Shevanti Flower Management : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात येणारा आणि बागायती असलेला यवत- दोरगेवाडीचा भाग फुलशेतीसाठी विशेषतः शेवंतीसाठी प्रसिद्ध आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील या गावाची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास आहे. यवत परिसरात पूर्वी ज्वारी, हरभरा आदी पारंपरिक पिके घेतली जायची.
मात्र त्यातून अर्थकारण बळकट होण्याला गती मिळत नव्हती. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी अभ्यास, सर्वेक्षण व प्रयत्नांतून शेवंतीसारख्या फुलाच्या शेतीचा पर्याय शोधला. आज हेच पीक गावासाठी वरदान ठरले आहे.
आज गावातील ५० ते ६० टक्के शेतकरी फुलशेतीत आहेत. दोन-चार वर्षांपासून या भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. त्यामुळे कमी पाण्यात नियोजन तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा आधार व ठिबक सिंचनाची जोड देत शेतकरी शेवंतीची गुणवत्तापूर्ण शेती करीत आहेत.
शेवंती शेतीचे नियोजन
यवत परिसरात शेवंतीची लागवड मार्च ते मे या काळात होते. या फुलांना दसरा व दिवाळी असे हंगाम मिळतात. चालू वर्षी मात्र गारपीट, कमी पाण्याच्या परिस्थितीमुळे गावातील अनेक शेतकऱ्यांना मेचा हंगाम साधता आला नाही. गावात हलक्या, डोंगराळ, माळरानाच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी आहेत.
राजा या नावाने संबोधल्या जाणाऱ्या गावरान वाणाची दरवर्षी सुमारे ६०० ते ७०० एकरांवर लागवड असते. नांगरट, मशागत करून चार फूट रुंद व अर्धा फूट उंचीचे गादीवाफे तयार केले जातात. रोग-किडींचा प्रादुर्भाव नसलेली निरोगी रोपे लागवडीसाठी वापरली जातात. प्रति रोपाची किंमत वाणनिहाय दीड, दोन ते अडीच रुपये असते.
उगवणीनंतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वाफ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी होते. सुमारे दीड महिन्यात पुनर्लागवड होते. दाटी होणार नाही या पद्धतीनेच लागवडीचे अंतर ठेवले जाते. लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने दोनदा खुरपणी होते. सप्टेंबर- ऑक्टोबर काळातच कीडनाशकांच्या फवारणीची गरज भासते.
या काळात गरजेनुसार काही फवारण्या होतात. रसायनांचे झाडांच्या मुळाशी ‘ड्रेचिंग’ही केले जाते. लागवडीपासून साडेतीन ते चार महिन्यांत फुले काढणीला येतात. काढणी सुरू झाल्यानंतर सात ते आठ तोडे होतात.
तोडणी ते विक्रीपर्यंत नियोजन
गावात प्रत्येकाकडे किमान दहा गुंठे तरी शेवंतीचे पीक पाहण्यास मिळतेच. त्यामुळे सामूहिकरीत्या विक्री करणे सोपे झाले आहे. हंगामात प्रति दिवशी चार ते पाच गाड्यांची वाहतूक सुरू असते. शेवंतीला तसे बाराही महिने चांगले दर असतात.
मात्र गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या मुख्य सणांच्या काळात व उन्हाळ्यात लग्नकार्यांमध्ये सर्वाधिक मागणी व दर चांगले असतात. उन्हाळ्यात फुलांचे उत्पादन कमी असते. त्यामुळे दर तुलनेने अधिक असतात. हंगामाच्या उच्च काळात दिवसाला १० ते १२ मजूर तोडणीचे काम करतात.
प्रति मजूर दिवसभरात सुमारे ५० किलो फुले तोडतात. त्यातून एक टन फुले उपलब्ध होतात. फुले ताजी व मोकळी राहावीत यासाठी बारदानाचा वापर केला जातो. फुलांचा आकार एकसमान व दर्जा चांगला असल्याने पुण्यातील गुलटेकडी येथील बाजारपेठेत चांगली मागणी राहते.
सध्या पांढऱ्या रंगाच्या वाणाचे उत्पादन व बाजारात आवक मोठ्या प्रमाणात आहे. किरकोळ ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी आहे.
फुलशेतीमधील अनुभव
गावातील फूल उत्पादक भाऊसाहेब दोरगे म्हणाले, की शेवंतीचे अनेक वर्षांपासून उत्पादन घेत आहे. एकरी तीन ते चार टन उत्पादन मिळते. पुणे किंवा मुंबई बाजारपेठेत विक्री करतो. हंगामात किलोला ३० ते ४० रुपये दर मिळतो.
एकरी ७० हजार ते एक लाख रुपयांचा खर्च येतो. यंदा दसऱ्याला शेवंतीच्या फुलांना किलोला ५० ते ६० रुपये दर होते. मात्र आमची लागवड उशिरा झाल्याने त्याचा फायदा उठवता आला नाही. दिवाळीत मात्र किलोला ३० ते ४० रुपयांपर्यंत दर मिळाले.
शेवंतीचे अर्थशास्त्र
शेवंतीचे एकरी सहा ते सात टनांपर्यंत उत्पादन मिळते. पांढऱ्या तसेच पिवळ्या फुलाला १५ रुपयांपासून ते २०, ३० रुपये प्रति किलो दर मिळतो. अन्य फुलांच्या तुलनेत या फुलासाठी ग्राहकांची संख्या कमी असल्याने दर फारसे चढते राहात नाहीत. फुलांच्या क्षेत्रात वाढ झाल्यानेही दरांवर परिणाम होतो.
अलीकडे प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर वाढल्याने नैसर्गिक फुलांच्या मागणीवर निश्चित परिणाम झाला आहे. दसरा व दिवाळी असे दोन्ही हंगाम चांगले साधले तर खर्च वजा जाता एकरी एक, दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतही उत्पन्न मिळू शकते. दरांचे गणित कोलमडले की तोटाही सहन करावा लागत आहे. यंदाही तशीच काहीशी परिस्थिती आहे. अर्थात, शेवंतीच्या दीर्घकाळ सातत्यपूर्ण उत्पादनातून अर्थकारण सक्षम करून गावातील अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पीकअप व्हॅन, ठिबक संच तसेच अन्य दैनंदिन गोष्टी घेऊन प्रगती करणे शक्य झाले आहे.
भाऊसाहेब दोरगे, ९८६०३७१६७९
(शेवंती उत्पादक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.