Vegetable Farming Agrowon
यशोगाथा

Vegetable Farming : पुणे जिल्ह्यातील पिंपळोलीच्या कविता शिंदेंनी भाजीपाला शेतीतून मिळवले शाश्वत उत्पन्न

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम डोंगराळ भागातील पिंपळोली (ता. मुळशी) हे टुमदार गाव. भात हे खरिपातील मुख्य पीक. या गावातील प्रयोगशील महिला शेतकरी कविता मनोहर शिंदे या रब्बी, उन्हाळी हंगामात विविध भाजीपाल्यांचे उत्पादन घेतात.

Team Agrowon

गणेश कोरे

Mulshi/Pune : मुळशी तालुका हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. भात पीक निघाल्यानंतर अनेक शेतकरी शहरांकडे रोजगारासाठी जातात. मात्र पिंपळोली गावातील मनोहर आणि कविता शिंदे हे शेतकरी दांपत्य दोन एकरांतील तुकड्या तुकड्यांतील शेती बागायती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

शेतीतील प्रत्येक कामांत कविता यांचा मोठा वाटा असल्याचे मनोहर सांगतात. खरिपात भात पीक घेतल्यानंतर रब्बी तसेच उन्हाळी हंगामात उपलब्ध पाण्यावर टोमॅटो, कांदा, काकडी, दोडका, पावटा, भुईमूग, वांगी, घेवडा आदी पिकांची लागवड केली जाते.

दरवर्षी दोन एकरांतून शिंदे यांना ४० क्विंटल इंद्रायणी भाताचे उत्पादन मिळते. यातील निम्मा भात थेट व्यापाऱ्यांना विकला जातो. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार सरासरी पन्नास रुपये किलो दराने दरवर्षी ६०० किलो तांदूळ विक्री केली जाते.

पीक लागवडीचे नियोजन

भात पिकाची काढणी झाल्यानंतर बाजारातील मागणीनुसार विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन शिंदे दांपत्य करतात. भाजीपाला विक्रीसाठी मनोहर शिंदे हे पुणे, पिंपरी- चिंचवड बाजार समिती आणि किरकोळ भाजी मंडईमध्ये जात असल्याने त्यांना बाजारपेठेच्या मागणीचा अंदाज असतो.

बाजारपेठेच्या अंदाजानुसार ते विविध भाजीपाला पिकांची निवड करतात. सध्या त्यांच्या शेतात गव्हाच्या बरोबरीने टोमॅटो, कांदा, बिजली फूल, भुईमूग, वांगी, घेवडा पिकांची लागवड आहे. ही सर्व पिके प्रत्येकी १० ते १५ गुंठ्यांवर असल्याने व्यवस्थापनास सोपे जाते. कविताताई पिकांचे दैनंदिन व्यवस्थापन बघतात. यामध्ये खते, पाणी देणे, फवारणी तसेच काढणीचे नियोजन कविताताई करतात.

प्रत्येक खाचर विविध ठिकाणी विभागलेले असल्याचे प्रत्येक खाचराला पाणी देण्याचे वेळापत्रक, पाइप अंथरणे आदी कामे कविताताई स्वतः करतात. गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते. भाजीपाल्याची काढणी आणि पॅकिंगदेखील कविताताई करतात. बाजारातील भाजीपाला विक्रीचे नियोजन मनोहर शिंदे करतात.

बांधावर हापूस आंबा

पुणे बाजारपेठेत मुळशीचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे. शेती बांधावर शिंदे दांपत्याने हापूस आंब्याची चाळीस कलमे लावली आहेत. मेमध्ये आंबा फळांचे चांगले उत्पन्न मिळते. पुणे मार्केटमध्ये आंब्याची विक्री केली जाते. यातून २५ हजारांचे उत्पन्न मिळते.

मुलांना चांगले शिक्षण

शिंदे दांपत्याला दोन मुले आहेत. ओंकार बीसीए आणि फूडटेक झाला असून, आविष्कार सध्या बीकॉमचे शिक्षण घेत आहे. सध्या दोन्ही मुले नोकरी करत आहेत. या दोन्ही मुलांचे शिक्षण शेतीमधील उत्पन्नावर झाल्याचे कविताताई सांगतात.

‘लुपीन फाउंडेशन'ची साथ

लुपीन ह्यूमन वेल्फेअर ॲण्ड रिसर्च फाउंडेशन आणि ॲटलास कॉप्को या कंपनीद्वारे शाश्‍वत उपजीविका कार्यक्रमांतर्गत शाश्‍वत शेतीसाठी शिंदे कुटुंबीयांना ३०० फूट पाइपलाइन, ३०० फूट वीजवाहक वायर आणि तलावातील मोटारीसाठी तराफा देण्यात आल्याचे प्रकल्प संचालक संदीप झणझणे यांनी सांगितले.

उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाल्यानंतर मोटार पाण्याच्या बाहेर राहत होती. यामुळे पाण्याविना शेती पडीक राहत असल्याने तराफा, पाइप, वीजवाहक वायर दिल्याने शाश्‍वत सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने शेतकरी उन्हाळी पिके घेऊ शकल्याचे संदीप झणझणे यांनी सांगितले.

पशुपालनाची शेतीला जोड

शेतीबरोबरच शिंदे दांपत्याकडे दोन म्हशी आणि दोन बैल आहेत. दोन म्हशींपैकी एक सध्या गाभण आहे. सध्या चार-पाच लिटर दूध मिळत असले तरी दोन्ही म्हशींचे जेव्हा दूध सुरू असते, तेव्हा नियमितपणे १० ते १२ लिटर दूध मिळते.

यापैकी दोन लिटर दूध घरगुती वापरासाठी ठेऊन, १० लिटर दूध डेअरीला दिले जाते. दूध विक्रीतून प्रति दिन ३५० ते ४०० रुपये मिळतात. तसेच शेतीसाठी पुरेसे शेणखत मिळत असल्याने सुपीकता टिकून आहे. पशूपालनाचा चांगला आधार शिंदे कुटुंबाला मिळाला आहे.

भाजीपाल्यातून उत्पन्नाचा स्रोत

शेती व्यवस्थापनाबाबत कविताताई म्हणाल्या, की मी शेतीचे व्यवस्थापन पाहाते तर भाजीपाला विक्रीचे नियोजन मनोहर यांच्याकडे आहे. दोन एकरांतील तुकड्यातुकड्यातील शेतीचे आम्ही चांगले नियोजन केले आहे. ‘लुपीन'च्या मदतीने शेतीला शाश्‍वत पाणी मिळाल्याने रब्बी, उन्हाळी हंगामात विविध पिकांची लागवड शक्य झाली आहे.

बाजारपेठेच्या अभ्यासानुसार सरासरी १० ते १५ गुंठ्यात विविध पिके घेत असल्याने कोणत्याही पिकाचे एकदम मोठे आर्थिक नुकसान होत नाही. बाजारपेठेत एखाद्या भाजीला कमी दर मिळाला, तर दुसऱ्या भाजीपाल्यातून तो जास्तीचा मिळालेला असतो.

भाजीपाला पिकातून चांगले उत्पन्न मिळते. सध्या आठवड्याला तीन ते चार भाजीपाला पिकांच्या विक्रीतून सरासरी १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. याबरोबरच दुधाचे देखील अतिरिक्त उत्पन्न मिळते.

संपर्क : कविता शिंदे, ९७६२७१२१२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT