Food Processing
Food Processing Agrowon
यशोगाथा

Food Processing : बिस्कीट प्रक्रिया उद्योगामध्ये तयार केली ओळख

टीम ॲग्रोवन

सात वर्षांपासून इचलकरंजीतील सौ. नमिता पाटील यांनी पती शांतिनाथ यांच्या मदतीने बिस्किटे निर्मिती उद्योगाला (Biscuit Production Industry) घरगुतीस्तरावर सुरुवात केली. बिस्किटे आणि अन्य प्रक्रिया (Food Processing) पदार्थांना स्थानिक बाजारपेठेच्या बरोबरीने कर्नाटक राज्यातील ग्राहकांनी त्यांच्या उत्पादनांना पसंती दर्शविली आहे. एकमेकांच्या समन्वयाने त्यांनी दर्जेदार बिस्कीट निर्मितीमध्ये (Biscuit Production) वेगळा ठसा उमटवला आहे. २०१५ मध्ये नमिताताईंनी घरगुती स्तरावर बिस्कीटनिर्मिती उद्योगाला सुरुवात केली. बाजारपेठेची मागणी वाढल्यानंतर २०१७ पासून आधुनिक यंत्रणांचा वापर सुरू केला. पाटील कुटुंबीयांकडे शेती नाही. यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. किराणा मालाचे दुकान हेच उत्पन्नाचे साधन. कायमस्वरूपी व्यवसाय करण्याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या नातेवाइकांकडे बिस्कीट तयार करण्याचे यंत्र होते. यातूनच बिस्कीट व्यवसायाची कल्पना सुचली. सुरुवातीला घरातूनच या व्यवसायाला प्रारंभ केला.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात ः

सध्या नमिताताई गव्हाची तुपातील बिस्किटे, नाचणीची तुपाची बिस्कीट आदींसह गव्हाची डालड्यातील बिस्किटे, चॉकलेट बिस्किटे, गुळाचा वापर केलेली बिस्किटे, गव्हाची नानकटाई, गव्हाचे रोट तयार करतात. सध्या त्यांच्याकडे बिस्किटे तयार करण्यासाठी दोन ओव्हन, तीन मिक्सिंग यंत्रणा, एक ब्रेड स्लाइसर आणि दोन पीठ चक्या आणि गहू चाळणी यंत्रणा देखील आहे. २०१५ मध्ये प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केल्यानंतर दररोज दहा किलो बिस्किटे तयार केली जायची. आता दररोज १०० किलोपर्यंत बिस्किटे तयार होतात. मागणीनुसार बिस्किटे निर्मितीवर त्यांनी भर दिला आहे. एक दिवस बिस्किटे निर्मिती आणि एक दिवस पॅकिंग असे कामाचे नियोजन असते. मागणीनुसार अर्धा किलो, पाव किलोचे पॅकिंग केले जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार सुट्ट्या स्वरूपात बिस्किटे तयार केली जातात. नोंदविलेल्या मागणीनुसार सकाळी बिस्किटे निर्मितीस सुरुवात होते. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रक्रिया उद्योगाचे कामकाज चालते. सूचना फलकावर कोणत्या ग्राहकाची किती किलो ऑर्डर आहे याची माहिती नोंदविलेली असते. त्यानुसार कच्या मालाचा अंदाज घेऊन बिस्किटे तयार करण्याचे नियोजन होते. जशी बिस्किटांची मागणी वाढली तशी मनुष्यबळाची गरज लागू लागली. त्यांनी चार वर्षांपासून दोन महिलांना वर्षभर रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या महिला दहा ते सहा या वेळेत प्रक्रिया उद्योगात काम करून आपले कुटुंब चालवतात. बहुतांशी ग्राहक हे उद्योगाच्या ठिकाणी येऊन खरेदी करतात. परगावच्या ग्राहकांना ट्रॅव्हल्स, ट्रान्स्पोर्टने बिस्किटे पाठवली जातात. प्रत्येक बिस्किटांच्या प्रकारानुसार १८० ते ३०० रुपये प्रति किलो दर आहे. गव्हाच्या बरोबरीने नाचणीच्या बिस्किटांनाही प्राधान्य दिले जाते. नाचणी बिस्किटे तीनशे रुपये किलो या दराने विकली जातात. याशिवाय शुगर फ्री बिस्किटे तयार केली जातात. नमिताताई उत्पादनाच्या पातळीवर लक्ष देतात. पती शांतिनाथ हे विक्री व्यवस्थेचे काम पहातात.

दर्जेदार बिस्किटांची निर्मिती ः

बिस्किटाची चव प्रक्रियेसाठी वापरलेल्या कच्चामालावर अवलंबून असते. चांगल्या प्रकारचा कच्चामाल वापरला जातो. गव्हासहित तूप, साखर, डालडा व अन्य पावडरी या दर्जेदार स्वरूपात एकाच ठिकाणाहून खरेदी केल्या जातात. यामुळे दर्जामध्ये कुठलाच फरक पडत नाही. ग्राहकांनी जर कच्चामाल दिला तर त्यापासून बिस्किटे तयार करून दिली जातात. ग्राहकांची मागणी आणि अनुभवानुसार बिस्किटे निर्मितीत सुधारणा करण्यात आली. यामुळे त्यांना चांगली बाजारपेठ मिळाली आहे.

राज्य, परराज्यांतही मागणी ः

बिस्किटे तयार करण्यास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला इचलकरंजी शहरात विक्री करण्यात आली. नातेवाईक, मित्र मंडळींच्या माध्यमातून बिस्किटांना चांगले मार्केट मिळाले. गेल्या काही वर्षांपासून बिस्किटांचे हक्काचे ग्राहक तयार झाले आहेत. अनेक नातेवाईक बिस्किटे तयार करून परदेशातील नातलगांना पाठवतात. सुरुवातीच्या टप्प्यात स्टॉलच्या माध्यमातून ग्राहकांना बिस्किटांची माहिती देण्यात आली. यानंतर ग्राहक वाढू लागले. सध्या पुणे, पंढरपूर, नगर, सांगली, कोल्हापूर, बेळगाव शहरांत बिस्किटे विक्रीसाठी जातात. ऑनलाइन पद्धतीने पैसे घेऊन बिस्किटे पोहोचवली जातात. घरगुती ग्राहकांबरोबरच बेकरी आणि अन्य व्यावसायिक बिस्किटांची खरेदी करतात. दुकानदारांच्या मागणीनुसार १० ते २० किलोचे बॉक्स बनविलेले आहेत. किमान तीन ते चार दिवस आधी ऑर्डर घेऊन बिस्किटे तयार केली जातात.

नमिता या कर्नाटकातील असल्याने त्यांना मराठी भाषेची अडचण होती. महिलांना लघू उद्योगासाठी प्रेरणा देणाऱ्या माधुरी केस्तीकर यांनी त्यांना बँकेतील व्यवहार, ग्राहकांशी कसा संवाद साधायचा याबाबत प्रोत्साहन दिले. यामुळे त्या आता ग्राहकांशी मराठीतून चांगला संवाद साधतात. नमिता यांना या व्यवसायासाठी पती शांतिनाथ यांच्याबरोबरच सासूबाई आणि दोन मुलांचेही सहकार्य मिळते.

गुणवत्तेमध्ये सातत्य

तयार होणाऱ्या एकूण बिस्किटांमध्ये तुपातील बिस्किटांना मोठी मागणी असते. विशेष करून घरगुती ग्राहक जादा प्रमाणात तुपातील बिस्किटे तयार करून नेतात. बिस्किटांचा दर्जा चांगला असल्याने मागणीत सातत्य असते. याशिवाय गव्हाचे टोस्ट, गव्हाची खारी, ओट्स आदी पदार्थ ही मागणी असेल तर तयार करून दिले जातात. यंत्रांची सातत्याने स्वच्छता करण्याबरोबरच कच्च्या पदार्थांच्या स्वच्छतेला ही महत्त्व दिले जाते. स्वतः नमिता आणि शांतिनाथ सातत्याने बिस्किटे तयार करताना स्वच्छता राहील याची खबरदारी घेतात. यामुळेच बिस्किटाचा दर्जा व मागणी टिकवून ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

बिस्किटे निर्मिती उद्योगासाठी त्यांनी आतापर्यंत शेड, यंत्रसामग्रीसाठी २२ लाखापर्यंतचे भांडवल गुंतवले आहे. महिन्याला सरासरी ७० हजार रुपयांची उलाढाल होते. खर्च वजा जाता पंधरा ते वीस टक्के नफा उरतो. कोरोना काळात इतर व्यवसाय बंद पडत असताना बिस्कीट व्यवसायाने त्यांना चांगला आधार दिला. ताजी बिस्किटे तयार करून मिळत असल्याने अनेक ग्राहकांकडून कोरोना काळात बिस्किटाला मागणी वाढली. यातून नवा ग्राहक तयार झाला आणि तो कायमस्वरूपी जोडला गेला.

‘पारस फूड प्रॉडक्ट्स’ या ब्रँडनेमने बिस्किटे आणि प्रक्रिया पदार्थांची विक्री केली जाते. अलीकडे ग्राहकांची मानसिकता बदलत आहे, किमतीपेक्षा दर्जेदार खाण्याकडे कल वाढत आहे. याचा विचार करून आणखी नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमिताताईंनी सांगितले.

संपर्क ः सौ.नमिता पाटील, ९७६७४ ९६९४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT