Fish Agrowon
यशोगाथा

Fish Farming : कोळंबी संवर्धनातून निर्माण केली यशाची पायवाट

Shrimp Farming : निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन हे मोठे आव्हानात्मक मानले जाते. अशा स्थितीत रत्नागिरी तालुक्यातील सुदेश मयेकर आणि अ‍ॅड. समृद्धी मयेकर यांनी निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनातून स्वतःची यशस्वी पायवाट तयार केली आहे.

Team Agrowon

राजेश कळंबटे
Shrimp Culture : कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये कोळंबी संवर्धनाचे अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. मात्र निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन हे मोठे आव्हानात्मक मानले जाते. अशा स्थितीत रत्नागिरी तालुक्यातील सुदेश मयेकर आणि अ‍ॅड. समृद्धी मयेकर यांनी निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनातून स्वतःची यशस्वी पायवाट तयार केली आहे. रनपार येथील ‘केळबाय ॲक्वा फार्म’मधून प्रति हंगाम सहा ते आठ लाखांपर्यंत नफा मिळवत आहेत.

सुदेश मयेकर यांचा वडिलोपार्जित बेकरी आणि हॉटेलचा व्यवसाय. या व्यवसायात स्थिरावलेली त्यांची ही दुसरी पिढी. सुदेश यांच्या पत्नी समृद्धी या अ‍ॅडव्होकेट असून, वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. रत्नागिरीतील सर्वांत मोठा मत्स्य प्रक्रिया उद्योग गद्रे मरिन यांच्या कोळंबी संवर्धन प्रकल्पापासून प्रेरणा घेत त्यांनी या व्यवसायात उतरण्याचे ठरवले. या अभ्यासू दांपत्याने वेगवेगळ्या निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी प्रकल्पाची माहिती घेऊन भेटी देण्यास सुरुवात केली. मत्स्य महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले व खाद्य पुरवठादार असलेले त्यांचे मित्र भूपेंद्र परब यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येकाच्या समस्या, अडचणी जाणून घेत त्यातून योग्य तो मार्ग आपण काढू शकतो, याचा आत्मविश्‍वास मिळाल्यानंतर २०१६ मध्ये निमखाऱ्या कोळंबी संवर्धन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. एका राष्ट्रीयीकृत बँकेमधून कृषी योजनेतून एक कोटी रुपयांचे कर्ज प्रकरण केले. दरम्यान, आलेल्या कोरोना टाळेबंदीमुळे काही समस्या आल्या तरी त्यावर मात करत मयेकर यांनी पुन्हा कोळंबी संवर्धन प्रकल्प यशस्वी केला आहे.

कोळंबी संवर्धनासाठी जागेची निवड ः
परब यांच्या मार्गदर्शनातून मयेकर यांनी ‘वनामी’ या जातीच्या कोळंबीचे निमखाऱ्या पाण्यात संवर्धन करण्याचे ठरवले. त्यासाठी खाडी किनारी जागेचा शोध घेताना रत्नागिरी शहरापासून अकरा कि.मी. अंतरावर असलेल्या गोळप, रनपार येथील खाडीकिनारी सुधीर किर यांची जागा पसंत पडली.

येथे पूर्वी तळ्यामध्ये कोळंबी संवर्धनाचा प्रकल्प केलेला होता. ही सुमारे साडेपाच एकरची जागा त्यांनी तीस वर्षांच्या करारावर घेतली. सुरुवातीला ५० हजार वर्गफुटाचा एक या प्रमाणे नैसर्गिक मातीची चार तळी तयार केली. खाडीतील पाणी तळ्यामध्ये घेण्याची सोय करण्यात आली.

उत्तम बीज मिळवले...
प्रत्येक तळ्यामध्ये दोन लाख या प्रमाणे चार तळ्यांसाठी वनामी जातीच्या आठ लाख कोळंबी बिजाची मागणी मयेकर यांनी चेन्नईमधील एका कंपनीकडे नोंदवली होती. चेन्नईतून विमानाने गोव्यात आणले. पुढे गोव्यातून वातावरण नियंत्रित ‘इन्सुलेटेड व्हॅन’मधून रनपारपर्यंत आणले जाते. प्लॅस्टिकच्या जाड पिशवीमधून आणलेले हे बीज तळ्याच्या तापमानापर्यंत येऊन स्थिर होईपर्यंत टॅंकमध्ये ठेवण्यात येते.

त्यानंतर स्थिर झालेले कोळंबीचे बीज पाण्याचा सामू व अन्य बाबींची खात्री केल्यानंतर तळ्यामध्ये सोडण्यात येते. रात्री बीज सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून फीड (खाद्य) देण्यास सुरुवात केली जाते. या प्रकारे २०१७ मध्ये वनामी जातीचे कोळंबी बीज सोडल्यानंतर प्रकल्प कार्यान्वित झाला.

खाद्य देण्याचे नियोजन
सुरुवातीला कोळंबी पाच ते सात दिवसांची असते. त्यांना पहिल्या तीस दिवसांपर्यंत खाद्य फारच कमी (एक टन) लागते. पुढे ते हळूहळू वाढवले जाते. उदा. ३० दिवसांनंतर दिवसाला २५० किलो, ६० दिवसांनंतर दिवसाला ३५० ते ४५० किलो द्यावे लागते. दिवसातून तीन ते पाच वेळा खाद्य तळ्यामध्ये टाकले जाते. खाद्य देण्यामधील कोणताही बदल चेक ट्रेमधील निरीक्षणानंतरच केला जातो. एकदा विकत आणलेले खाद्य आठ महिन्यांपर्यंत साठवणे शक्य आहे. खाद्याच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार होत असतात. अंदाजे ८० ते ९० रुपये किलो फीड उपलब्ध होते. त्यामुळे तळ्याजवळच खाद्य साठवून त्याच्या वाहतुकीवरील खर्चात बचत साधली असल्याचे समृद्धी यांनी सांगितले.

विष्ठा काढण्यासाठीची रचना
पाँडच्या मध्य भागी स्लज (कोळंबीची विष्ठा) साठविण्यासाठी खड्डा तयार केला आहे. तळ्याच्या आकारानुसार दोन ते आठ पॅडल व्हील एरिएटर लावावे लागतात. त्याच्या साह्याने पाणी हलते ठेवून, पाण्यातील ऑक्सिजनची पातळी सांभाळली जाते. पाँडमध्ये पाणी गोल फिरते. त्याबरोबर कोळंबीची विष्ठा मध्यभागी असलेल्या खड्ड्यात येऊन साचते. ती विष्ठा हे स्लज पंपाद्वारे बाहेर काढली जाते. हे एरिएटर कायमस्वरूपी सुरू ठेवावा लागतो.

तपासण्या व काटेकोर नियोजन ः
पाण्याचा पीएच दिवसातून दोन वेळा (सकाळी आणि संध्याकाळी) तपासला जातो. हा पीएच सर्वसाधारण ४ पीपीएमपेक्षा अधिक असावा लागतो. पाण्याच्या अन्य चार तपासण्यामध्ये सॅलेनिटी (खारटपणा), ऑक्सिजनची पातळी, अल्कॅलिटी, अमोनिअम नायट्रेट यांचा समावेश असतो. कोळंबीला रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्याची वेळीच तपासणी, खाडीमधील पाणी तळ्यामध्ये घेतल्यानंतर आवश्यक त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया यावर भर दिला जातो. या तळ्यातील दिवस-रात्र तपासण्या करण्यासाठी मत्स्य महाविद्यालयातील पदवीधर तंत्रज्ञाची नियुक्ती केली आहे. पूर्वी तळ्याचा आकार पन्नास हजार वर्गफूट होता, तो कमी करून २५ हजार वर्गफुटाचे करून घेण्यात आले. ही छोटी तळी देखभालीसाठी पूरक ठरतात. पूर्वीच्या मातीच्या नैसर्गिक टाक्याऐवजी प्लॅस्टिक आच्छादन केलेली चार तळी तयार केली. ती स्वच्छ करणे सोपे होत आहे. परिणामी, कोळंबीतील रोगाचा प्रादुर्भाव टाळला जातो.

दृष्टिक्षेपात कोळंबी संवर्धन प्रकल्प

* क्षेत्र ः साडेपाच एकर (तीस वर्षांच्या कराराने)
* तळी (पाँड) ः आठ (२५ हजार वर्गफुटाचे एक या प्रमाणे.)
* कोळंबी बीज (सीड) ः वनामी प्रजाती. सामान्यतः ८ लाख बीज आवश्यक.
* वर्षातून दोन वेळा उत्पादन ः एप्रिल ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ते मार्च असे साधारण हंगाम.
* प्राथमिक गुंतवणूक ः १ कोटी रुपये बँक कर्ज.
* देखभाल व खेळते भांडवल ः ४० ते ५० लाख रुपये प्रति हंगाम.
* रोजगार ः १ तंत्रज्ञ, ४ कामगार आणि १ मुख्य कामगार
* नफा ः ५ ते ७ लाख रुपये प्रति हंगाम

...असे आहे कोळंबीतील अर्थकारण

- साधारणपणे ६५ ते ६८ दिवसांमध्ये कोळंबी विक्रीसाठी योग्य होते. पण नफा मिळविण्यासाठी त्यांचे संवर्धन १२० ते १८० दिवसांपर्यंत केले जाते. त्या वेळी त्याचा काउंट ४० ते ५० (एक किलोमध्ये ४० ते ५० कोळंबी बसतात.) २०१७ मध्ये पहिल्याच वर्षी चार पाँडमधून ३० काउंट (एका किलोमध्ये ३० कोळंबी) असलेली कोळंबी काढण्यात आली. प्रति किलो ४५० रुपये दर मिळाला. अनुभवाअभावी एका पाँडमधील कोळंबी खराब झाल्यामुळे नुकसान सहन करावे लागले. तसेच सरासरी दरही ३०० रुपये इतका मिळाल्याने तीन पाँडमधून २० टन उत्पादनातून सुमारे ५७ लाख रुपये उत्पन्न हाती आले.
- या उत्पादनासाठी एका हंगामात बीज खरेदी, खाद्य खरेदी, वीजबिल, कामगार खर्च यांचाही हिशेब केला असता ते वर्ष ‘ना नफा ना तोटा’ असे गेले.

- या अनुभवातून शहाणे होत व्यवस्थापनामध्ये अपेक्षित बदल करण्यात आले. पाँडचा आकार लहान केला. खर्चात बचत केली. यामुळे प्रत्येक हंगामात किमान ७ ते ८ लाख रुपयांचा नफा मिळवणे शक्य होते. कोरोनामुळे २०२० आणि २०२१ मध्ये कोळंबी उत्पादन बंद ठेवावे लागले. मात्र २०२२ मध्ये पुन्हा उत्पादनाला सुरुवात केली. मे २०२३ ला त्यांनी ८ पाँडमध्ये प्रत्येकी १ लाख प्रमाणे ८ लाख बीज (सीड) सोडले. त्यामधून सुमारे १७ टन उत्पादन मिळाले. त्यासाठी ४५ लाख रुपये खर्च झाला. सरासरी दर प्रति किलो ३०० रुपयेच राहिला असला, तरी खर्चात बचत केल्यामुळे नफ्यामध्ये वाढ झाली. प्रति हंगाम ६ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. योग्य नियोजन केले तर वर्षातून दोन हंगाम साधता येत असल्याचे सुदेश मयेकर यांनी सांगितले.
प्रकल्पात तयार झालेली कोळंबी स्थानिक बाजारासह गोवा, पनवेल, मुंबईसह केरळला पाठविली जाते. तिथून ती निर्यात होते. उत्तम दर्जाच्या कोळंबीला हॉटेल व्यावसायिकांकडून नियमित मागणी राहते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात छोटे-छोटे कोळंबी संवर्धन प्रकल्पाला व त्यातून स्वयंरोजगाराला वाव आहे. कोणताही प्रकल्प करण्यापूर्वी सविस्तर अभ्यास करणे, शक्य असल्यास अनुभव मिळवणे गरजेचे आहे. आम्ही अभ्यास केला असला तरी अनुभवाविना पहिल्या वर्षी एका पाँडमधील सर्व कोळंबी खराब झाल्या. या अनुभवातून शिकून आम्ही व्यवस्थापनात योग्य ते बदल केल्याने खर्चात बचत साधतानाच धोके कमी करू शकलो.
- सुदेश व ॲड. समृद्धी मयेकर
(संपर्क ः ९९७००६९६७०)


योग्य जागा, आरोग्यपूर्ण कल्चर, अत्याधुनिक मशिनरी याला जोड देत पाण्याचा दर्जा टिकविण्यासाठी आवश्यक ती नियमित मेहनत यातूनच आम्ही रनपार येथील प्रकल्पात कोळंबी संवर्धन साध्य करत आहोत.
- संकेत हळदवणेकर, ९३०९७८१८६४
(तंत्रज्ञ, पदवीधर, मत्स्य महाविद्यालय)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Committee: कर्जमाफी समितीत चार सदस्यांचा समावेश

Loan Waiver Data: कर्जमाफीचा डेटा दोन दिवसांत अपलोड

Agri Success Story: यश मिळविण्याच्या जिद्दीने प्रयोगशीलता

Snake Conference: सर्पमित्रांचे १६ फेब्रुवारीला राज्यस्तरीय संमेलन

Agri Admissions: ‘कृषी पदव्युत्तर’ प्रवेशासाठी पीजी-सीईटी अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT