
राजेश कळंबटे
Fish Production Update : कोकणाला विशाल सागरकिनारा लाभला आहे. साहजिकच सागरी जीव व त्या अनुषंगाने तंत्रज्ञान विकासाला चालना मिळाली आहे. सन १९८१ मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (दापोली) (Konkan Agriculture University) आधिपत्याखाली मत्स्य महाविद्यालयाची शिरगाव (रत्नागिरी) येथे स्थापना झाली.
‘फिशरी सायन्स’ विषयातील पदवी, पदव्युत्तर व ‘पीएचडी’ चे अभ्यासक्रम येथे घेतले जातात. ७६० किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनाही नवनवीन तंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
माशांच्या जाळीवर संशोधन
महाविद्यालय स्थापनेतर सन १९८५ मध्ये ‘ट्रॉलर’साठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांवर अभ्यास करण्यात आला. छोट्या आसाच्या जाळ्यांमुळे सरसकट मासे पकडले जायचे.
त्याचा मत्स्योत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी ट्रॉल जाळ्याच्या अंतिम भागाचा आस ३४ मिलिमीटर असावा, अशी शिफारस करण्यात आली.
निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन
समुद्रातील मत्स्योत्पादनावर मर्यादा येत असल्याने निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रकल्पाचा विचार पुढे आला. त्यासाठी परटवणे येथे महाविद्यालयाने दोन हेक्टरवरील तलावामध्ये टायगर कोळंबी संवर्धनाचा प्रयोग केला.
खाडीच्या भरती-ओहोटीचे पाणी तलावात आणून त्यामध्ये कोळंबी बीज वाढविण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाला. ४० गुंठे आकाराचे संवर्धन तलाव व त्यात प्रति चौरस मीटरला १० नग बीज असे प्रमाण निश्चित करण्यात आले. तलावांत २० हजार बीजे वापरण्यात आली.
ती वाढविण्यासाठी कृत्रीम खाद्य दिले जाते. प्रति वर्ष हेक्टरी ५ ते ६ टन कोळंबी उत्पादन या प्रयोगातून मिळू शकते. कोकण किनारपट्टीवरील कोळंबी उत्पादकांनी उत्पादन यशस्वी घेतले. पुढे कोळंबीवर सफेद ठिपक्या हा विषाणूजन्य आजार येऊ लागल्याने व्हेन्नामी कोळंबीचे संवर्धन किनार पट्टीवरील खाडीमध्ये केले जात आहे.
समुद्र शेवाळ शेती (सी वीड फार्मिंग)
समुद्र शेवाळाचा उपयोग सेंद्रिय शेती आणि सौदर्य प्रसाधनांची साहित्य बनविण्यासाठी केला जातो. त्याची वाढती मागणी लक्षात घेऊनच समुद्र शेवाळ शेतीचे तंत्र महाविद्यालयात विकसित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे :
-चार बाय ४ मीटर आकाराचे बांबूचे तराफे (राफ्ट) बनविले जातात. एका तराफ्यात नायलॉनच्या २० दोऱ्या बांधतात. प्रति दोरीला २० ठिकाणी शेवाळाचे रोपण.
-एका तराफाला ५० किलो समुद्र शेवाळ बीजांची गरज.
-प्रदूषण विरहित स्वच्छ पाणी असलेली तसेच मोठ्या लाटा नसलेली जागा तराफे ठेवण्यासाठी निवडली जाते.
- सुमारे ४५ दिवसांनी एका तराफ्यात २५० किलो शेवाळ तयार होते.
-माशांनी किंवा अन्य सागरी जिवांनी शेवाळ खाऊ नये यासाठी तराफ्याच्या खालील बाजूस जाळी लावली जाते.
-आठवड्यातून एकदा तराफ्याची स्वच्छता. जेणेकरून शेवाळाची वाढ व्यवस्थित व्हावी.
- शेवाळाची प्रति किलो ६ ते ७ रुपये दराने विक्री करता येते.
-ऑक्टोबर ते मे या कालावधीत सुमारे पाच वेळा लागवड शक्य.
-काळबादेवी, रनपार, वरवडे येथील किनाऱ्यांवर महिला बचत गटांमार्फत व्यावसायिक स्तरावर
२०२२ मध्ये हा प्रयोग यशस्वी. महिला विकास आर्थिक महामंडळ आणि मत्स्य विभागाचे त्यासाठी सहकार्य.
खेकडा संवर्धन
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव (रत्नागिरी) यांच्यातर्फे ‘व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग’ म्हणजेच बंदिस्त निमखाऱ्या पाण्यातील खेकडा संवर्धन तंत्र विकसित करण्यात आले आहे.
परस बागेत किंवा घरात १५ बाय १० मीटरच्या बंदिस्त खोलीत २०० च्या संख्येपर्यंत हिरव्या किंवा तपकिरी खेकड्यांचे संवर्धन करता येऊ शकते. या संचामध्ये १५ फूट लांब, सहा फूट रुंद जागेत पाच हजार लिटर पाण्यात १०० खेकडे संवर्धित होतात. २५० ग्रॅमपर्यंत वजनाचे खेकडे ७५० ते ९०० ग्रॅम वजनाचे होईपर्यंत
बंदिस्त वातावरणात वाढविता येतात. खाडी किंवा किनारा परिसरातील कांदळवनातही अशा प्रकारचे संवर्धन होते. यात खेकडे जगवणुकीचे प्रमाण ५० टक्के आहे.
मूल्यवर्धित उत्पादने
समुद्रात पकडल्या जाणाऱ्या माशांमधील ६० टक्के मासे खाण्यासाठी कमी प्रतीचे समजले जातात. त्यास बाजारात मागणी व किंमतही कमी मिळते. अशा मासळीचे मूल्यवर्धन करण्याचे प्रयोग करण्यात आले. यंत्राद्वारे मासळीचे मांस व काटे वेगळे करून त्या मांसापासून (सुरमी) मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जाते.
त्यांना देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. यात फिश कटलेट, फिशशेव, पापड, शेव, चकली, वेफर्स, न्यूडल्स, क्रॅब स्टिक, फिश बॉल, कोटेड कोळंबी व म्हाकूळ, कोळंबी-शिंपले लोणचे आदी पदार्थ बनविले जातात.
त्याचे प्रशिक्षण मत्स्य महाविद्यालयामार्फत दिले जाते. आतापर्यंत ५० हून अधिक प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली असून, एक हजारांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अन्य तंत्रज्ञान
शोभिवंत माशांची पैदास व योग्य पद्धतीने वाढ करून मागणीनुसार विक्री करता येते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत त्यासंबंधी घेतलेल्या प्रशिक्षणानंतर सुमारे २५० युनिट्स आज तरुणांनी सुरू केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७५ युनिट्स आहेत. त्याद्वारे तरुणांना अर्थार्जनाचे साधन मिळाले आहे.
या व्यतिरिक्त मच्छीमारांसाठी ‘स्क्विड’ पकडण्याचे संयंत्र तसेच मत्स्य संग्रहालयात प्राण्यांचा रंग टिकविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. बोंबील चटणी टिकवणे तसेच घोडा माशांच्या पिलांचे संगोपन आणि संवर्धन या अनुषंगानेही संशोधन झाले आहे.
डॉ. केतन चौधरी, ९४२२४४११७८, प्राध्यापक, मस्त्यविज्ञान विस्तार प्रमुख
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.