Women Self-help Group Agrowon
यशोगाथा

Women Self-help Group : शेतीपूरक उद्योगाला बचत गटाची साथ...

Abhijeet Dake

Success Story : जत (जि. सांगली) शहरापासून सहा किलोमीटरवर वसलेले रामपूर हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. येथील बहुतांश शेतकरी कुटुंब अल्पभूधारक आहेत. त्यामुळे पीक उत्पादन आणि उत्पन्न मिळण्यावर मर्यादा आहेत. बहुतांश महिलांना शेतीमध्ये मजुरीवर जावे लागते.

अलीकडच्या काळात जेथे पाण्याची उपलब्धता झाली तेथे भाजीपाला, फळपिकांची लागवड वाढत आहे. आपला प्रपंच आणि मुलांना शिक्षणाने परिपूर्ण करायचे असेल, तर आपणही कुठे कमी पडायला नको अशी महिलांची इच्छा. त्यामुळे लहान मोठे व्यवसाय, शेतीला जोड व्यवसाय करणे शक्य आहे, पण त्याला मदतीची जोड हवीच.

बचत गटाची सुरुवात

गेल्या काही वर्षांपासून जत तालुक्यात जिल्हा परिषदेतील महिला आर्थिक विकास महामंडळ ग्रामीण भागातील महिलांचा गट तयार करून त्यांना व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत. या महामंडळाच्या माध्यमातून २०१३ मध्ये रामपूर गावामध्ये प्रज्वल बचत गटाची स्थापन झाली.

सध्या गटामध्ये श्रीमती शेवंता मंडले (अध्यक्षा), सौ. कुसुम चव्हाण, सौ. महादेवी मंडले, सौ. चंद्रबा नाईक, सौ. भारती चव्हाण, सौ. अनिता चव्हाण, सौ. रुक्‍मिणी मंडले, सौ. सावित्री मलमे, सौ. सुगलाबाई मंडले आणि सौ. आश्‍विनी मलमे (सचिव) या महिला कार्यरत आहेत.

सुरुवातीला प्रत्येक सदस्यांकडून २०० रुपयांची बचत सुरू झाली. महिलांमध्ये नुसती आर्थिक बचत न करता पूरक व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन वाढला. गटाच्या माध्यमातून कर्ज घेत प्रत्येक महिलेस स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल याकडे गटाने लक्ष दिले.

प्रत्येक सदस्याने गाईपालन, परसबागेतील कुक्कुटपालन, पोल्ट्री व्यवसायाची निवड केली. मागणीनुसार प्रत्येक सदस्याला व्यवसायाला लागणाऱ्या कर्जाचा पुरवठा केला जातो. गटातील सदस्या वेळेत कर्ज परतफेड करतात. गेल्या वर्षी राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून दहा लाखांचे कर्ज उपलब्ध झाले.

चंद्रबा नाईक यांना पाच लाख आणि इतर पाच सदस्यांनी प्रत्येकी एक लाख कर्ज घेतले. या सदस्यांनी गोपालन, परसबागेत डीपी क्रॉस या सुधारित कोंबड्यांचे संगोपन सुरू केले आहे. दूध आणि अंडी विक्रीतून या महिलांना आर्थिक मिळकत सुरू झाली आहे.

बचत गटातील महिलांनी शेळीपालन, गाई-म्हैस पालन, परसबागेतील कुक्कुटपालन आणि सेंद्रिय पद्धतीने पेरू बागेच्या व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे.

डाळ मिलची उभारणी

व्यवसाय म्हटले, की त्याचे प्रशिक्षण आलेच, त्याचा अभ्यास आला. त्यातूनच पुढे व्यवसायवाढीला चालना मिळते. याच जिद्दीतून सावित्री मलमे, शेवंता मंडले आणि अनिता चव्हाण एकत्र आल्या. या परिसरामध्ये तूर, उडीद, मूग ही प्रमुख पिके आहेत. त्यामुळे या महिलांनी डाळ मिल सुरू करण्याचा विचार महामंडळाकडे मांडला.

त्यानुसार महामंडळाने महिलांना प्रशिक्षण दिले. व्यवसायाचे नियोजन झाल्यावर यंत्र खरेदी कोठे करायची, आपल्या भागात डाळ मिल कोठे आहे, याची पाहणी करण्यासाठी या सदस्या तासगाव येथे पोहोचल्या. त्या ठिकाणी यंत्र आणि डाळ कशी तयार होते याची माहिती घेतली. या सदस्यांनी गटातून १ लाख ८० हजार रुपये कर्ज घेतले.

