Food Processing Business Agrowon
यशोगाथा

Agriculture Processing Industry: तांदूळ, मसाला उद्योगातून विस्तारले उत्पन्नाचे स्रोत

Success Story: सातारा जिल्ह्यातील गोषटवाडी (राममळा) येथील निळकंठ व स्मिता या भिंगारदेवे दांपत्याने पाच एकर शेतीला प्रक्रिया उद्योगाचा आधार शोधला. आपल्याच शेतातील इंद्रायणी तांदळावर प्रक्रिया सुरू केली.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

Indian Agriculture: सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या कुशीत गोषटवाडी (राममळा) गाव वसले आहे. येथील निळकंठ आणि स्मिता या भिंगारदेवे दांपत्याचे कराड-चिपळूण रस्त्यावर घर आहे. निळकंठ हे पदवीधर असून काही दिवस त्यांनी खासगी कंपनीत नोकरी केली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या पाच एकर शेतीत पूर्णवेळ लक्ष देण्यास सुरुवात केली. भात, ऊस, नाचणी, भुईमूग अशी पिके त्यांच्या शेतात असतात. गोषटवाडी हा कोकण पट्ट्यापासून जवळ असल्याने येथे पावसाचे प्रमाण भरपूर असते.

आपल्या लाल मातीत भिंगारदेवे कुटुंब इंद्रायणी तांदूळ पिकवते. त्याची चवही उत्कृष्ट असते. त्यामुळे आपल्या शेतात पिकविलेल्या भाताची स्वतःच थेट विक्री करण्यावर त्यांनी भर दिला. साहजिकच त्याला चांगला दरही मिळत होता. कोयना धरण तसेच कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचा हा मुख्य रस्ता असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ कायम असते. ही संधी साधून याच रस्त्याकडेला स्टॉल उभारून घरच्या तांदळाबरोबर भुईमूग शेंगा, नाचणी यांनाही भिंगारदेवे यांनी मार्केट मिळवले.

मसाला उद्योगाची दिशा

आता कुटुंबाकडे मार्केटिंग, विक्रीचा चांगला अनुभव व आत्मविश्‍वासदेखील तयार झाला होता. शेती व शेतमाल विक्री यांच्याबरोबर उत्पन्नाचा स्रोत अजून वाढवावा, असे या दांपत्याला वाटू लागले. दरम्यान उपकृषी अधिकारी अजय साळुंखे व सुरेखा कर्चे यांनी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य, कृषी योजना व त्याआधारे प्रक्रिया उद्योगाविषयी भिंगारदेवे दांपत्याला मार्गदर्शन दिले. तसेच उद्योग सुरू करण्याचाही सल्ला दिला.

स्मिता यांना मसाल्यांची आवड होती. घरच्यासाठी तयार केलेल्या मसाल्याला पर्यटकांकडूनही मागणी येऊ लागली. मग हीच संधी साधून या उद्योगात उतरण्याचे नक्की झाले. योजनेंतर्गत बँकेकडून साडेचार लाख रुपयांचे कर्ज मिळाले. सन २०२२ मध्ये घराजवळच प्रक्रिया युनिट उभे केले. मिनी राइस मिल व मसाले उत्पादनांसाठी चार पारेचा डंक खरेदी केला. कांदा लसूण मसाला, मिरची पावडर यांची निर्मिती तसेच परिसरातील ग्राहकांना चटणी तयार करून देण्यास सुरुवात केली.

आउटलेटची व्यवस्था

आपल्या घराजवळच आकर्षक आउटलेट उभारले. तेथे इंद्रायणी तांदूळ, नाचणी, नाचणीचे पापड व पीठ आणि मसालेवर्गीय पदार्थ यांची विक्री सुरू केली. ग्राहकांना बसण्यासाठी व्यवस्था केली. कराड- चिपळूण रस्त्यावरच हे विक्री केंद्र असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. पदार्थ विक्रीत वृद्धी होऊ लागली. मागणी वाढल्याने सहा पारीचा अजून एक डंक खरेदी केला आहे. उद्योगाचे चांगल्या प्रकारे व्यावसायिकीकरण होण्याच्या दृष्टीने पॅकिंग, सीलिंग मशिन, वजनकाटे आदी यंत्रसाम्रगीही आली. आवश्‍यक परवाने घेतले. यांत्रिकीकरण करताना शेतासाठीही पॅावरटिलर घेतला.

गुणवत्तेमुळे व्यवसाय वृद्धी

दरवर्षी सुमारे साडेतीन टनांच्या आसपास इंद्रायणी तांदळाची एक किलो व पाच किलो पॅकिंगमधून विक्री होते. त्यास किलोला ७० ते ७५ रुपये तर नाचणीला ५० ते ६० रुपये दर मिळतो. आनंद या ब्रॅंडने १०० ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम व एक किलो या पॅकिंगमधून मसाल्यांची तर सन २०२३ मध्ये ५५० किलो कांदा लसूण मसाला (प्रति किलो ६०० रुपये दर), शंभर किलो मिरची पावडर (प्रति किलो ७५० रुपये दर), २०२४ मध्ये १५०० किलो कांदा लसूण मसाला,

५०० किलो मिरची पावडर तर यंदा दोन हजार किलो मसाला व ७०० किलो पावडर यांचे उत्पादन व विक्री साधली आहे. हळद व धणे पावडरचे उत्पादनही होते. स्थानिक ग्राहकांबरोबर पर्यटकांच्या माध्यमातून आपली उत्पादने पुणे, मुंबईसह राज्यातील अन्य भागापर्यंत पोचली असल्याचे स्मिता यांनी सांगितले. वर्षभरात उद्योगातून २५ ते ३० टक्क्यांपर्यंत नफा होत आहे. पुढील काळात व्यवसायाचा विस्तार करणार असून, शहरी ग्राहकांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या दृष्टीने उद्योगाला स्वरूप देण्याचा विचार आहे.

उद्योगातील महत्त्वाच्या बाबी

उत्पादन निर्मितीची संपूर्ण जबाबदारी स्मिता सांभाळतात. तर कच्चा माल, विपणन, विक्री हा विभाग पती निळकंठ पाहतात. तीन मुलांपैकी आउटलेटची जबाबदारी श्रद्धा पाहते. श्रेयस व श्रेया यांचे शिक्षण सुरू असून तेही सवडीनुसार मदत करतात. ‘सोशल मीडिया’वर आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यातही त्यांचे योगदान आहे.

निर्मिती युनिट व विक्रीच्या ठिकाणी कायम स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा ठेवण्यात येतो.

गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कच्चा मालदेखील तसाच दर्जेदार निवडण्यात येतो. काही माल शेतकरी तर काही व्यापाऱ्यांकडून घेण्यात येतो.

उत्पादने निर्मितीचा कालावधी मुख्यतः ऑक्टोबर किंवा दिवाळीनंतर सुरू होतो. तो मे-जूनपर्यंत चालतो.

पावसाळा काळात निर्मिती होत नसली तरी विक्री मात्र सुरू असते.

परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रांची विशेष काळजी घेतली जाते.

स्वतःच्या उद्योगाव्यतिरिक्त परिसरातील शेतकऱ्यांनादेखील कांदा लसूण चटणी तयार करून दिली जाते.

शेतात तयार होणाऱ्या बहुसंख्य मालाची थेट विक्री करण्यावरच असतो भर.

आदर्श शेती

आपला प्रक्रिया उद्योग सांभाळून हे कुटुंब आदर्श शेतीही करते. आपल्या पाच एकरांव्यतिरिक्त अन्य शेतकऱ्यांची तीन ते चार एकर शेती ते खंडाने करतात. ऊस, कलिंगड, मिरची अशी विविधताही ठेवली आहे. सर्व पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. सभोवताली डोंगर असल्याने वन्यप्राण्यांचा त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून झटका यंत्राची उभारणी केली आहे. उत्पन्नाचे स्रोत अजून वाढवण्याच्या दृष्टीने मागील वर्षी ऊस रसवंती घेतली आहे. या भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी पुढील हंगामापासून त्याची सेवा दिली जाणार आहे.

स्मिता भिंगारदेवे ८८८८७२६८७४, ८८८८४९६०५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT