Farm Machinery Manufacturing
Farm Machinery Manufacturing  Agrowon
यशोगाथा

Farm Machinery Manufacturing : बुद्धिकौशल्यातून यंत्रनिर्मितीचा आविष्कार

Santosh Munde

Success Story : श्रीपत धामनगाव (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील सुनील शिंदे यांची एकत्रित कुटुंबाची १८ एकर शेती आहे. कपाशी, ऊस व रेशीम उद्योग त्यांच्याकडे आहे. त्यांना यंत्रे-अवजारे तयार करण्याचा पहिल्यापासूनच छंद वा आवड होती. त्यामुळेच शेतीतील मजूरटंचाईवर मार्ग काढण्यासाठी त्यांना हा छंद उपयोगी ठरला.

आजपर्यंत त्यांनी बैलचलित व अन्य अशी २५ पर्यंत अवजारे- यंत्रे विकसित केली आहेत. यात बळिराम नांगर, औत, बेणे बुजवणी अवजार, सायकल जोड कोळपे, खुरपे आदी विविध यंत्रांचा समावेश आहे.

नव्या यंत्रांची निर्मिती

आपल्यातील कल्पनाशक्‍तीला वाव देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणारी यंत्रे शिंदे तयार करीत असल्याने साहजिकच शेतकरी त्यांच्याकडे मागणी नोंदवू लागले. पूर्वी स्वत:च्या शेतीपुरती यंत्रे ते इतरांच्या ‘वर्कशॉप’मधून तयार करून घ्यायचे.

मात्र २०१६ मध्ये त्यांनी स्वत:चे छोटेसे ‘वर्कशॉप’ कुंभार पिंपळगाव (जि. जालना) येथे सुरू केले. केवळ टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेपुरते न राहता नव्या साहित्यापासून मागणीनुसार अवजारे तयार करून विक्रीचे तंत्र त्यांनी अवलंबण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय प्राप्त झाला. कल्पनाशक्‍तीला बळही मिळाले.

अलीकडील काळातील काही यंत्रांची प्रातिनिधिक माहिती पुढीलप्रमाणे.

पायडलवर चालणारी पिठाची गिरणी

गावशिवारातील वीजपुरवठा मध्यंतरी काही दिवस खंडित झाला. त्यामुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांवर जात्यावर भरडून पीठ वा तांदळाची खिचडी करून खाण्याची वेळ आली. त्याच वेळी सुनीलरावांना विजेचा वापर न करता धान्य दळणाऱ्या यंत्राची कल्पना सुचली.

सायकलचे गिअर, पायडल, सीट तसेच घरी वापरात येणाऱ्या दगडी जात्यापेक्षा थोडे जाड जाते या सर्वांच्या वापरातून २०१८ मध्ये पायडलवर चालणारी पिठाची गिरणी तयार करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे हाताने जाते फिरवून दळण करणाऱ्या महिलांचे काम सोपे झाले.

शिवाय आधीपेक्षा गती वाढली. विजेवर चालणाऱ्या गिरणीइतकी ही गती नसल्याने पिठाच्या चवीत काहीच बदल झाला नाही. अशी एक गिरणी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कण्हेरी मठाला दिली आहे. याची किंमत २२ हजार रुपये आहे.

दगडी मिक्‍सर

पाटा वरवंट्यावर मसाला वा डाळी वाटण्याची पद्धत पूर्वी होती. आज मिक्सरच्या वापरामुळे ती कमी झाली आहे. शिंदे यांनी महिलांचे श्रम कमी करून या जुन्या पद्धतीने तयार होणाऱ्या मसाल्यांची चव कायम राखता येईल का याचा विचार केला.

त्यातूनच हाताने चालवणे शक्य असलेल्या दगडी मिक्‍सरचा पर्याय सुचला. त्यातून मग गिअर, लोखंडी हॅंडल, दगडी खलबत्ता व वरवंट्याचा वापर करून तशा दगडी मिक्‍सरचा जन्म झाला.

हा मिक्सर महिलांच्या पसंतीस उतरला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची किंमत तीनहजार रुपये होती. आता थोड्या नव्या रूपात हे यंत्र आणण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे.

चंद्रिका बांधणी यंत्र

रेशीम उद्योगात रेशीम अळ्यांचे संगोपन करताना चंद्रिकांचे महत्त्व आहे. बॅचसाठी त्याचा वापर केल्यानंतर त्या गोळा करणे मोठे वेळखाऊ, जिकिरीचे व खर्चाचे काम असते. त्यासाठी चंद्रिका कुशलतेने हाताळणाऱ्या माणसांचीच गरज भासते. त्यातूनही चंद्रिकांचे नुकसान झाल्यास पुन्हा त्या नव्या आणण्याचा खर्च ठरलेला. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला.

चंद्रिका बांधण्याचे यंत्र तयार करण्यास त्यांनी सुरवात केली. त्यात पाच वेळा अपयश आले. मात्र त्यानंतर अपेक्षित यंत्र तयार करण्यात त्यांना यश आले आहे. या यंत्रात लोखंडी पाइप्सचा वापर केला आहे.

आयताकृती तीन फ्रेम्स ठरावीक अंतराने उभ्या पद्धतीने पाइप्सच्या माध्यमातून जोडल्या आहेत. या फ्रेमच्या मधल्या भागात इंग्रजी टी आकाराच्या तीन छोट्या पाइप्स विशिष्ट अंतराने जोडल्या आहेत. चंद्रिकांना वरून योग्य दाबाने ‘प्रेस’ करण्याचे काम त्या करतात. यंत्राचे वजन १६ किलो आहे. आतापर्यंत जवळपास ३०० यंत्रांची विक्री केली आहे. या यंत्राची जोडणी जालना येथील एका उद्योगात करण्यात आली आहे. साडेतीन हजार रुपये त्याची किंमत आहे.

खत पेरणी यंत्र

अलीकडेच एका मनुष्याकरवी चालवता येणारे सायकलचलित खत पेरणी यंत्र तयार केले आहे. सोयाबीन, हळद, ऊस किंवा गादीवाफा पद्धतीने घेता येणाऱ्या पिकांसाठी त्याचा वापर करणे शक्य होणार आहे.

बुद्धिकौशल्याचा सन्मान

‘ॲग्रोवन’मध्ये ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ (गुजरात) संबंधीची माहिती शिंदे यांच्या वाचनात आली. त्यानंतर आपल्या कल्पना आविष्काराची माहिती त्यांनी संस्थेकडे पाठविली. पेटंटसाठी प्रस्ताव दाखल केला. संबंधित संस्थेकडून पेटंट प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित क्रमांकही मिळाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

संस्थेने शिंदे यांना उद्योग विस्तारासाठी ‘कम्युनिटी वर्कशॉप’साठी सहकार्याची तयारी दाखविली आहे. तसा अर्जही मागविला आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात यंदाच्या १० ते १३ एप्रिलमध्ये आयोजित प्रदर्शनात चंद्रिका बांधणी यंत्रासह सहभागी होण्याची संधी शिंदे यांना मिळाली. यात देशभरातील नवसंशोधक सहभागी झाले होते. त्यात शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संपर्क - सुनील शिंदे, ९४२१४२२५१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT