Dairy Farming  Agrowon
यशोगाथा

Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

Dairy Business : घनदाट जंगल व डोंगररांगांमध्ये वसलेल्या कोकणातील करूळ (जि. सिंधुदुर्ग) या गावाने सर्व प्रतिकूल भौगोलिक व हवामान परिस्थितीत दुग्ध व्यवसात घेतलेली आघाडी प्रशंसनीय आहे.

एकनाथ पवार

Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ (ता. वैभववाडी) हे गाव म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्रासाठी जिल्ह्याचे प्रवेशद्वार मानले जाते. तळेरे-कोल्हापूर मार्गावरील नागमोडी, अवघड, डोंगराळ असा करूळ (गगनबावडा) घाट उतरल्यानंतर डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेले आणि निसर्गसपंन्नतेने नटलेले करूळ गाव दृष्टीस पडते.

लोकसंख्या सुमारे दोन हजारांपर्यंत आहे. गावाच्या चहूबाजूंनी उंचच उंच डोंगर दिसून येतात. या घनदाट जंगलातील डोंगरदऱ्यांमध्ये वनौषधींचा मोठा साठा आहे. सपाट माळरान क्वचितच दिसून येते. त्यामुळे शेतीला खूप मर्यादा होत्या. भात, नाचणी अशी मोजकीच पिके घेतली जायची. आर्थिक उत्पन्नाचे अन्य स्रोत नसल्याने इथले तरुण नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे, कोल्हापूरचा मार्ग धरीत.

काजू लागवडीस मिळाली प्रेरणा

संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा विचार करून गावात कोणती शेती पद्धती रुजवता येईल याबाबत पंधरा- वीस वर्षांपूर्वी विचारमंथन सुरू झाले. वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राकडून वेंगुर्ला चार, वेंगुर्ला सातसह काजूच्या विविध जाती विकसित केल्यानंतरचा हा काळ होता. या वेळी डोंगर उताराची विशेषतः पाण्याचा निचरा होणारी जमीन काजू लागवडीसाठी उत्तम असल्याचे कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन काजू लागवडी प्रारंभ केला. हळूहळू उत्पादन व उत्पन्न या दोन्ही स्तरांवर हे पीक आश्‍वासक ठरू लागल्यानंतर करूळ गावातील बहुतांशी शेतकरी आपापल्या पडीक, जंगलमय क्षेत्राची साफसफाई करून काजू लागवडीकडे वळू लागले. आजमितीला काजू लागवडीखाली सुमारे ७८ हेक्टर क्षेत्र असून, १५० हून अधिक शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. त्यातून वर्षाला तीन ते चार कोटींची उलाढाल होत असावी.

बांबूसह अन्य पिकांना चालना

भात पिकाखाली सुमारे ५७ हेक्टर क्षेत्र असून, अंदाजे एकूण ५८४ क्विंटलपर्यंत भात विक्री होते. त्यातूनही काही लाखांची उलाढाल होते. आंब्याखाली सुमारे ११.७८ हेक्टर क्षेत्र आहे. काजू आणि उर्वरित झाडाझुडपांच्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी बांबू लागवड सुरू केली आहे. या पिकाच्या व्यवस्थापनाला फारसा खर्च येत नाही. व्यापारी गावात येऊन बांबू खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हळूहळू या पिकाकडे वाढला आहे.

दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील करूळ ही दोन गावे एकमेकांलगत आहेत. गगनबावडा परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. या व्यवसायातून गगनबावडा भागातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्थिरसावर झाल्याचे करूळ भागातील शेतकरी अनुभवत होते.

दोनही गावांचे नातेसंबंध खूप घट्ट आहेत. हाच धागा पकडत करूळचे दिंगंबर श्रीधर पाटील यांनी गावात दुग्ध व्यवसाला चालना देण्याची संकल्पना सहा- सात वर्षांपूर्वी गावकऱ्यांपुढे मांडली. चर्चा यशस्वी ठरली. एकमत झाले. आणि श्री. रासाई देवी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या स्थापनेतून गावात दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ उभी राहिली.

व्यवसायाला मिळाली चालना

सुरुवातीला काही मोजक्या शेतकऱ्यांनीच दुग्ध व्यवसायाला प्रतिसाद दिला. परंतु इतरांचे अनुभव लक्षात घेऊन त्यांनाही प्रेरणा मिळाली. गावातून मुंबईला उदरनिर्वाहासाठी जाणारा तरुण गावातच गायी व म्हशीपालनाद्वारे दुग्ध व्यवसाय करू लागला. आता काही तरुणांनी आधुनिक पद्धतीने गोठे बांधले आहेत. गावात ६५ हून अधिक शेतकरी दुग्ध व्यवसायात कार्यरत आहेत. प्रति दिन एकूण तीनशे लिटरपर्यंत दूध संकलन होते, गावातील संस्थेला त्याचा पुरवठा होतो. गायीच्या दुधाला प्रति लिटर ३३ रुपयांच्या आसपास, तर म्हशीच्या दुधाला ५४ रुपयांपर्यंत दर मिळतो.

दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. या भागात पशुवैद्यकीय अधिकारी खूपच कमी आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी गावातील प्रथमेश गजानन पाटील हा तरुण पुढे आला. त्याने ‘गोकुळ’ संघाच्या माध्यमातून पशुसंवर्धन आणि उपचार या विषयातील दीड महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता प्रथमेश करूळसह आजूबाजूच्या गावांमध्येही जनावरांवर मोफत उपचार करतात. शेणखतही पुरेसे उपलब्ध होऊ लागल्याने बायोगॅस निर्मितीला मोठी चालना मिळाली. आज गावात अशी २१ युनिट्स आहेत.

गावाचे बदलते अर्थकारण

दुग्ध व्यवसायातुन गावातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ लागली आहे. प्रत्येक कुटुंबाकडे दोन ते आठपर्यंत गायी किंवा म्हशी आहेत. शेतकरी स्वतः राबत असल्यामुळे त्यांना ४० ते ५० टक्क्यांपर्यंत त्यातून नफा मिळतो. या व्यवसायातून काहीना पक्की घरे, पक्के गोठे बांधणे शक्य झाले. मुलांना दर्जेदार शिक्षण देता येत आहे. दुचाकी, चारचाकी गाड्या काहींनी खरेदी केल्या आहेत.

विधायक कार्यात पुढे असलेले गाव

गावात दोन लघू प्रकल्प उभारले जात असून एका प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे. त्याचा फायदा हिरवा चारा निर्मितीसाठी होणार आहे. गावातील तरूणांनी सह्याद्री जीवरक्षक पथक स्थापन केले आहे. तालुक्यात नैसर्गिक आपत्ती तसेच अपघातात मदतीसाठी धावून जाणारे हे पथक आहे. अनेक रेस्क्यू ऑपरेशन्स या पथकाने पार पाडली आहेत.

गावातील करूळ नदीचे पाणी उन्हाळ्यात कमी पडू नये म्हणून ग्रामस्थ दरवर्षी श्रमदानातून वनराई बंधारे बांधतात. गेल्या वर्षी या नदीवर एकाच दिवसांत १३ वनराई बंधारे बांधून गावकऱ्यांनी वैभववाडी तालुक्यात विक्रम केला. रानभाज्यांचे आहारातील महत्त्व वाढावे आणि त्यास बाजारपेठ निर्माण व्हावी या हेतूने ग्रामपंचायत, कृषी विभागाच्या माध्यमातून गावात रानभाजी महोत्सव भरविला जातो. त्या वेळी अनेक भाज्यांचे प्रदर्शन मांडले जाते.

गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत दूध संस्था सुरू केली. सुरुवातीला २५ ते ३० लिटर असलेले दूध संकलन आता तीनशे लिटरपर्यंत पोहोचले आहे. या व्यवसायातून गावकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे
दिगंबर पाटील (अध्यक्ष, रासाई देवी दुग्ध संस्था) ७८२२०६१५१३
माझ्याकडे हरियानातील दोन, तर पाच स्थानिक म्हशी आहेत. शेतात चारा लागवड केली आहे. दुग्ध व्यवसाय व जोडीला काजू शेतीतून कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार तयार झाला आहे.
हेमंत पाटील

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT