Broiler Poultry Farming : ब्रॉयलर कोंबडीपालनासाठी शेडची उभारणी कशी असावी?

Poultry Update : ब्रॉयलर कोंबडीपालनासाठी शास्त्रीय पद्धतीचे शेड बांधणी आवश्यक आहे. आजच्या लेखात फार्म कसा सुरू करावा, शेडची बांधणी कशी करावी या बाबत माहिती घेत आहोत.
Broiler Poultry
Broiler Poultry Agrowon

डॉ. आर. सी. कुलकर्णी, डॉ. के. वाय. देशपांडे, डॉ. बालाजी डोंगरे

Poultry Farming : पोल्ट्री फार्म सुरू करण्यापूर्वी जागेची निवड महत्त्वाची आहे. शेडसाठी दलदलयुक्त जमीन निवडू नये कारण की अशा जमिनीत पाणी साठण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा उत्तम होत नाही. ही जमीन शक्यतो नापिक, सखल आणि आकाराने चौरस असावी. आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंच असावी.

खडकाळ जमीन शेड बांधणी करिता उत्तम असते. फार्म हा मुख्य रस्त्याला जोडलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे फार्मवरील कोंबड्यांची वाहतूक वर्षभर सुरू राहते. पिलं, खाद्य, तूस, औषधी इत्यादी गोष्टींची वाहतूक अगदी सुलभतेने करता येते.

फार्म हा वस्ती, औद्योगिक वसाहत, गाव, शहर अथवा गर्दीच्या ठिकाणापासून दूर असावा. फार्मपासून बाजारपेठ अथवा विक्री केंद्र जास्तीत जास्त ४० ते ५० किलोमीटरच्या परीक्षेत्रात असावे.

पाणी :

- फार्मची उभारणी करण्यापूर्वी उपलब्ध पाणी स्रोत याची तपासणी करून घ्यावी.

- स्वच्छ व मुबलक पाण्याची गरज असते. प्रतिदिन १००० कोंबड्यासाठी साधारणतः ३०० ते ४०० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मोठ्या फार्मसाठी पर्यायी व्यवस्था करावी.

वीज उपलब्धता :

व्यावसायिक फार्मवर खाद्य तयार करण्यासाठी, पाणीपुरवठ्यासाठी तसेच लहान पिलांच्या ब्रूडिंगसाठी विजेची गरज असते. मोठ्या फार्मसाठी स्वतंत्र डीपी असावा. तीन फेज व एक फेज वीज ही २४ तासांसाठी उपलब्ध असावी. पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरचा वापर करावा. सध्या पर्याय म्हणून गॅस ब्रूडरदेखील उपलब्ध असतात.

Broiler Poultry
Broiler Poultry Business : सातत्य, चिकाटीतून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी

जमिनीचा आकार :

- जमीन शक्यतो आकाराने चौरस असावी. एक एकर जागेमध्ये जवळपास १२ हजार कोंबड्यांचे पारंपरिक पद्धतीने संगोपन करता येते. फार्मसाठी जमीन खरेदी करताना भविष्यात फार्ममधील कोंबड्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने विचार करूनच जमिनीची खरेदी करावी.

शेड बांधणीचे नियोजन :

शेड बांधणीचा खर्च हा सर्वाधिक असतो. फार्मचा आराखडा कोंबड्यांच्या क्षमतेवर अवलंबून असतो. शक्यतो मोठ्या फार्मवर खालील प्रकारचे बांधकाम करावे लागते.

१) कोंबड्यांसाठी शेड

२) कार्यालय

३) खाद्य तयार करण्यासाठी व साठवण्यासाठी खोली

४) भांडार गृह

५) कामगारांना राहण्यासाठीची व्यवस्था

६) मरतुक झालेल्या कोंबड्या जाळून टाकण्याची भट्टी

७) केरकचरा यासाठी खड्डा

८) स्वच्छता गृह इत्यादी.

पोल्ट्री शेड हे कमी खर्चिक असावे, ते उत्तम प्रकारे बांधावे. मुख्यतः परिसर, हवेशीर असावा आणि दैनंदिन कार्यात सुलभता असणे गरजेचे आहे. एका व्यावसायीक कोंबडीला पारंपारिक पद्धतीत १ ते १.२५ चौ.फूट इतकी जागा लागते. ब्रॉयलर कोंबडीपालनासाठी शेड बांधकामापूर्वी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.

दिशा :

- आपण उष्ण कटिबंधीय प्रदेशात आहोत त्यामुळे शेडची लांबी ही पूर्व-पश्चिम असावी. जेणेकरून कोंबड्यांचा सूर्य किरणांपासून बचाव होईल. पावसाळ्यात पावसाचे पाणी आत येणार नाही.

रुंदी :

- पारंपरिक पद्धतीतील शेडची रुंदी ही उत्तर-दक्षिण २२ ते ३०

फुटांपर्यंत असावी. त्यामुळे वायुविजन उत्तम राहते. जर रुंदी ३० फुटांपेक्षा अधिक असल्यास शेडमध्ये वायुविजन योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे याचा कोंबडीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. वातानुकूलित शेडसाठी जास्तीची रुंदी ठेवावी.

लांबी :

- शेडची लांबी आपण आपल्या गरजेनुसार ठेवू शकतो. सामान्यतः २०० ते २२० फूट लांबी ही उत्तम मानण्यात येते.

Broiler Poultry
Poultry Management : ब्रॉयलर कोंबडीतील जलोदर

पाया :

- पाया हा जमिनीपासून २ ते ३ फूट खोल आणि जमिनीच्या किमान २ फूट वर असावा. तळ पक्क्या काँक्रीटचे असल्यास ते स्वच्छ करण्यास आणि धुण्यास सोईस्कर होत. उंदीर, घूस इत्यादीपासून संरक्षण मिळते.

बाजू भिंती :

- मांसल कोंबड्या गादी पद्धतीत वाढवल्या जातात. वायुविजन योग्य प्रकारे व्हावे आणि गादी कोरडी राहावी यासाठी बाजू भिंतीची उंची ही एक फुटापेक्षा अधिक नसावी.

वायर नेटिंग किंवा जाळी :

- बाजूभिंतीपासून छतापर्यंत जाळी बसवावी. जाळीचा आकार २.५ × २.५ सें.मी, १.६ मि.मी. वायर व्यास, ९० ते १०० जीएसएम असावा.

छत :

- छत ‘A’ आकाराचे व दोन्हीही बाजूंनी उतरते असावे. छताची बाजू भिंतीपासूनची उंची किमान ८ ते १० फूट आणि मध्यभागाची उंची किमान १० ते १२ फूट असावी. ज्या जागी बाजूभिंतीवरील जाळीचा छताच्या पत्र्यास स्पर्श होईल त्यापासून छताचे पत्रे हे किमान ३.५ फूट बाहेर असावेत.

- सध्या बाजारात सूर्यप्रकाश परावर्तित करणारे पत्रे उपलब्ध असतात.

दरवाजा :

- शेडचे दरवाजे हे लांबीच्या भिंतीवर बसवावेत. हे दरवाजे साधारणतः २ मीटर उंच व १ मीटर रुंद असावेत.

दोन शेडमधील अंतर :

-दोन शेडमधील अंतर हे किमान ५० फूट असावे, जेणेकरून वायुविजन योग्य प्रकारे राहील.

-शेडच्या सभोवताली उंच व छायादार वृक्ष कमीत कमी १५ फूट दूर असावे; जेणेकरून शेड थंड राहण्यास मदत होते, परंतु वादळवारा आल्यास वृक्ष शेडवर कोसळण्याची भीती नसते.

- शेडमधील स्वयंचलित पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन शेडच्या आतूनच असाव्या. बाहेरून ठेवल्यास उन्हाळ्यात कोंबड्यांना थंड पाणी मिळत नाही

संपर्क - डॉ कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२, (सहायक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com