Poultry Business Agrowon
यशोगाथा

Poultry Business : कोकणात अनुकूल तंत्रातून यशस्वी पोल्ट्री व्यवसाय  

एकनाथ पवार

Success Story : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या मुख्य ठिकाणापासून १३ किलोमीटरवरशेर्पे गाव आहे. या गावातून कोकण रेल्वे धावते. चहूबाजूंनी हिरवेगार डोंगर, मधोमध नैसर्गिक  साधनसपंत्तीने नटलेले गाव म्हणून शेर्पेची ओळख आहे. गावातील नडगिवे-शेर्पे मार्गालगत श्रेयश शेलार या ३३ वर्षे वयाच्या तरुणाचे घर आहे.

त्यांचा जन्म मुंबईतील असून तेथेच बारावी व त्यानंतर ‘सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खासगी कंपनी ते नोकरी करू लागले. मुंबईतील व्यस्त वेळापत्रकामुळे गावी फारसे येणे जाणे होत नव्हते. काही कार्यक्रमानिमित्तच ते गावी यायचे.

व्यवसायांचे शोधले पर्याय  

मुंबईतील नोकरीत धावपळ खूप असायची. नोकरी व मिळणारे उत्पन्नही शाश्‍वत नाही हे लक्षात येत होते. त्यामुळे सक्षम पर्याय आपल्याकडे असला पाहिजे हा विचार डोक्यात सतत येत होता. वडिलांसोबत चारचाकीतून गावी येत असताना ‘सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’चे कार्यालय दिसले.तेथे थांबून सविस्तर माहिती घेतली. प्रशिक्षणासाठी नोंदणीही केली. गावी येताना सोबत कोंबडीची २६ पिलेही खरेदी केली.

कुक्कटपालनातील कोणताच अनुभव नसल्याने त्याचा प्राथमिक अभ्यास करता येईल हा हेतू होता. घराच्या मागील बाजूस असलेल्या जागेत पिलांची साध्या पद्धतीने व्यवस्था केली.गावी आल्यानंतर दोन- तीन दिवसांतच संबंधित संस्थेतून प्रशिक्षणासाठी मुंबईला बोलावणे आले. तेथे कुक्कटपालनातील तीन आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. एकीकडे हा अभ्यास करताना कोकणातील वातावरणात आणखी काही करता येईल का याचाही श्रेयश अभ्यास करीत होते.

दरम्यान फूलशेतीविषयी मिळालेल्या माहितीवरून पुणे- तळेगाव दाभाडे येथे जाऊन ‘ग्रीन हाउस मॅनेजमेंट’ विषयातील प्रशिक्षण घेतले. नोकरीला सक्षम पर्याय गावी निर्माण करायचा या एकमेव हेतूने श्रेयश हे प्रयत्न करीत होते. आता गावी येणे- जाणे वाढले होते. घरानजीक एक एकरांत हळद लागवड,अळिंबी प्रयोग केला. नियोजनबद्ध केल्यास कुक्कुटपालन व्यवसाय अधिक किफायतशीर ठरू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्यावर सर्व ‘फोकस’ केला.

व्यवसायाची उभारणी

प्रशिक्षण व जोडीला विविध ‘सोशल मीडिया’चा वापर करून कुक्कुटपालनातील सविस्तर माहिती घेतली. शेड उभारण्याच्या कामास सुरुवात केली. सन २०२० मध्ये कोरोनाची समस्या सुरू झाली. तरीही काम सुरूच ठेवले. सन २०२१ पासून ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले.

त्या वेळी मुंबईत न थांबता गावी राहण्याचा निर्णय घेतला. कोकणातील हवामान लक्षात घेऊन स्थानिक गावरान कोंबडी जातीची निवड केली. लहान- मोठ्या समस्यांवर डॉ. परेश आमरे यांचे मार्गदर्शन घेतले. सुरुवातीला १००, २००, ३०० त्यानंतर चारशे  पक्ष्यांची बॅच अशी टप्प्याटप्याने व्यवसायात वाढ केली.

अर्थकारण

भगवती पोल्ट्री फार्म या नावाने श्रेयश व्यवसाय करतात. एक दिवस वयाच्या पिलांचा दर सरासरी २५ रुपये असतो. वर्षभरात सुमारे चार बॅच होतात. गावरान कोंबड्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असून घाऊक व किरकोळ दरांत विक्री होते. दोन किलो वजनापर्यंतच्या कोंबड्याचीपाचशे ते सहाशे रुपये दराने तर कोंबडीची ३०० ते ४०० रुपये दराने विक्री होते. घाऊक दर याहून कमी आहेत.

एप्रिल ते जून या काळात गावरान कोंबड्यांना मागणी मोठी असते.हा विचार करून बॅचमधील पक्ष्यांची संख्या वाढविण्यात येते. वर्षाला सहा ते सात लाख रुपये उलाढाल होते. दोन- तीन स्थानिक महिलांना व्यवसायातून रोजगार उपलब्ध केला आहे. श्रेयश यांची सात एकर शेती आहे. त्यात काजू, हापूस आंबा, नारळ आहे. व्यवसायात उपलब्ध होणारे पोल्ट्रीखत शेतीला उपयोगी ठरते.

असे वापरले पोल्ट्रीत तंत्रज्ञान

कोकणात पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी. पाऊस, हिवाळ्यात ११ अंश सेल्सिअस तापमान तर उन्हाळ्यात ३८ ते ३९ सें. तापमान असते. अशाप्रकारे तीनही ऋतू पोल्ट्री व्यवसायासाठी जोखीमेचे असतात. अनेक  पोल्ट्री व्यवसायिकांचे त्यामुळे नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत.

परंतु श्रेयश यांनी तीनही ऋतूंचा अभ्यास करीत पोल्ट्रीमध्ये अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर केला.
स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शेडची उभारणी पूर्व-पश्‍चिम केली आहे. लांबी ७० फूट आहे. तर वायूवीजन तसेच शेडमध्ये अमोनियाचे प्रमाण वाढू नये यासाठी रुंदी २५ फूट ठेवली आहे.

शेडमध्ये सुमारे १५० चौरस फूट आकाराचे आठ पिंजरे आहेत. पक्षी लहान असताना त्यांची त्यातील संख्या २०० ते ३०० पर्यंत ठेवण्यात येते.

कोंबड्यांना पावसाळी वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून शेडच्या मध्यावर नऊ ते दहा फुटांवर प्लॅस्टिक आच्छादन केले. त्याचा उपयोग हिवाळ्यातही झाला.

शेडचा पाया ‘आरसीसी’चा केला आहे. एरवी पोल्ट्री शेडच्या भिंती दोन फूट उंचीपर्यंत असतात. परंतु पावसाचे पाणी, सरपटणारे जीव तसेच कुत्री वा तत्सम जनावरे आत जाऊ नयेत म्हणून भिंतीची उंची पाच फूट ठेवली. कोकणातील डोंगर, वादळवारे यांच्यामुळे घराचे छप्पर अनेक वेळा उडून जाते. भिंतीच्या उंचीत हा देखील विचार करण्यात आला. भिंतीवर पाच फूट उत्तम दर्जाची जाळी व त्यावर चार फूट उंच उभे पत्रे बसविले आहेत. कोंबड्यांना उंचावर बसण्यासाठी तारांची बैठक व्यवस्था आहे.

गरजेनुसार वातावरण नियंत्रण किंवा वायुविजनासाठी (व्हेटिलेशन) नेटचा वापर केला आहे. उन्हाळ्यात झळांचा कोंबड्यांना प्रचंड त्रास जाणवतो. त्यावेळीही नेट उपयोगात आणले जाते.

साठवणुकीच्या दोन खोल्या  आहेत.

पक्ष्यांना पाणी देण्यासाठी ‘ड्रिंकर’ यंत्रणेची सोय केली आहे. त्यातून गरजेनुसार पाणी पक्ष्यांपर्यंत पोहोचते.

स्वच्छतेवर अधिक भर असतो. कोंबड्यांची विष्ठा खाली जमिनीला चिकटली जाऊ नये म्हणून शेडमध्ये भाताचा तूस वापरला जातो. तो महिनाभरात किंवा गरज भासल्यास त्याआधी बदलला जातो. तसेच शेडमध्ये कोंबड्यांच्या विष्ठेचा अजिबात गंध येऊ नये म्हणून वेळच्यावेळी पोत्यांमधून त्याचे संकलनही होते.  

जखमी पक्ष्यांना स्वतंत्र जागेत ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात.

टीका झेलून कामावर लक्ष
इंग्रजी माध्यमातून शिक्षण, ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’, चांगली नोकरी अशा बाबी असताना श्रेयश यांनी अनुभव असलेल्या कुक्कुटपालनाची जोखीम स्वीकारली अशी काही लोकांनी टीका वा चेष्टाही केली. परंतु त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून व टीकेला उत्तर न देता श्रेयश यांनी व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच आज प्रगती साधता आली.

अपयशही अनुभवले
सुरुवात कडकनाथ कोंबडीपालनापासून केली होती. एक- दोन वर्षे कोंबड्यांची मुंबईत विक्री केली. मात्र एका व्यापाऱ्याने ४२ हजार रुपये थकविले. ते आतापर्यंत दिले नाहीत. शिवाय आणखी एकाने गिरिराज पिलांसाठी पैसे नेले. पण पिले दिली नाहीत. अशावेळी अनुभवातून शहाणे व धाडसीहोत श्रेयश यांनी पुढील वाटचाल ठेवली.

श्रेयश शेलार    ९१३७५३६७८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT