Ber Fruit Agrowon
यशोगाथा

Ber Fruits : सोलापूरच्या बोरांची बाजारात चलती ; चमेली, उमराणला बोरांना वाढती मागणी

Fruit Market : चवीला आंबट-गोड; पिवळसर, नारंगी, लालसर रंगाची; काही छोटी, काही टपोरी अशी बोरे सध्या सोलापूरच्या बाजारपेठेत लक्ष वेधत आहेत. विशेषत: चमेली, उमराण वाणाच्या बोरांची चांगलीच चलती आहे.

सुदर्शन सुतार

Agriculture Success Story : डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, केळी आदी फळांबरोबर बोरांमध्येही सोलापूर जिल्ह्याची वेगळी ओळख तयार आहे. पुणे, मुंबईसह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याच्या बाजारपेठांपर्यंत इथल्या बोरांचा दबदबा आहे.

अलीकडील काळात उजनी धरणाच्या पाण्यामुळे शेतकरी अन्य व्यावसायिक, बागायती फळपिकांकडे वळले. तरीही सांगोला, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या भागांमधील सर्व क्षेत्र शाश्‍वत सिंचनाखाली नसून तेथे डाळिंबाबरोबरच बोराची शेती देखील टिकून आहे.

मोहोळ, बार्शी, माढा या भागांमधील गावांमध्ये अस्सल गावरान अशा चमेली, उमराण व चेकनेटसारख्या वाणांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे. बाजारपेठांमध्ये आज त्यांना चांगली पसंती आहे.

विस्तारलेली बोराची शेती

मोहोळ तालुक्यातील मोहोळसह, अनगर, पापरी, खंडाळी, कोन्हेरी, वाफळे तसेच माढा तालुक्यातील मोडनिंब, अंजनगाव, उपळाईसह परिसरातील गावे बोरांचे क्लस्टर म्हणून ओळखली जातात.

या भागात चेकनेटसह चमेली, उमराण आदी वाणांची लागवड होते. त्यातही चेकनेट आणि उमराणचे क्षेत्र तुलनेने अधिक आहे. एकूण पट्ट्यात १५० ते २०० एकरपर्यंत बोराचे क्षेत्र विस्तारले असावे.

वर्षातून एकवेळ करावी लागणारी छाटणी, त्यानंतर दोन ते तीन वेळा अन्नद्रव्यांच्या मात्रा, वाफसा पाहून दिले जाणारे पाणी, भुरी, अळी यांसारख्या किडी-रोगाच्या प्रतिबंधासाठी कीडनाशकांच्या मोजक्या फवारण्या आदी कामकाज वगळता तुलनेने उत्पादन खर्च कमी असतो.

एकदा लागवड केलेली बाग किमान १० ते १५ वर्षे उत्पादन देऊ शकते ही जमेची बाजू असते. पूर्वी इथल्या बोर पट्ट्यात चमेली, उमराण या वाणांची लागवड अधिक होती. मात्र देशी बोरांसारखी दिसणारी आणि तशीच चव असलेल्या चेकनेट बोरांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बाजारात त्याला चांगला उठाव मिळतो आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उमराणी बागेत या वाणाचे कलम करून क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित चांगलेच जुळले आहे.

बांधावरच मार्केट

साधारण डिसेंबरमध्ये बोरांच्या हंगामाला सुरुवात होते. रोज किंवा एकदिवसाआड बोरे काढणीला येतात. डिसेंबर ते मार्च असा सुमारे चार महिने हंगाम चालतो. यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर कुर्डुवाडी बाजार समितीअंतर्गत येणारा मोडनिंब उपबाजार बोरांसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. हंगामात प्रति दिन येथे ८ ते १० गोण्यांपर्यंत आवक असायची.

अलीकडे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत असल्याने बाजार समितीतील व्यवहार तुलनेने कमी झाले आहेत. सध्याच्या घडीला सोलापूर, पुणे, मुंबई तसेच परराज्यांत हैदराबाद, विजयपूर या कर्नाटकातील जिल्ह्यांतील बाजारपेठाही शेतकरी काबीज करताना दिसत आहेत.

यंदा अनेक भागांत भरपूर पाऊस झाला. त्यानंतरही अवकाळी पावसाने बोर बागांचे नुकसान झाले. त्यामुळे तुलनेने आवक कमी आहे. त्यामुळे चांगला उठाव व दरही वधारलेले आहेत. चमेली आणि उमराणी बोरांना प्रति किलो ३० ते ४० रुपये तर चेकनेटला ६० ते ७० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत.

ॲपलबेरचही वाढते क्षेत्र

अलीकडे सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांमध्ये ॲपल बेरचे क्षेत्र वाढते आहे. जिल्ह्यात त्याचे पाचशे एकरांहून अधिक क्षेत्र असावे. आकाराने मोठे, रंगाने हिरवे आणि गर जास्त असलेले हे बोर आता चांगलेच लोकप्रिय झाले आहे. त्यालाही प्रति किलो ३० ते ४० रुपयांपर्यंतचा दर मिळतो आहे. त्याचेही व्यापारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून खरेदी करतात.

बोर उत्पादकांचे अनुभव

कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील औदुंबर रणदिवे यांची १८ एकर शेती आहे. त्यात ते द्राक्षे, टोमॅटो व बोर आदी पिके घेतात. बोर पिकात त्यांचा सुमारे १४ वर्षांचा तगडा अनुभव तयार झाला आहे. त्यांची पाच एकर बोरबाग असून त्यात चमेली आणि उमराण वाणांचा समावेश आहे. ते सांगतात की सुमारे चार वर्षांनंतर झाड व्यावसायिक उत्पादन देण्यास सुरवात करते. एप्रिलमध्ये छाटणी केली जातो.

फळाचा दर्जा टिकवण्यासाठी दरवर्षी तार ते पाच ट्रॉली शेणखताचा वापर करतो. सहा ते सात बोअर व शेततळ्याचा आधार आहे. या पिकाला पाण्याचा चांगला आधार द्यावाच लागतो. चांगले व्यवस्थापन केल्यास प्रति झाड शंभर किलोच्या पुढे उत्पादन देते. चमेली, उमराण बोरांना प्रति किलो २० ते ३० रुपये तर चेकनेट बोरांना त्याहून अधिक दर मिळतो.

चमेलीची बोरे गोल व आकाराने लहान असतात. तर उमराणी बोरे आकाराने मोठी असतात. गोडीला दोन्ही बोरे एकसमानच असतात. तुलनेत चमेलीला अधिक पसंती असते. त्यास किलोला २० ते ३० रुपये व उमराणीला १० ते १८ रुपयांपर्यंत दर मिळतो. पाच एकरांत खर्च वजा जाता काही लाखांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते.

औदुंबर रणदिवे ९७६३१४२०९१

यंदा दरांची स्थिती समाधानकारक

मोहोळ येथील पांडुरंग चव्हाण म्हणाले, की पाच वर्षांपूर्वी उमराणी वाणाची अर्धा एकर बाग होती. पाच वर्षांपासून चेकनट वाण घेत आहे. प्रति झाड ३० ते कमाल ५० किलोपर्यंत उत्पादन मिळते.

बोराला पाणी तुलनेने कमी लागत असले तरी वाढीच्या प्रत्येक महत्त्वाच्या अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे राहते. चालू वर्षी पाऊस भरपूर झाला. फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे बाजारात आवक कमी होऊन दर किलोला ७० ते ७५ रुपयांपर्यंत मिळाले. मी दरवर्षी हैदराबाद येथे गोण्यांमधून माल पाठवतो.

आतापर्यंत साडेचार टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. अजून अर्धा टनापर्यंत माल हाती लागेल. एकरी अधिक उत्पादन, दर चांगले व उत्पादन खर्च अन्य फळपिकांच्या तुलनेत कमी या वैशिष्ट्यांमुळे बोर हे पीक फायदेशीर ठरते. द्राक्षाला कीडनाशके, खते आदी निविष्ठांवर दोन लाखांचा तरी खर्च येतो. त्या तुलनेत बोराला हा खर्च २५ ते ३० हजारांपर्यंत येतो.

पांडुरंग चव्हाण ९७३०८५८५७१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Compensation: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत ऐंशी जणांना मदत

Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गे होण्यासाठी आंदोलनाचा निर्णय

Fertilizer Management: माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे

Sugarcane Farmer Issue: उसाला तुरे आल्याने शेतकरी चिंतेत

Agriculture Storage Subsidy: कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी शासन देणार अनुदान

SCROLL FOR NEXT