Orchard Cultivation सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गावरील होडावडा हे गाव. खरीप हंगामात भात, भाजीपाला लागवड (Vegetable Cultivation) असली तरी गावशिवारात बहुतांशी शेतकऱ्यांची आंबा (Mango), काजू (Cashew), सुपारी, नारळ हीच मुख्यपिके आहेत. याच गावातील चिंतामणी मराठे हे प्रयोगशील शेतकरी.
एकीकडे विभक्त कुटुंब पध्दतीचे प्रमाण वाढत असताना मराठे कुटुंबीय मात्र एकत्र नांदत आहे. अकरा सदस्यांचे हे कुटुंब चांगल्या पद्धतीने शेती आणि प्रक्रिया उद्योगात (Processing Industry) रमले आहे.
चिंतामणी यांना बीकॉम पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर गोव्यामध्ये पाच वर्षे एका बँकेत तसेच खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. परंतु बालपणापासून शेतीची आवड असल्यामुळे त्यांना नोकरीत फारसा रस वाटत नव्हता. नोकरी करीत असतानाच त्यांच्या वडिलांच्या निधन झाले.
घरची जबाबदारी आल्याने त्यांनी नोकरी सोडून गावी जाऊन सुधारित तंत्राने शेती करण्याचा निर्धार केला. मराठे कुटुंबीयांची एकत्रित सत्तर एकर जमीन असून, त्यातील पन्नास एकर जमीन लागवडीखाली आणली आहे. यामध्ये फळबाग आणि भात शेती आहे.
काजू बागेची उभारणी
चिंतामणी मराठे यांना गावी आल्यानंतर शेतीतून झटपट उत्पन्न मिळणार नाही याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग करून त्यांनी शेती अवजारे विक्री आणि दुरुस्तीचे दुकान सुरू केले.
दिवसातील काही वेळ दुकानामध्ये काम करायचे आणि उर्वरित वेळेत फळबाग नियोजनाचा आराखडा त्यांनी तयार केला. त्यांची बहुतांश जमीन डोंगराळ भागात आहे. या जमिनीत त्यांच्या वडिलांनी गावठी काजू लागवड केली होती.
परंतु याची फारशी देखभाल झाली नसल्याने फारसे उत्पन्न हाती येत नव्हते. हे लक्षात घेऊन चिंतामणी मराठे यांनी सुधारित तंत्राने काजू बाग उभारण्याचा निर्णय घेतला.
श्री. मराठे यांनी २०१४ मध्ये पहिल्या टप्प्यात १५ एकर आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा १५ एकर डोंगराळ क्षेत्रावर काजूच्या वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात जातीच्या कलमांची लागवड केली. लागवड करण्यासाठी डोंगरातील अनावश्यक झाडे काढली.
जमिनीची बांधबंदिस्ती केली. लागवडीसाठी १८ बाय १८ बाय फूट अंतरावर खड्डे खोदून त्यातील माती वरच्या बाजूला काढून ठेवली होती. जूनमध्ये कलमांची लागवड करावयाची होती.
परंतु मे महिन्यात जोरदार मॉन्सूनपूर्व पाऊस झाला.डोंगर उताराचा भाग असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ७० टक्क्यांपेक्षा अधिक खड्डे मातीने मुजले. पुन्हा सर्व खड्ड्यांतील माती काढून त्या ठिकाणी कलमांची लागवड केली.
वर्षभरानंतर जोरदार वाऱ्यामुळे काजू कलमे कलंडली. त्यामुळे कलमांना पुन्हा एकदा मातीची भर दिली. अशा निसर्गनिर्मित अडथळ्यांवर मात करत त्यांनी बाग चांगली जोपासली आहे. शिफारशीत खत मात्रा तसेच गरजेनुसार कीड, रोग नियंत्रणाच्या फवारणीवर त्यांचा भर असतो.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी असताना फळबागांना खते दिली जातात. काजू तसेच आंबा, सुपारी, नारळ बागेतून आता किफायतशीर उत्पादन मिळत आहे. काजू बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी तीन विहिरी आहेत. डोंगरमाथ्यावर २२ हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली.
तेथून संपूर्ण बागेला ठिबक सिंचन करण्यात आले. पहिल्यांदा मराठे कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यामुळे डोंगरात काजू लागवड करण्यासाठी मोठा खर्च येणार होता.
परंतु संकटकाळात मामा भास्कर रघुनाथ खाडीलकर (देवगड) हे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. खर्चाचा अधिकचा भार त्यांनी उचलला, त्यामुळेच डोंगरात दर्जेदार काजू उत्पादन देणारी बाग उभी राहिली आहे.
पाणथळ जमिनीची सुधारणा
चिंतामणी मराठे यांची बहुतांश जमीन ही डोंगरी भागात आहे. दोन डोंगरांमधील सुमारे अडीच एकर जमीन ही पाणथळ स्वरूपातील होती. त्यामुळे तेथे भातपिकाशिवाय अन्य कोणतीही लागवड शक्य नव्हती.
या जमिनीत त्यांनी २५० डंपर मातीचा भराव घालून त्यामध्ये २०० काजू कलमे लावली. ही लागवड यशस्वी होईल की नाही अशी भीती त्यांच्या मनात होती. मात्र आता सर्व काजू कलमे चांगले उत्पादन देत आहेत.
जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे इतर तुलनेत या कलमांना मे अखेरपर्यंत मोहर येतो. इतर कलमांपेक्षा दीडपट उत्पादन मिळते.
लागवडीचे नियोजन
तीस एकरांमध्ये वेंगुर्ला चार आणि सात जातीच्या तीन हजार कलमांची लागवड.
ठिबक सिंचनाचा अवलंब. सेंद्रिय खते, कीडनाशकांचा जास्तीत जास्त वापर.
पाच एकरांमध्ये सुपारीची तीन हजार झाडे, २५० नारळांची वडिलोपार्जित लागवड.
पाच एकरांमध्ये हापूस आंबा लागवड. त्यामध्ये परागीकरणासाठी केसर, गोवा मानकूर कलमांची लागवड.
तीन एकरामध्ये भात शेती. गरजेपुरती भाजीपाला लागवड.
उत्पादनाचा वाढता आलेख
काजू ः
२०२० ः ४ टन उत्पादन, दर प्रति किलो १२० रुपये
२०२१ ः ७ टन उत्पादन, दर प्रति किलो १४० रुपये
२०२२ ः १० टन उत्पादन, दर प्रति किलो १२० रुपये
सुपारी ः दरवर्षी ३००० किलो उत्पादन, दर प्रति किलो ३०० ते ३५० रुपये.
आंबा ः दरवर्षी तीन लाखांची उलाढाल. मुंबई, बेळगावमधील व्यापाऱ्यांना विक्री.
नारळ ः दरवर्षी पन्नास हजारांची उलाढाल. परिसरामध्ये विक्री.
प्रक्रिया उद्योग ः काजूबोंडापासून दरवर्षी १५ हजार लिटर रस निर्मिती. प्रति लिटर ४० रुपये दर.
मधमाशीपालन, प्रक्रिया उद्योगाला चालना
काजूला आलेल्या मोहोरापैकी ५० टक्के मोहोर परागीकरण होत नसल्यामुळे वाया जात असल्याने मराठे यांनी यंदाच्या वर्षी काजू बागेत एक, सुपारी आणि नारळ बागेत एक अशा दोन मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्या आहेत.
त्याचा चांगला फायदा दिसून येत आहे. कोकणातील बहुतांश बागांतील काजू बोंड वाया जाते. परंतु बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मराठे यांनी काजू बोंडूवर प्रकिया करून रस निर्मिती उद्योगाला सुरुवात केली.
वाया जाणाऱ्या बोंडूपासून देखील त्यांनी उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. मराठे यांच्या प्रक्रिया उद्योगामध्ये चार महिने वीसहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.