Team Agrowon
निशिगंधाची फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा किंवा फुलदांडे, फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. निशिगंध फुलांपासून ०.०८ ते ०.११ टक्का सुगंधी द्रव्य मिळते.
निशिगंध पिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय आहे, तेथे याची लागवड फायदेशीर ठरते. अति थंड हवामान व अति पाऊस या पिकास हानिकारक आहे.
पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन चांगली मानवते. जमिनीचा सामू साधारणपणे ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. हलक्या जमिनीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा किंवा लागवडीपूर्वी हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ते जमिनीत कुजण्यासाठी गाडावे.
हे पीक बहुवर्षीय असून एकदा लागवड केल्यास त्या जमिनीत सतत तीन वर्षे ठेवता येते किंवा प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते.लागवडीसाठी २० ते ३० ग्रॅम किंवा त्याहून अधिक वजनाचे कंद वापरावेत. हे कंद ०.२ टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशक द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लागवडीस वापरावे.
सपाट वाफे किंवा गादीवाफ्यावर ३० × ३० सेंटिमीटर अंतरावर ५ ते ७ सेंटिमीटर खोलीवर लागवड करावी. एका ठिकाणी एकच कंद लावावा. हेक्टरी ७० ते ८० हजार कंद पुरेसे होतात.
फुलांच्या पाकळ्यांची संख्या व पानांच्या रंगानुसार सिंगल, डबल, सेमीडबल, व्हेरीगेटेड असे चार प्रकार आहेत.
लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनी फुले काढणीस योग्य होतात. पूर्ण वाढ झालेल्या कळ्या आणि उमललेल्या फुलांची काढणी नेहमी सकाळी पाच ते आठ किंवा संध्याकाळी सहा ते सात वाजता करावी.