेंट टाक्यांना चुना मारला जातो. जेणेकरून गाईंना स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

गोठ्यामध्ये तसेच गाईंच्या शरीरावर विविध माश्यांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी गोठ्यात सापळे लावले जातात. तसेच नीम व करंज तेल यांची आठवड्यातून एकदा फवारणी केली जाते.

गाई तणावमुक्त व आनंदी राहण्यासाठी ‘हॅप्पी काऊ, हॅप्पी मिल्क’ या संकल्पनेचा अवलंब केला आहे. त्यासाठी एक एकरांवर मुक्त संचार गोठा उभारला आहे.

गाईंच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. तसेच नियमित लसीकरणावर भर दिला जातो. प्रत्येक गाईचे नामकरण, इनाफ टॅगिंग करण्यात आले आहे.

दूध काढणीसाठी मिल्क पार्लर सुविधा.

स्वच्छ पाणीपुरवठा, खनिजद्रव्यांसाठी चाटण वीट, सैंधव मिठाचा वापर केला जातो.

मुक्त संचार पद्धतीने गाईंचे संगोपन करण्यात येते.

दुभत्या गाई, गाभण गाई आणि वासरांचे स्वतंत्र व्यवस्था केले जाते.

Gir Cow
Desi Cow Rearing : शेतकऱ्यांना शाश्वत देशी गोपालन प्रशिक्षणात मार्गदर्शन

चारा व्यवस्थापन :

हिरव्या चाऱ्यात नेपिअर गवत तर सुक्या चाऱ्यामध्ये ज्वारी कडबा, गहू भुस्सा, मुरघास यांचे टोटल मिक्स राशन पद्धतीने एकत्रित करून आहारात समावेश केला जातो.

दररोज सकाळी ४ वाजता आणि सायंकाळी ४ वाजता गाईंना खाद्य दिले जाते.

हिरवा व कोरडा चारा एकत्रित करून संतुलित खाद्य मात्रा देण्यावर अधिक भर दिला जातो. त्यात मका भरडा, गहू, तूर व डाळींची चुनी, सरकी ढेप यांचा गरजेप्रमाणे संतुलित मात्रेत वापर केला जातो.

यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता चाऱ्याची उपलब्धता आधीच करून ठेवली आहे. गाईंना लागणाऱ्या एकूण चाऱ्यापैकी सुमारे ५० टक्के चारा उत्पादन स्वतःच्या प्रक्षेत्रावर केला जातो. त्यासाठी ८ एकर क्षेत्र राखीव असते. आणि उर्वरित ५० टक्के चारा मुरघास निर्मितीसाठी विकत घेतला जातो.

मुरघास निर्मितीसाठी मुरघासनिर्मिती यंत्र खरेदी करण्याचे नियोजित आहे. जेणेकरून गोठ्यावर मुरघास निर्मिती होईल. गुणवत्तापूर्ण सुक्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी खात्रीशीर ठिकाणाहून चारा खरेदी करण्यावर भर दिला जातो.

अर्थकारण :

नैसर्गिक रेतन पद्धतीसह कृत्रिम रेतन, आयव्हीएफ तंत्रज्ञानातून शास्त्रीय पद्धतीने पैदास करण्यावर अधिक भर दिला जातो. त्यातून तयार झालेल्या सरासरी ६ महिन्यांपासून ते २ वर्षे वयापर्यंतच्या वासरांची विक्री केली जाते.

याशिवाय प्रतिदिन सरासरी १८ ते १९ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गाई देखील गोठ्यामध्ये आहेत. उपलब्ध दूध विक्री करण्यापेक्षा जास्तीत जास्त वासरांना पाजण्यावर भर दिला जातो. जेणेकरून वासरांचे आरोग्य आणि शरीर सुदृढ राहील.

राहुल खैरनार, ९९६०९१११९१

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com