Spice Industry : उच्चशिक्षित युवकाने अल्पावधीत यशस्वी केला मसाले ब्रॅण्ड

Spice Production : पुणे जिल्ह्यात सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सागर गुंजाळ या २७ वर्षे वयाच्या एमबीए प्राप्त युवकाने मसाले निर्मितीचा स्टार्ट अप सुरू केला आहे. अत्याधुनिक यंत्रणेच्या साह्याने साजूक या ब्रॅंडने सुमारे १८ प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती करून त्यास आश्‍वासक उलाढालीसह राज्यासह परराज्यात ‘मार्केट’ मिळवून देण्यात तो यशस्वी झाला आहे.
Spice Industry
Spice IndustryAgrowon
Published on
Updated on

Spice Brand Success Story : पुणे जिल्ह्यात सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सागर गुंजाळ या २७ वर्षे वयाच्या युवकाचा मसाले निर्मितीचा स्टार्ट अप प्रकल्प पाहण्यास मिळतो. या व्यवसायाच्या उभारणीस सागर यांनी चार पाच वर्षांपासून सुरवात केली. मात्र मागील दीड वर्षांत आर्थिक दृष्ट्या व्यवसाय चांगल्या प्रकारे आकार घेऊ लागला आहे. सागर यांनी पुण्यात बीबीए ही व्यवस्थापन विषयातील पदवी घेतली. त्यानंतर लंडनयेथून त्यांनी ‘एमबीए’ केले. भारतात म्हणजेच गावी परतल्यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे ठरवले. बाजारपेठेचा अभ्यास करून मसाले निर्मिती दिशा पक्की केली. अर्थात यातील व्यवसायाची घरची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. वडिलांची शेती व क्रशिंगच व्यवसाय होता. मात्र धाडस, जोखीम स्वीकारण्याची तयारी व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात यश मिळवायचे हे ध्येय मनाशी बाळगले.

सुरवातीला केला संघर्ष

सुरवात खडतर होती. पण पारंपारिक किंवा घरगुती स्वरूपात मसाले निर्मिती न करता आधुनिक यांत्रिकीकरणावर देण्याचे निश्‍चित केले होते. आर्थिक अडचणींमुळे भांडवल किंवा पैशांची जुळवाजुळव करणे आव्हानाचे होते. पण बँकेकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी अनेक प्रयत्नही केले. प्रकल्पाची जागा स्वतःची होती. मात्र ती उद्योगाच्या दृष्टीने विकसित करणे, तेथे बांधकाम करणे अशा कामांसाठी दीड वर्षाचा कालावधी गेला. त्यानंतर मसाले निर्मिती ते पॅकेजिंगपर्यंतच्या यंत्रांची खरेदी केली. ‘एमबीए’ चे शिक्षण असल्याने बाजारपेठांचा अभ्यास कसा करावा याची पूर्वकल्पना होती.त्यानुसार प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर सर्वेक्षण केले. ग्राहकांची मागणी कोणत्या मसाल्यांना कशी मागणी आहेयाचा अभ्यास केला. योग्य दरांमध्ये चांगल्या दर्जाचे मसाले ग्राहकांना कसे देता येईल याचा विचार केला. आवश्‍यक कच्चा माल जास्त प्रमाणात घेऊनच त्याचा वापर करण्याचे ठरवले.

Spice Industry
Spice Industry : चौदा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला मुंढे यांचा मसाला उद्योग

‘स्टार्ट अप’ला सुरवात

‘स्टार्ट अप’ सुरवात झाली. तेव्हापासूनच अनेक अडचणींचा सामना सुरू झाला. बाजारात मसाले उद्योगाच्या अनेक कंपन्यांसोबत स्पर्धा करायची होती. अशावेळी स्वतःचे स्थान तयार करण्याचे आव्हान होते. पण सागर यांनी ते पेलले. त्यासाठी व्यवस्थापन, मसाल्यांची गुणवत्ता, स्वाद, पॅकेजिंगया बाबींवर विशेष लक्ष दिले. कच्च्या मालाचे प्रमाण निश्‍चित करण्यात आले. सुरवातीला १०० किलोपर्यंत उत्पादन तयार होऊ लागले. विक्रेत्यांपर्यंत पोचणे, बाजारपेठ तयार करणे असे प्रयत्न सुरू होतेच. हळूहळू ग्राहकांच्या पसंतीस मसाल्याचे स्वाद उतरू लागले. ५० किलोच्या ‘ऑर्डर्स’ येऊ लागल्या. ‘साजूक’ नावाचा ब्रँड तयार केला. आज दर महिन्याला १५ टनांपर्यंत ‘ऑर्डर’ मिळू लागली आहे. लागणारा कच्चा माल संपूर्ण भारतातून खरेदी करण्यात येतो. यामध्ये लवंग, काळीमिरी, दालचिनी, तेजपान, चक्रीफूल, बडीशेप, जिरा, मोहरी, ब्याडगी मिरची आदी विविध घटकांचा समावेश आहे. कच्च्या मालाची विविधता जपल्याने मसाल्यांना अस्सल सुगंध आणि स्वाद येण्यास मदत झाली.

Spice Industry
Spice Manufacturing Industry : तीन उच्चशिक्षीत मित्रांनी सुरू केला मसाले निर्मिती उद्योग

बाजारपेठ व विक्री व्यवस्था

आघाडीच्या तीन कार्पोरेट कंपन्यांच्या खाद्य विभागाला मसाले पुरवण्याची ऑर्डर सागर यांना मिळाली आहे. त्याचबरोबर सुपर स्टॉकिस्ट नेमले आहेत. त्या अंतर्गत वितरकांचे जाळेही तयार झाले आहे. पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर पासून तेलंगण, कर्नाटक आदी राज्यांपर्यंत साजूक ब्रॅंडच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली आहे. नुकताच व्यंकटाय नावाचा आणखी एक ब्रॅंड तयार केला आहे. वाजवी दरात विक्री करण्याचे तंत्र अवलंबिल्याने ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ठरवून दिलेल्या वेळेत माल पोचविण्यासाठी सागर तत्पर असतात. गुणवत्तेबरोबर स्वच्छता, शुद्धता या बाबींचीही विशेष काळजी घेतली जाते. आज दर महिन्याला १५ टनांच्या विक्रीतून २५ ते ३० लाखांच्या आसपास उलाढाल करण्यापर्यंत सागर यांनी मजल गाठली आहे. उत्पादन स्तरावर १० व्यक्तींची तर मार्केटिंग साठी १८ जणांची नेमणूक केली आहे. त्यातून स्थानिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

अठरा प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती

सध्या १८ प्रकारची उत्पादने बाजारपेठेत सादर केली आहेत. यात बिर्याणी, पावभाजी, कांदा लसूण,गरम, गोडा, काळा, छोले, सांबर, लोणचे मसाला त्याचबरोबर ब्याडगी, काश्मिरी मिरची पावडर आदी विविध उत्पादनांचा समावेश आहे. ग्राहकांची मागणी विचारात घेऊन सात ग्रॅम, १४ ग्रॅम, ५० ग्रॅम, १०० ग्रॅम ते एक, पाच किलो, दहा ते तीस किलो अशा विविध वजनाची पॅकिंग उपलब्ध केली आहेत. मसाले दीर्घकाळ टिकण्यासाठी फूड ग्रेड पॉलिथिन पॅकिंगचा वापर केला आहे. वजनानुसार पाच रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत दरांत उत्पादनांची श्रेणी आहे. दिवाळीसाठी ‘कॉम्बो पॅक’ तयार केले आहेत.

सागर गुंजाळ ९९२१४४९०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com