कृषी विभागाच्या योजनेतून एक लाख अशी रक्कम जुळवून यंत्राची खरेदी करण्यात आली. डाळ मिल चांगल्या प्रकारे सुरू ठेवून या महिलांनी गटातून घेतलेल्या कर्जाची दहा महिन्यांत परतफेड केली.

डाळ मिलबाबत शेवंता मंडले सांगतात, की डाळ कशी तयार करायची हे माझा मुलगा शशिकांत शिकला. त्यानंतर आम्हाला त्याने डाळ निर्मितीबाबत शिकवले. परिसरातील शेतकरी आमच्याकडे

डाळ तयार करण्यासाठी येतात. तसेच आम्हीदेखील शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे हरभरा, तूर, मूग, उडीद खरेदी करून त्याची डाळ तयार करून परिसरात विक्री करतो. महिन्याला सर्व प्रकारची एक क्विंटल डाळ तयार करून बाजारदराने विक्री करतो. डाळ निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून प्रति किलोला १० रुपये प्रमाणे मजुरी घेतो.

पन्नास किलोपेक्षा जास्त डाळ असेल तर आठ रुपये प्रति किलो दराने डाळ तयार करून दिली जाते. महिन्याकाठी आम्हाला या व्यवसायातून २५ हजार रुपये निव्वळ नफा मिळतो, तो तिघींमध्ये विभागून घेतला जातो.

कुक्कुटपालनास चालना

क्रांती लोकसंचलित साधन केंद्रामार्फत नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत गटाने रामपूर येथे डीपी क्रॉस कोंबड्यांचे मदर युनिट सुरू केले. याची जबाबदारी आश्‍विनी मलमे यांच्याकडे आहे. जत तालुक्यातील गटांना या ठिकाणाहून कोंबडीची विक्री केली जाते. एक महिना अगोदर गटातील सदस्या कोंबड्यांची मागणी नोंदवितात.

त्यानंतर मदर युनिटमध्ये एका दिवसांची पिले येतात. त्यांना लसीकरण, खाद्य हे प्रकल्पामार्फत पुरवले जाते. एका महिन्यानंतर कोंबडीची विक्री सुरू होते. सर्वसाधारणपणे वर्षातून आठ बॅचमधून दहा हजार कोंबड्यांची विक्री होते. उन्हाळ्यात एक महिना विक्री बंद ठेवली जाते. सौ. मलमे यांना कोंबडी संगोपनासाठी प्रति कोंबडी दहा रुपये प्रमाणे दहा हजार रुपये मिळकत होते.

पोल्ट्रीशेडची उभारणी

चंद्रबा नाईक यांनी गेल्या वर्षी गटातून पाच लाखांचे कर्ज घेतले. त्यातून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्यांनी चार हजार कोंबड्यांच्या संगोपनासाठी शेड बांधले आहे. उर्वरित रकमेतून कोंबडी पिलांची खरेदी केली. कुक्कुटपालनासाठी एका खासगी कंपनीशी करार केला आहे. कंपनीकडून कोंबडी पिले संगोपनासाठी मिळतात. कोंबड्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. कोंबड्यांसाठी कंपनी खाद्य पुरवते.

दीड महिन्यात कंपनी कोंबड्यांची खरेदी करते. प्रति कोंबडी सांभाळण्यासाठी सात रुपये, तीन रुपये शेडचे भाडे आणि वीजबिल असे प्रति कोंबडी एकूण दहा रुपये नाईक यांना मिळतात. कमी जोखीम असल्याने व्यवसाय करणे सोपे झाले आहे. आतापर्यंत दोन बॅच पूर्ण झाल्या आहेत.

‘एक कुटुंब- एक झाड’ संकल्पना

क्रांती लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी ज्या गावात गट आहे, त्या गावांना वृक्ष लागवड हा सामाजिक उपक्रम राबवला जातो. प्रत्येक वर्षी नवीन गावांची निवड केली जाते. प्रत्येक गटाच्या माध्यमातून ‘एक कुटुंब- एक झाड’ अशी संकल्पना सुरू केली आहे.

यामध्ये आंबा, चिकू, सीताफळ, पेरू, नारळ, जांभूळ अशी फळझाडांची रोपे दिली जातात. या वर्षी उमराणी, देवनाळ, रामपूर, वळसंग, अचकनहळ्ळी, बिळूर, गुळवंची, प्रतापपूर, कुंभारी आणि जत या गावांतील महिला गटांना रोपे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.

संपर्क - कन्याकुमारी बिरादार, ८३२९९०२२१९, (सहयोगिनी, क्रांती लोकसंचलित साधन केंद्र)

श्रीमती शेवंता मंडले, ८२६१८५७७७०, (अध्यक्षा, प्रज्वल महिला बचत गट, रामपूर, ता. जत, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT