Rose Market  Agrowon
यशोगाथा

Rose Flower Farming :यशस्वी गुलाब शेतीतून मिळवली समृद्धी

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Agriculture success Story : शिरसोली (ता. जि. जळगाव) येथील देविदास खलसे ३० ते ३५ वर्षांपासून शेतीत असून, पंचक्रोशीत सातत्यपूर्ण व यशस्वी फूल उत्पादनात त्यांनी ओळख तयार केली आहे. त्यांची वडिलोपार्जित सात एकर शेती होती. वडील प्रकाश ती सांभाळायचे. त्या वेळी एका व्यापाऱ्याशी फूल उत्पादन व पुरवठ्याचा करार झाला. थोडक्यात, हे शेत कसण्यासाठी त्यांना देण्यात आले.

त्यात खलसे कुटुंबाला मजूर म्हणून राबावे लागले. आठवीत असल्यापासूनच देविदास शेतीचा हा अनुभव घेत होते. ज्यांना जमीन कराराने दिली त्यांनी निशिगंध लावला होता. त्या वेळी घर ते शेत असे जाऊन- येऊन दररोज सुमारे दहा किलोमीटर अंतर कापून देविदास राबले. त्यांना तीन तासांमागे अवघी दोन रुपये मजुरी मिळायची.

स्वतःचे शेत केले विकसित

अकरावीचे शिक्षण झाल्यानंतर देविदास यांनी पूर्णवेळ शेतीच करायचे पक्के केले. मजूर म्हणून राबण्यापेक्षा स्वतःच फूल उत्पादक का होऊ नये असा विचार त्यांनी केला. बाजारपेठेचे सर्वेक्षण करताना गुलाबाच्या फुलांना व सजावटीसाठी फिलर वनस्पतीला मागणी असल्याचे लक्षात आले.

त्यानुसार नियोजन सुरू केले. वडील हयात असेपर्यंत त्यांची साथ होतीच. पण त्यांच्या निधनानंतर आई अंजनाबाई, पत्नी सविता यांचीही शेतीत समर्थ साथ मिळाली. अतीव परिश्रम व अनेक वर्षांचे सातत्य यांच्या जोरावर खलसे कुटुंबाने आज फुलांच्या शेतीतून समृद्धी मिळवली आहे. बैलजोडी, सालगडी, जुनी लहान विहीर असून, फुलशेतीची पाण्याची गरज लक्षात घेऊन नव्याने विहीर घेतली आहे.

फुलशेतीचे व्यवस्थापन

दरवर्षी दोन ते तीन एकरांत गुलाब शेती असते. आठ बाय तीन फुटांवर ठिबकवर लागवड आहे. रोपे पुणे, नगर जिल्ह्यांतून आणतात. १२ ते १५ रुपये प्रति रोप या दरात मागील दोन वर्षे खरेदी केली. एक बाग सुमारे तीन वर्षे ठेवली जाते. त्यानंतर नव्याने लागवड होते. महिन्याला हंगाम व वातावरणानुसार तीन एकरांत ३० हजारांपासून ते कमाल ६० हजारांपर्यंत फुले उपलब्ध होतात.

बाजारपेठेतील मागणी

फुलांना विशेषतः गुलाबाला दसरा, दिवाळी, लग्नसमारंभ काळात विशेष मागणी असते. त्यास शेकडा १५० ते २०० व कमाल ३०० रुपयांपर्यंतही दर मिळतो. वर्षभराचा विचार केल्यास प्रति फूल ५० पैसे, एक रुपया ते सव्वातीन रुपयांपर्यंतही दर मिळतो. गुलाबालाही पावसाळ्यात किंवा जुलै, ऑगस्टमध्ये दर कमी असतात.

फिलरची शेती

गुलाबाच्या जोडीला उत्पन्न म्हणून दोन एकरांत सुमारे चार हजार झाडे कामिनी या फिलर वनस्पतीची लावली आहेत. फुलांमध्ये सजावटीसाठी व ‘बुके’च्या सजावटीत त्याचा उपयोग होतो. झाड सलग पाच वर्षे उत्पादन देते. दर महिन्याला प्रति झाड या फिलरचे तीन बंडल्स एवढे उत्पादन मिळते. प्रति बंडल १२ रुपये दर मिळतो. पावसाळ्यात फिलरला तुलनेने हवी तशी मागणी नसते.

शेवंती व लिली

शेवंती एक एकर व लिली दोन एकरांत.

शेवंती थंडीत डिसेंबर ते मार्चपर्यंत चालते. किलोला ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत दर मिळतो.

लिलीचे उत्पादन वर्षभर सुरू. उन्हाळा (मार्च ते जून) हा मुख्य हंगाम. प्रति बंडल २० ते २५ रुपये दर मिळतो.

बाजारपेठ

जळगाव शहरात वल्लभदास वालजी व्यापारी संकुल (गोलाणी मार्केट) येथील फुलांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथे बुलडाणा, धुळे, कन्नड, सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथूनही फुलांची आवक होते. देविदास यांचा व्यापाऱ्यांप्रमाणे ग्राहकांशीही चांगला संपर्क तयार झाला आहे. त्यातून थेट विक्रीही होते. काही वेळा फुले कल्याण (मुंबई) येथे पाठवली जातात. फुलशेती जोखमेची आहे. महिन्यात १० ते १५ दिवस अनेकदा मंदीही येते. खर्च निघत नाही. ज्या वेळेस तेजी असते त्या वेळेस तोटा भरून नफा हाती लागतो.

पहाटेपासूनचे परिश्रम

टवटवीत व ताज्या फुलांना बाजारात उठाव असतो. दरही त्यानुसारच मिळतात. हे लक्षात घेऊन देविदास व सविता हे खलसे दांपत्य दररोज पहाटे तीन- साडेतीनच्या सुमारास उठते. भल्या पहाटे फुलांची तोडणी सुरू होते. ती सहा- सात वाजेपर्यंत चालते. सातपर्यंतच फुले जळगावच्या बाजारात घेऊन जावी लागतात.

उशिरा दर कमी मिळतो. तोडणीच्या वेळेस दोन- तीन तास चांगला उजेड देणारी बॅटरी कपाळावर बांधून तसेच उन्हाळा, मुसळधार पाऊस किंवा थंडीतही काम सुरू ठेवावे लागते. जळगाव शहर शेतापासून सुमारे पाच किलोमीटरवर आहे. तोडणीनंतर फुले दुचाकीवरून तेथे नेण्याचे काम देविदास करतात.

सर्व काही दिले फुलशेतीने

खलसे यांनी फुलशेतीच्या जोरावर शेती खरेदी केली. आज त्यांची ३३ एकर शेती आहे. जळगाव शहरात दुमजली टुमदार तसेच शिरसाळा येथे बारा खोल्यांचे घर आहे. शेतीतील पैशांची शेतीतच गुंतवणूक केली. मुलांना चांगले शिक्षण देण्यावर कटाक्ष असून, मुलगी ऐश्‍वर्या जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयात ‘बीएचएमएस’चे शिक्षण घेत आहे.

देविदास खलसे ९०४९७०४१०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT