Spice Industry  Agrowon
यशोगाथा

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Success Story : एखादी छोटी कल्पना देखील एक मोठा व्यवसाय सुरु करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यानुसार नियोजन केल्यावर चांगले यश मिळू शकते, असाच काहीसा प्रयत्न सिंदखेड (ता.नेर, जि.यवतमाळ) येथील सौ.विद्या अमोल नगराळे यांनी केला आहे.

Team Agrowon

वासुदेव चांदुरकर

Spice Production : यवतमाळ जिल्ह्यातील सिंदखेड (ता.नेर) हे चौदाशे लोकसंख्येचे गाव.गावशिवारात मोठा तलाव असल्याने मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. तलावामुळे गावशिवारात बागायती क्षेत्र चांगल्या प्रकारे आहे. या गावातील सौ. विद्या अमोल नगराळे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे पती अमोल यांना गायनाची आवड असल्याने अव्दैत कला मंच या बहुउद्देशीय संस्थेमार्फत शासनाच्या बळीराजा चेतना अभियान आणि शुभमंगल योजना अभियानात गायनाच्या मैफिलीचे कार्यक्रम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या दोन्ही मुली सध्या शाळेत शिकत आहेत.

कुटुंबाच्या एक एकर बागायती शेतीमध्ये हळद लागवड करून पावडर निर्मितीला त्यांनी सुरवात केली, परंतु ग्रामीण भागात यास फारसा उठाव नसल्याने शेतीतून आर्थिक गणित बसत नव्हते. सध्या शेतात तूर लागवड आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दोन म्हशींचे त्यांनी संगोपन केले असून दररोज दहा लिटर दूध डेअरीमध्ये दिले जाते. कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी विद्याताईंनी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

प्रक्रिया उद्योगाची सुरवात

कोणत्या प्रक्रिया उद्योगाला सुरवात करायची आणि नेमके प्रशिक्षण कोठून घ्यायचे ? हा प्रश्न सौ. विद्या नगराळे यांच्या समोर होता. तीन वर्षांपूर्वी प्रक्रिया उद्योगातील प्रशिक्षणासाठी शोध घेत असताना त्यांची ओळख सांगवी (रेल्वे) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ञ नम्रता राजस यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार विद्याताईंनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये चटणी, पापड आणि मसाला निर्मितीचे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले.

यामध्ये प्रक्रिया उद्योगाची उभारणी कशी करायची, विविध प्रकारच्या चटण्या, पापड आणि मसाला निर्मितीसाठी लागणारे घटक, त्यांचे प्रमाण, दर्जा कसा टिकवला पाहिजे याबाबत संपूर्ण माहिती घेतली. तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी प्रमाणपत्र, लेबल आणि पॅकेजिंगबाबत तांत्रिक मार्गदर्शन घेऊन प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रक्रिया उद्योगामध्ये वेळोवेळी येणाऱ्या अडचणीवर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चा माल कमी दरात कोठून खरेदी करायचा असा प्रश्न उभा होता. याकाळात प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी विद्याताईंना अमोल याची चांगली साथ मिळाली. चटणी, पापड तसेच मसाला निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल त्यांनी परिसरातील शेतकरी आणि परिसरातील बाजारातून खरेदी करण्याचे नियोजन केले. त्यामुळे योग्य दरामध्ये खात्रीशीर कच्चामाल उपलब्ध होण्याची सोय झाली.

बाजारपेठेचा अभ्यासकरून विद्याताईंनी कढीपत्ता, शेंगदाणा, जवस, कारळा, तीळ आणि खोबरा चटणी निर्मितीला सुरवात केली. त्याचबरोबरीने टप्याटप्याने बीट, लसूण, मेथी आणि पालक पापडांची देखील निर्मिती सुरू केली. गुणवत्तेमुळे गावशिवारातील ग्राहकांच्याकडून उत्पादनांना मागणी वाढू लागली. ग्राहकांच्याकडून घरगुती चवीच्या मसाल्यांना देखील मागणी झाल्याने विद्याताईंनी सावजी मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, सांबार मसाला आणि काळा मसाला निर्मितीला सुरवात केली.

प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी विद्याताईंनी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून शेवया निर्मिती यंत्र, पल्व्हरायजर, पॅकिंग यंत्राची खरेदी केली. त्यामुळे शेवया निर्मितीला गती मिळाली. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे विद्याताईंना सिंदखेड पंचक्रोशीतील गावातून शेवई, चटणी, मसाल्यांना चांगली मागणी मिळू लागली आहे.

अर्थकारणाला मिळाली गती

प्रक्रिया उद्योगाबाबत विद्याताई म्हणाल्या की, चटणी निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. सहा प्रकारच्या चटण्या बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या खरेदीच्या दरानुसार प्रत्येकी एक किलो मागे १५० रुपये खर्च येतो. वर्षभरात ६०० किलो चटणीचे उत्पादन केले जाते. सरासरी ३०० ते ४०० रुपये प्रति किलो या दराने चटणीची विक्री होते. विविध प्रकारच्या पापडनिर्मितीसाठी मजुरी धरून ३०० रुपये प्रति किलो खर्च येतो. पॅकिंग, विक्रीचा खर्च जमेस धरता पापडाची प्रति किलो ४०० रुपये दराने विक्री केली जाते. वर्षभरात साठ किलो पापडाची विक्री होते.

मसाला निर्मितीसाठी कच्चा माल खरेदी, प्रक्रिया आणि मजुरी धरून मसाल्याच्या प्रकारानुसार प्रति किलोस ७०० ते ८०० खर्च येतो. बाजारपेठेसाठी पॅकिंग, लेबलिंग, विक्री व्यवस्था लक्षात घेऊन प्रति किलो मसाल्याची एक हजार रूपये दराने मसाल्यांची विक्री होते. वर्षभरात सत्तर किलो मसाल्याची विक्री होते. ग्राहकांच्या मागणीनुसार प्रति किलो २० रुपये मजुरी दराने शेवई निर्मिती करून दिली जाते. दरवर्षी तीन क्विंटल शेवई निर्मिती केली जाते. प्रक्रिया उद्योगातून खर्च वजा जाता दर महिना वीस हजाराची मिळकत होते. ग्राहकांच्या मागणीनुसार १०० ग्रॅम, २५० ग्रॅम,५०० ग्रॅम आणि एक किलो पॅकिंगमध्ये मसाला,चटणी पॅकिंग केले जाते.

प्रदर्शनातून मिळाली बाजारपेठ

कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार विद्याताईंनी प्रक्रिया उत्पादनांचा समृद्धी हा ब्रॅण्ड तयार केला. उत्पादनांच्या विक्रीसाठी उद्यम आधार तसेच फूड लायसेन्स देखील घेतले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अकोला, नागपूर, यवतमाळ, वाशीम येथील प्रदर्शनामध्ये चटणी, पापड आणि मसाले विक्री सुरू केली आहे.

याबरोबरीने व्हाटसअॅप ग्रुप वरून उत्पादनांची विक्री होते. समृद्धी स्वयंम सहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘उमेद' मार्फत मुंबई येथे भरविण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात त्यांनी साठ किलोपर्यंत चटणी आणि मसाल्यांची विक्री केली. सध्या नेर, यवतमाळ परिसरातील हॉटेल, किराणा दुकान, पान टपरी येथे प्रक्रिया उत्पादनांचा पुरवठा केला जातो. याचबरोबरीने मसाले तयार करून घेण्यासाठी विविध गावातील ग्राहक त्यांच्या प्रक्रिया उद्योगात येतात.

महिलांना दिले प्रशिक्षण

विद्याताई गेल्या दोन वर्षांपासून स्वयंरोजगार संस्था तसेच ‘उमेद' मधील महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी २५ महिला बचत गटांना मसाला, पापड आणि चटणी निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. विद्याताईंच्या समृद्धी स्वयंम सहायता महिला बचत गटाला हिरकणी नवउद्योजक समूहातर्फे अडीच लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.

सौ. विद्या नगराळे ९०२२८२६२५२

वासुदेव चांदुरकर ७९७२१६२९६७

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), ता.दारव्हा जि.यवतमाळ येथे विस्तारशास्त्र विषयतज्ञ म्हणून कार्यरत आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lasunghas cultivation: पौष्टिक लसूणघास चारा पिकाचे लागवड तंत्र

Winter Cow Care: हिवाळ्यातील संकरित गाईंच्या आरोग्याचे व्यवस्थापन

Solar Irrigation: वीज नसली तरी द्या पिकांना पाणी; सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायद्याची

Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू

India Urea Plant in Russia: रशियात भारताचा पहिला युरिया प्रकल्प, चीनच्या निर्यात निर्बंधांनंतर उचलले मोठे पाऊल

SCROLL FOR NEXT