Team Agrowon
गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाबपाणी, अत्तर तयार करण्यासाठी होतो. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करतात. अलीकडे गुलाब फुलांचा उपयोग सजावट, गुच्छ, हारतुरे करण्यासाठी वाढला आहे.
जास्त फुले देण्याची क्षमता असलेल्या फ्लोरीबंडा, मिनिएचर व हायब्रीड टी प्रकारातील काही जातींची निवड करावी. बागेत लागवडीसाठी जोमदार वाढणाऱ्या, आकर्षक रंगाची जास्त फुले असलेल्या, जास्त काळापर्यंत फुलणाऱ्या व रोग-किडीस प्रतिकारक्षम जाती निवडाव्यात. उदा. पास्ता, कोरोना, डॅनिश गोल्ड, रॉबिनसन, ऑल गोल्ड, युरोपिआना, इत्यादी.
पाकळ्यांची विशिष्ट ठेवण असलेल्या फुलांचा आकर्षक आकार, रंग व सुवास असलेल्या, पाने तजेलदार व दांडा लांब असलेल्या जाती निवडाव्यात. त्याची व्यापारी तत्त्वावर लागवडही करतात. उदा. ग्लॅडिएटर, सोनिया, रक्तगंधा, अर्जुन, डबल डिलाईट, लॅडोरा, टिकाने, सुपरस्टार, इलोनी, मर्सडिस, पापा मिलन, लेडी एक्स, ब्लू मून इत्यादी.
झाडाची वाढ, पाकळ्यांची संख्या, फुलांची संख्या, रंग-सुगंध, दांडाची ठेवण इत्यादी वैशिष्ट्यांवरून गुलाबाचे प्रमुख सहा प्रकार पडतात.
ज्या फुलांचा आकार मोठा, फुलाचा दांडा भक्कम व लांब, दांड्यावर तजेलदार पाने, अनेक पाकळ्यांची उत्तम ठेवण, आकर्षक अशा जातीची प्रदर्शनासाठी निवड करतात.
गुलाबाच्या २० हजारांहून जास्त जाती लागवडीखाली असल्या तरी योग्य जात निवडावी. आपल्या हवामानात आणि जमिनीत चांगली वाढणारी, आकर्षक, टपोरी, विविध रंगी व सुवासिक फुले असणारी आणि दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात निवडावी.
बाजारात मुख्यत्वे करून ग्लॅडिएटर, रक्तगंधा, अर्जुन, सुपरस्टार, लेडी एक्स, पापा मिलन, ब्लू मून, डबल डिलाइट, पॅराडाइज, ख्रिश्चन डायर, ओक्लोहोमा, अमेरिका हेरिटेज, लॅडोस, पीस इत्यादी जातींना मागणी आहे.